कोंगनोळी (जिल्हा सांगली) येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील अक्षतांच्या मंगल यात्रेचे उत्साहात स्वागत !
‘जय श्रीराम’च्या जयघोषाने कोंगनोळी दुमदुमली !
सांगली, १४ जानेवारी (वार्ता) – २२ जानेवारी या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या नवीन मंदिरात प्रभु श्रीरामांची बाल स्वरूपातील नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने देशभरातून श्रीरामभक्त अयोध्या येथे येणार आहेत. या सोहळ्याचे निमंत्रण म्हणून देशातील प्रत्येक गावोगावी ‘श्रीराम मंगल अक्षता कलश’ फिरवण्यात येणार आहे. या निमित्ताने कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथे अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाची ग्रामप्रदक्षिणा यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.
ही ग्राम प्रदक्षिणा यात्रा माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल वाजवत, भजने म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत पार पडली. या मंगल अक्षता कलेश यात्रेचा प्रारंभ करण्यात आला त्या वेळी अजितराव घोरपडे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची वेशभूषा साकारली होती, तसेच ‘जय श्रीराम’चा जयघोष करत आनंद आणि उत्साही वातावरणात अयोध्या येथून आलेल्या अक्षतांचे पूजन करून ग्रामदैवत श्री कोंगाईदेवीच्या मंदिरापासून पालखीमधून कलश यात्रा काढण्यात आली. यात्रेत महिलाही डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी पालखीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
ग्रामप्रदक्षिणा यात्रा पूर्ण झाल्यानंतर हा कलश श्री कोंगाईदेवीच्या मंदिरामध्ये २२ जानेवारीपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. १५ जानेवारीपर्यंत कोंगनोळी येथील प्रत्येक घरात निमंत्रणपत्रक आणि प्रभु श्रीराम मंदिराची प्रतिमा अन् अक्षतावाटप करण्यात येणार आहे, तसेच २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथील सोहळ्याप्रमाणे कोंगाई मंदिरामध्ये भजन, कीर्तन, पूजा आणि शंखनाद करून प्रसादवाटप करण्यात येणार आहे, तसेच ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या विजय महामंत्राचा १०८ वेळा सामूहिक जप करण्यात येणार आहे. ‘गावातील प्रत्येक घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा’, असे आवाहन अजितराव घोरपडे यांनी ग्रामस्थांना केले आहे.