अयोध्येत ढोल-ताशा वादन करणार्या ‘श्रीराम पथका’चा पुणे येथे आज वाद्यपूजन सोहळा !
पुणे – येथील श्रीराम पथकाचे २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वादन होणार आहे. पुणेकरांसमवेत वादन साजरा करण्यासाठी १४ जानेवारी या दिवशी वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे असलेल्या कार्यक्रमासाठी प.पू. शंकराचार्य विद्यानृसिंहभारती (स्वामी संकेश्वर पीठ) यांच्या हस्ते वाद्यपूजन होणार आहे, अशी माहिती श्री. विलास शिगवण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री रामजन्मभूमी न्यासाकडून श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल-ताशा वादन करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. महाराष्ट्रातील पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथक ढोल-ताशा वादनाने रामललाच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे. याचसमवेत पथकाला काशीविश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये ५० ढोल, २५ ताशा आणि ध्वजपथक असणार आहे. या वेळी पथकाचे १५० सभासद जाणार असून यामध्ये १८ ते ५० वर्षे वयोगटातील सभासदांचा समावेश आहे. पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.