श्रीराममंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने हिंदूंच्या श्रद्धेची चेष्टा केली आहे ! – धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप
सातारा, १३ जानेवारी (वार्ता.) – संपूर्ण भारतवासियांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी या दिवशी होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या नेत्यांनी नाकारले असून या माध्यमातून त्यांनी आपली हिंदुविरोधी मानसिकता उघड केली आहे. श्रीराम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने हिंदूंच्या श्रद्धेची चेष्टा केली आहे, असे प्रतिपादन भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मुसलमान अनुयायांचा वारसा घेऊन काँग्रेस हिंदुद्वेषाचे राजकारण करत आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची थट्टा करणार्या आणि उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारणार्या काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये जनता नाकारेल. काँग्रेसने श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण नाकारून हिंदुविरोधी राजकारणाचा अजेंडा उघड केला आहे. काँग्रेसने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरही बहिष्कार घातला होता. जी-२० परिषदेवरही बहिष्कार घातला होता. कारगिल विजय दिवसावरही बहिष्कार घातला होता.