मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !
१. भारतीय कालगणनेची वैज्ञानिकता
‘जगातील अनेक कालगणना करण्याच्या पद्धतींमध्ये मास आणि ऋतू यांमध्ये समन्वय साधला जात नाही; कारण काही कालगणना पद्धती या चंद्राच्या आणि इतर पद्धती सूर्य अन् पृथ्वी यांच्या गतीनुसार चालतात. चंद्रगणनेवर आधारित वर्ष सौरवर्षाच्या तुलनेत १० दिवसांनी लहान असते. भारतीय कालगणनेत या दोन्हींचा समन्वय लक्षात घेऊन ३ वर्षांतून एक अधिक मास असतो आणि अधूनमधून तिथींमध्ये घट-वाढ केली जाते. ज्यामुळे ऋतूंसह सदैव सम्यकता टिकून रहाते. सूर्य जेव्हा मासात एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करतो, या घटनेला ‘संक्रांती’ असे म्हणतात. प्रत्येक मासात एक संक्रांत येत असते. कर्क मास (कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्याचे दक्षिणायन-दक्षिण दिशेला) चालू होते, तेव्हा दिवस लहान होऊ लागतो. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य पुन्हा ‘उत्तरायणात’ प्रवेश करतो आणि दिवस मोठा अन् रात्र लहान होऊ लागते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक असलेली ‘मकरसंक्रांत’ आपल्या देशात उत्सव म्हणून साजरी केली जाते.
२. शरशय्येवर भीष्म पितामह यांचा इच्छामृत्यू
द्रौपदीने विचारल्यावर पितामह भीष्म यांनी सांगितले, ‘माझ्या शरिरातील पापाचे जे दूषित रक्त आहे, ते सर्व वाहून गेल्यानंतर मी स्वतःचा प्राण त्याग करणार.’ त्यानंतर त्यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी इच्छामृत्यू स्वीकारला.
३. शिखांच्या ४० मुक्तांचा पुण्यस्मृती दिवस
महान योद्धा शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंह यांचे ४० शिष्य निरंतर चालू असणार्या युद्धाला घाबरून त्यांचे शिष्यत्व सोडण्याच्या हेतूने पत्र (रूक्का) लिहून देऊन निघून गेले. जेव्हा ते त्यांच्या गावात गेले, तेव्हा त्यांच्या माता आणि गावातील अन्य महिला यांनी त्यांचा पुष्कळ धिक्कार केला. त्यामुळे त्यांना लाज वाटली आणि त्यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली. ते पुन्हा गुरुजींच्या सेवेत युद्धभूमीवर जाऊन पोचले. गुरुजी अकस्मात् जेव्हा त्या मोर्चावर गेले असता त्यांनी पाहिले की, ते ४० सैनिक शिष्य शूरवीरासारखे लढता-लढता मृत्यूच्या कड्यावर पडलेले आहेत; परंतु त्यांचे देह सुटत नव्हते. गुरुजींना पाहून त्यांच्यातील एका प्रमुखाने गुरुजींना ते पत्र फाडून टाकण्यासाठी विनंती केली की, जे त्यांनी गुरुजींचे शिष्यत्व सोडण्यासाठी लिहिले होते. गुरुजींनी त्यांच्यासमोर ते पत्र फाडून त्यांना मुक्त केले. त्यानंतर त्यांचे प्राण गेले. तो दिवस मकरसंक्रांतीचा होता. आज त्या ४० मुक्तांची पुण्यस्मृती म्हणून ‘श्री मुक्तासर साहिब’ नावाच्या स्थानी मकरसंक्रांतीच्या दिवशी पुष्कळ मोठा मेळा भरवण्यात येतो.
४. सामाजिक समरसता आणि संघटितपणा
समाजातील उपेक्षित, निर्धन आणि विकलांग लोकांच्या जीवनाच्या आवश्यकता पूर्ण व्हाव्यात, यासाठी भारतीय मुनींनी ‘दान’ देण्याची पद्धत चालू केली आहे. ‘दान देणे’, ही दया नाही; उलट ते दानदात्याचे सामाजिक कर्तव्यच आहे. दान सामाजिक समानताच नाही, तर समाजात समरसताही निर्माण करते. दान देणार्याला दान घेणार्यांविषयी स्नेह आणि आभार असा भाव असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.
मकरसंक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे दान करणे विशेष महत्त्वाचे आहे. तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असते. दोन्हींचे मिश्रण सामाजिक संघटन, समरसता आणि पूरकता यांचे प्रतीक असते. या दिवशी खिचडी बनवण्याची पद्धतही आहे. महाभारतात दृष्टांत दिला आहेे की, पांडवांच्या वनवासाच्या वेळी मकरसंक्रांतीच्या दिवशी त्यांना भिक्षेमध्ये तांदुळ, डाळ आणि तीळ इत्यादी मिळाले होते. सर्व पदार्थ एकाच पात्रात मिसळले गेले होते; म्हणून त्यांनी ते सर्व पदार्थ एकत्रच शिजवून खाल्ले. त्या दिवसापासून ‘खिचडी’ बनवणे आणि मकरसंक्रांतीच्या दिवशी दान करण्याची प्रथा चालू झाली आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्या कृती आहेत.’
– डॉ. श्रीलाल, संपादक
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, जानेवारी २०२३)