छत्रपती संभाजीनगर येथे १५ दिवसांत मराठी पाट्या लावण्याविषयी दुकानदारांना महापालिकेची शेवटची संधी !
छत्रपती संभाजीनगर – शहरातील दुकाने, मॉल आणि इतर आस्थापने यांवर इंग्रजी किंवा इतर भाषा यांतील पाट्यांप्रमाणे मराठी पाट्याही तेवढ्याच मोठ्या आकारात लावाव्यात, यासाठी महापालिकेने १५ दिवसांची शेवटची मुदत दिली आहे. त्यानंतर मराठी पाट्या नसलेली दुकाने बंद करण्यात येतील, अशी चेतावणी महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सर्व व्यापार्यांना त्यांच्या दुकानांबाहेर मराठी फलक लावणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी पाट्या लावण्याविषयी दुकाने अथवा आस्थापने यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. आतापर्यंत एकदा प्रत्यक्ष आणि दुसर्यांदा वर्तमानपत्रांद्वारे जाहीर आवाहन करून सर्वांना मराठी भाषेत फलक लावण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आली. काही दुकानदारांनी फलक पालटले; मात्र बहुतांश दुकानांवर पूर्वीचेच फलक आहेत. या व्यापार्यांना आता शेवटची संधी देण्यात येणार आहे. व्यापार किंवा कुठलेही दुकान चालू करतांना संबंधित मालकांनी त्याची नोंद महापालिकेकडे करणे आवश्यक आहे. ही नोंद आहे कि नाही, याचीही पहाणी करण्यात येणार आहे. त्याचसमवेत व्यापार्यांनी आपला व्यवसाय कायमस्वरूपी असो अथवा तात्पुरता असो, मराठीत फलक लावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे, असे प्रशासक श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेत पाट्या न लावणार्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेची कारवाई !
मुंबई – २८ नोव्हेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत ७० सहस्र ७५ येथील दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या आहेत; पण २ सहस्रांहून अधिक दुकानदारांनी पाट्या लावलेल्या नाहीत. मराठी भाषेत पाटी न लावणार्या दुकानदारांविरोधात मुंबई महापालिका कारवाई करत आहे. मराठीत पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी संपली. मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्डात २ याप्रमाणे २४ वॉर्डांमध्ये ४८ अधिकारी दुकानांची झाडाझडती घेण्यासाठी नेमले आहेत. दुकानांवर मराठी भाषेत पाटी नसल्यास प्रतिकामगार २ सहस्र रुपये दंड किंवा कायद्यात करण्यात आलेल्या न्यायालयीन कारवाईच्या प्रावधानानुसार दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
संपादकीय भूमिकासर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे म्हणजे कायद्याचा धाकच नसल्याचे लक्षण ! |