देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘निर्धार फाऊंडेशन’चे राकेश दड्डणावर यांचा सत्कार !
नागपूर – सांगली शहर आणि परिसरात गेले २ सहस्र दिवस स्वच्छता मोहीम राबवणार्या ‘निर्धार फाऊंडेशन’च्या कार्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंद घेतली. या अभियानाची विश्वविक्रमात नोंद झाल्याने ‘फाऊंडेशन’चे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांचा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे नुकताच सत्कार केला. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘देशाला राकेशसारख्या युवकांची आवश्यकता आहे. त्यांचे स्वच्छता अभियान खरोखरच कौतुकास्पद आहे. हीच खरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र्रनिष्ठा आहे.’’
या संदर्भात राकेश दड्डणावर म्हणाले, ‘‘स्वच्छतेची जनजागृती व्हावी म्हणून आजपर्यंत आम्ही काम करत आहोत, याची नोंद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला बोलावून सन्मान केला. तो खरोखरच मनाला भारावून टाकणारा आहे. आमचे दायित्व वाढले असून येणार्या काळात आणखी जोमाने काम करून वर्षभरात राज्यातील कानाकोपर्यांमध्ये जाऊन स्वच्छतेचे काम करत राहू.’’