घणसोली येथील ‘इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’चे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
देवद (पनवेल), १३ जानेवारी (वार्ता.) – घणसोली येथील ‘इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या ‘एन्.एस्.एस्. कँप’च्या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून देवद गावात ८ दिवस निवासी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. १३ जानेवारी या दिवशी विद्यार्थ्यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी आश्रमातील साधकांनी त्यांना आश्रमात चालणार्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांना भारतीय संस्कृतीविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्यांनी सर्व माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. आश्रम पाहून सर्वजण प्रभावित झाले. प्राध्यापक डॉ. शाम बोरवार म्हणाले, ‘‘आश्रम पाहून सर्वांना आनंद मिळाला. देवद ग्रामपंचायतीचेही आभार !’’ या वेळी प्राध्यापक डॉ. संदीप कोटकर यांनीही सकारात्मक अभिप्राय दिला. या वेळी देवद गावचे उपसरपंच श्री. विजय वाघमारे उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी श्री. शशी यादव यांनी सांगितले, ‘‘बाहेरून आश्रमात पाऊल टाकल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली. बाहेरील आणि आश्रमातील वातावरण पुष्कळ वेगळे आहे. बाहेरील मॉलमध्येही स्वच्छता असते; पण आश्रमातील स्वच्छता वेगळीच जाणवली. आश्रमात आल्यामुळे मला ऊर्जादायी वाटले.’’
क्षणचित्रे
१. आश्रमातील सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘‘हे अविश्वसनीय आहे. आम्ही हे सर्व प्रथमच ऐकत आहोत.’’
२. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, ‘‘अन्य संत आपत्काळाविषयी सांगतात, ते खरे आहे का ? कलियुगाचा अंत होणार आहे का ? दृष्ट लागल्यानंतर काय केले पाहिजे ?’’
३. काही विद्यार्थ्यांनी आश्रम दर्शनानंतर ‘आम्हाला येथे पुष्कळ शांत वाटत आहे, तसेच मन उत्साही झाले’, असे सांगितले. ‘आश्रमातील सकारात्मकता अनुभवण्यास मिळाली’, असेही काहींनी सांगितले.