पुणे महापालिकेची वाहन चार्जिंग सुविधा महावितरणपेक्षा महाग ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
महापालिकेनेही महावितरणप्रमाणेच दर आकारण्याची निवेदनाद्वारे मागणी !
पुणे – विजेवर धावणार्या वाहनांच्या चार्जिंगच्या सुविधेसाठी महापालिका महावितरणपेक्षा अधिक दरआकारणी करणार आहे. महावितरणचा दर प्रतियुनिट १३.२५ पैसे असतांना महापालिका मात्र प्रतियुनिटसाठी १३ ते १९ रुपये आकारणार आहे. शहरातील २१ उद्याने, १६ क्षेत्रीय कार्यालये, ८ सभागृहे, संग्रहालये आणि अन्य ठिकाणी, तर महापालिकेच्या मोकळ्या ३० जागांवर, तसेच ७ रुग्णालयांच्या आवारात ही सुविधा दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची दर आकारणी महावितरणपेक्षा अधिक आहे, हे ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष श्री. विवेक वेलणकर यांनी उघड केले आहे. त्याविषयीचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना दिले आहे. त्यामुळे महावितरणने उभारलेल्या चार्जिंग स्थानकांमधील दरांप्रमाणेच महापालिकेनेही दर आकारावेत, अशी मागणी श्री. वेलणकर यांनी केली आहे.
श्री. वेलणकर पुढे म्हणाले की,
१. महापालिकेच्या कोणत्या चार्जिंग स्टेशनवर १३ रुपये आणि कोणत्या ठिकाणी १९ रुपये दर आहे, याची माहिती तातडीने पारदर्शक पद्धतीने घोषित करणे अपेक्षित आहे.
२. महावितरणने राज्यभरात ५० ठिकाणी चार्जिंगची सुविधा दिली आहे. यामध्ये पुण्ो येथील ८ ठिकाणांचा समावेश आहे. महावितरणने उभारलेल्या चार्जिंग स्थानकांमधील दरांप्रमाणेच महापालिकेनेही दर आकारावेत.
३. महापालिका ठेकेदार आस्थापनांना सर्व जागा देणार आहे, तसेच चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी सर्व ठिकाणी एक सारखाच खर्च येणार असल्याने ग्राहकांना चार्जिंगसाठी द्याव्या लागणार्या प्रतियुनिट दरात १३ ते १९ रुपये अशी तफावत का ठेवण्यात आली आहे ?
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? महापालिकेकडून अधिक दर का आकारले जातात ? हेही जनतेला समजणे आवश्यक ! |