देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असतांना कु. प्रणिता भोर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
‘मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त असतांना मला आलेल्या काही अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना साधिकेला ‘हवेत उंच उचलली जात आहे’, असे जाणवणे आणि ही अनुभूती सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् सहसाधिका यांना सांगतांना पुन्हा तशीच स्थिती अनुभवणे : एकदा युवा सत्संगात मी भावजागृतीचा प्रयोग सांगत होते. मी सत्संगात जसजशी भावजागृतीच्या प्रयोगातील सूत्रे सांगत होते, तसतसे ‘मी हवेत उंच उचलली जात आहे’, असे मला जाणवले. माझा भावजागृतीचा प्रयोग सांगून पूर्ण होईपर्यंत ‘मी फार उंचीवर पोचले आहे’, असे मला जाणवत होते. माझा भावजागृतीचा प्रयोग सांगून झाल्यानंतरही मी बराच वेळ ती स्थिती अनुभवत होते. याविषयी
सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि सहसाधिका यांना सांगतांना अन् त्याविषयी आठवण आल्यावर मी पुन्हा तीच स्थिती अनुभवली. ‘असे का होत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. नंतर मी सहसाधिकेला याविषयी सांगितल्यावर तिने मला ‘ही अनुभूती आहे’, असे सांगितले. आताही मला या अनुभूतीची आठवण होते, तेव्हा मी ‘हवेत वर उचलली गेली आहे’, असे मला जाणवते. एका सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगतांना मला अशीच अनुभूती आली.
२. कोरोना संसर्गापासून रक्षण होण्यासाठी आणि आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘दुर्गादेवी-दत्त-शिव’ हा नामजप त्या त्या देवतांच्या चित्रांकडे पाहून करणे आणि गुरुदेवांच्याच कृपेने क्षात्रभाव, अन् स्थिरता अनुभवता येणे : एकदा मी ध्यानमंदिरात बसून कोरोनापासून रक्षण होण्यासाठी आणि आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री गुरुदेव दत्त । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमःशिवाय ।’ हा नामजप करत होते. दुर्गादेवीचा जप करतांना मी दुर्गादेवीच्या चित्राकडे, तसेच दत्त आणि शिव यांचा नामजप करतांना त्यांच्या चित्रांकडे पहात होते. माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होत होता. दुर्गादेवीच्या चित्राकडे पहातांना ‘माझ्यात क्षात्रभाव जागृत होत आहे’ आणि दत्ताच्या चित्राकडे पहातांना ‘माझ्यात शरणागतभाव जागृत झाला आहे’, असे मला जाणवले. मी शिवाच्या चित्राकडे पहात असतांना मला शांत, स्थिर आणि थंडावा जाणवत होता. या नामजपात प्रत्येक देवतेच्या नामाचा कालावधी अल्प आहे आणि लगेच आपण पुढच्या देवतेचे नाम घेतो, तरीही मला प्रत्येक वेळी आतून हे वेगवेगळे भाव अनुभवता येत होते. मला असे २० ते २५ मिनिटे अनुभवता आले.
गुरुदेवांच्याच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला क्षात्रभाव, शरणागतभाव आणि स्थिरता अनुभवता आली, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्रणिता भोर, कल्याण, जिल्हा ठाणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |