स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मातृभूमीविषयीची तळमळ, म्हणजे ‘सागरा प्राण तळमळला…’ हे भावगीत !
‘मी जरी थोडेबहुत वाङ्मय लिहिले असले, तरी त्याला नेहमी शासनद्रोही म्हणून बंधनात आणि शासनाकडून उपेक्षित अशाच अवस्थेत रहावे लागले आहे. ब्रिटिशांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधी सशस्त्र क्रांतीचा मी प्रयत्न केला; म्हणून त्यांनी माझ्या वाङ्मयावर बंदी घातली आणि स्वातंत्र्य आले, तेव्हा मी हिंदूसंघटनी असल्यामुळे अधर्माला महत्त्वाचा धर्म समजणार्या काँग्रेस शासनाने माझ्या वाङ्मयाला अंधारात ठेवण्याचे प्रयत्न केले. (स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’, म्हणजेच ‘जयोऽस्तुते…’ ही कविता पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होण्यासाठी वर्ष १९६४ उजाडले.) कंसाने देवकीची ६-७ मुले जरी मारली, तरी त्यातून जसा एक कृष्ण निसटला, तशाच प्रकारे या सर्व आपत्तीतूनही यासारखी माझी एखादी कविता प्रशालांत परीक्षेचे प्रांगणात प्रवेश करू शकली आहे.’ हे उद्गार आहेत स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे !
वर्ष १९५३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘सागरा…’ ही कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. याच निमित्ताने मुंबई येथील ज्ञानमंदिर संस्थेने स्वतः कवीलाच या कवितेविषयी विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची विनंती केली. १४ नोव्हेंबर १९५३ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषण झाले. त्या वेळेस प्रारंभीलाच सावरकर यांनी वरील शब्दांत मनातील खंत व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मनातील ही खंत अतिशय योग्य आहे. अनेक गोष्टींमध्ये आदरणीय, अनुकरणीय आणि वंदनीय असलेल्या या कोहिनूर हिर्याला पारतंत्र्यात अन् स्वातंत्र्यातही आज मृत्यूनंतर ५७ वर्षांनीही अपमान, अवहेलना, आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागले आणि लागत आहेत !
१. ‘सागरा प्राण तळमळला…’ या भावगीताची पार्श्वभूमी
भारतातील ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांचा आणि सावरकर घराण्यातील स्त्रियांचा, म्हणजे स्वातंत्र्यविरांची मातृतुल्य येसूवहिनी अन् पत्नी यमुनाबाई यांचा अतोनात छळ होऊ लागला. नाशिकातील त्यांच्या रहात्या घरावर जप्ती आली. सरकारने घराला कुलूप ठोकले आणि या २ स्त्रियांना नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. या दोघींना आता आसरा कोण देणार ? आप्तस्वकियांनी पाठ फिरवली. गावाबाहेरील मंदिरात राहून भक्तांनी देवासमोर ठेवलेल्या मूठ मूठ धान्यावर जगण्याची वेळ आली !
ही सगळी परिस्थिती लंडनस्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समजली. त्यांचे काळीज कळवळले; पण त्यांनी आपल्या वहिनीला धीर देणारे, तिचे सांत्वन करणारे काव्यात्मक पत्र लिहिले; पण लवकरच लंडनमधील भारत भवनला कुलूप लावले. सावरकर यांच्या मागे पोलिसांचा छळ चालू होता. सततचे कष्ट, ताण आणि अन्न-पाण्यावाचून केलेली वणवण यांमुळे सावरकर यांची प्रकृती बिघडली. रहायला घर नाही, ‘ब्रॉन्कायटीस’ची (श्वासनलिकेशी संबंधित आजार) व्यथा स्वस्थता लाभू देत नाही आणि पारतंत्र्याच्या शृंखलात जखडलेली भारतमाता सतत मनःचक्षूसमोर येऊन डोळ्यांत नीज नाही… मन भारतमातेकडे, भारतातील आप्तस्वकियांकडे सतत धाव घेत होते; पण आता परतीचे सगळे मार्ग बंद झाले होते. अशा परिस्थितीत ते लंडनपासून जवळच असलेल्या ब्रायटन येथे निरंजन पाल यांच्याकडे हवापालटासाठी गेले.
एका सायंकाळी तिथल्या समुद्रकिनारी दुःखी मनस्थितीत सावरकर उभे होते. मन उदास होते. समोर सूर्य अस्ताला जात होता. समुद्राच्या लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करून मागे मागे जात होत्या. किती मागे ? समुद्राच्या पलीकडच्या किनार्यापर्यंत ! तिथे उभी होती भारतमाता ! मातृभूमीच्या आठवणीने सावरकर व्याकूळ झाले. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. तोंडातून अस्फुट उद्गार बाहेर पडले…
‘ने मजसी ने परत मातृभूमीला।
सागरा प्राण तळमळला…।।’
शेजारी निरंजन पाल उभे होते. त्यांनी पाहिले सावरकर काही तरी पुटपुटत आहेत. व्याकुळ झाले आहेत. निरंजन पाल आपल्या आठवणींमध्ये लिहितात, ‘थोड्याच वेळात सावरकर ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांचा छोटा मुलगा प्रभाकर देवाघरी गेल्याचे कळले, तेव्हाही ते इतके रडले नव्हते. एका अमर, अजरामर, काव्याच्या जन्माचा तो अलौकिक क्षण होता.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला, म्हणजे शत्रूच्या देशात का आले होते ?
सावरकर यांनी लंडनला येण्यामागे दोन कारणे होती. पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदुस्थानावर राज्य करणारा परकीय बादशाह देहलीला रहात असे. त्याची सर्व परिस्थिती पहावी, त्याचा राज्यकारभार पहावा आणि मग त्याचे राज्य खिळखिळे कसे करता येईल, ते ठरवावे; म्हणून धोका पत्करूनही महाराज देहलीला गेले. तसे आजचे परकीय राज्यकर्ते इंग्रज त्यांचा देश आहे तरी कसा ? त्यांचे शत्रू आणि मित्र कोण ? कुणाचे साहाय्य घेऊन इंग्रजांना धूळ चारता येईल ? हे पहावे, तसेच त्यांचा कायदा शिकून, त्या ज्ञानाच्या आधारे मातृभूमीची मुक्तता करावी, हा पहिला हेतू ! दुसरा मुख्य हेतू होता हातबाँब विद्या शिकून ती भारतात आणणे !
३. ‘सागरा प्राण तळमळला…’ या भावगीतातील पुढच्या ओळी स्फुरणे आणि त्याचा भावार्थ
गुणसुमने मी वेचियली या भावे।
की तिने सुगंधा घ्यावे।।
गुणसुमने म्हणजेच ही विद्या, ज्ञान हे भारतमातेने आणि या ज्ञानरूपी सुमनांचा सुगंध, म्हणजेच त्या ज्ञानाचा उपयोग; पण आता हे घडणे अशक्य ! मग या ज्ञानाचा लाभ काय ?
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा।
हा व्यर्थ भार विद्येचा।।
खरे तर मातृभूमी तिच्या या लाडक्या पुत्राला इतक्या दूर पाठवायला सिद्धच नव्हती; पण तिची समजूत घातली. तिला सांगितले,
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन।।
सागरानेच वचन दिले. मग काय ? ठेवला त्याच्यावर विश्वास…
विश्वसलो या तव वचनी। मी
जगदनुभव योगे बनुनी। मी
तव अधिक शक्त उद्धरणी। मी
येईन त्वरे कथुन सोडिले तिजला…
पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, परतीचे सगळेच दोर कापले गेले आहेत.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी।
ही फसगत झाली तैशी।।
भूविरह कसा सतत साहु यापुढती।
दशदिशा तमोमय होती।।
अशा परिस्थितीत त्या देशविरांची, म्हणजे टिळक, परांजपे, वडील बंधू बाबाराव यांच्या आम्रवृक्षासारख्या वत्सलतेची, वहिनी, पत्नी, त्यांच्या सर्व मैत्रिणी, बहीण आणि धाकटा भाऊ बाळ, त्याचे मित्र या सगळ्यांच्या आठवणीने सावरकर यांचे हृदय भरून आले.
सावरकर सागराशी संवाद साधतांना म्हणतात, ‘सागरा, तू म्हणशील की, येथेच राहिला, तर काय बिघडले ? काय इथल्या आकाशात नक्षत्रे नाहीत कि या नगरीत प्रासाद नाहीत ? पण सागरा…
नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा।
मज भरतभूमीचा तारा।।
प्रासाद इथे भव्य परि मज भारी।
आईची झोपडी प्यारी।।
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा।
वनवास तिच्या जरि वनिचा।।
आकाशात पुष्कळ नक्षत्र असतील; पण मला मात्र माझ्या भारतभूमीचा ताराच प्रिय आहे. इथे मोठमोठे प्रासाद, सुख, ऐश्वर्य, संपत्ती असेल; पण मला माझ्या मातृभूमीची झोपडीच प्रिय आहे. तिचा सहवास असेल, तर मी वनवासही आनंदाने पत्करेन !
सागरा, तू माझ्याकडे पाहून केवळ उपहासाने हसतो आहेस; कारण माझी मायभूमी आज दुर्बल झाली आहे; पण सागरा, लक्षात ठेव वरवर अबला दिसली, तरी माझी मायभूमी अबला नाही.
अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला…
तुला एका आचमनात पिऊन टाकणारे पराक्रमी अगस्ती माझ्या मायभूच्या कुशीतच जन्माला आले होते.
क्रांतीकारक सावरकर यांचे भावूक, हळवे, भावनाविवश मन या काव्यात शब्दबद्ध झाले आहे. मनात ध्येय आणि स्वप्न होते मातृभूमीच्या स्वतंत्रतेचे ! त्यासाठीच घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याचे होमकुंड पेटवले होते; पण आता चारही बाजूंनी अंधारून आले होते. मातृभूमीच्या भेटीसाठी जीव तळमळत होता. मायभूमीला कायमचे अंतर द्यावे लागणार कि काय ? अशा मनस्थितीतील भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार या भावगीतात आहे. भावनेच्या आविष्काराला साजेल, अशी प्रसादपूर्ण भाषा आणि कल्पनाविलास आहे. मायभूमीच्या विरहामुळे जिवाची होणारी तळमळ, ही एकच एक भावना सर्वत्र भरून राहिली आहे.
४. हिंदुस्थानच्या चहुबाजूच्या समुद्राचे सावरकर यांनी केलेले नामकरण आणि त्याची कारणमीमांसा
असे असले, तरी ४४ वर्षांनंतर (म्हणजे वर्ष १९५३ मध्ये) जेव्हा स्वतः कवी (स्वातंत्र्यवीर सावरकर) या कवितेविषयी बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वतःचा त्याग, पराक्रम, सोसलेल्या हालअपेष्टा यासंदर्भात एक शब्दही न बोलता उपदेश काय केला ? सावरकर म्हणाले, ‘सागराशी या कवितेचा संबंध असल्यामुळे आपल्या सागराच्या नावाविषयी आपणांस काही सांगणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या पश्चिमेस जो समुद्र आहे, त्यास आपण ‘अरबी समुद्र’ म्हणतो. या समुद्राला हे नाव कुणी दिले ? युरोपियनांनी ! ते युरोपमधून हिंदुस्थानात येतांना त्यांना प्रथम अरबस्तान लागते आणि नंतर हा समुद्र ! म्हणून त्यांनी या समुद्राला अरबी समुद्र म्हटले ! मग आपणही त्याच नावाने का संबोधावे ? अरबी समुद्र म्हणजे काय ? तो अरबांच्या बापाचा आहे का ? तो आपलाही समुद्र आहे. आपल्या देशाच्या पश्चिमेस तो असल्यामुळे त्यास ‘पश्चिम समुद्र’ म्हणावे. पूर्वेचा तो पूर्वसमुद्र किंवा गंगासागर. दक्षिणेचा तो हिंदुमहासागर – हिंदी महासागर नव्हे ! एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्या आदी प्राणी रहात असले, तरी ते घर त्यांचे नव्हे, तर ते घर घरधन्याचे असते. तसे या देशात कितीही इतर लोक असले, तरी देश हिंदूंचाच आहे. हिंदुस्थान आहे म्हणून हिंदुमहासागर ! आपल्या भूगोलात याप्रमाणे नावे लिहिली पाहिजेत.’ (इ.स. १९५३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली सूचना आज वर्ष २०२४ मध्ये कार्यवाहीत आली आहे का ? याचा प्रत्येक सूज्ञ वाचकाने नक्की विचार करावा ! – संकलक)
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेले सैनिकी सामर्थ्य वाढण्यामागील महत्त्व
विद्यार्थ्यांसमोर केलेल्या या भाषणाच्या शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर पुढच्या पिढीला तिच्या कर्तव्याची जाणीव करून देतांना म्हणतात, ‘यापुढचे उत्तरदायित्व तुमचे आहे. ‘स्वातंत्र्य रक्षिणे’, हे कार्य तुमच्या पिढीचे आहे. तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र आहे. तो संपूर्णच स्वतंत्र करून जगातील मोठ्या ३ राष्ट्रांबरोबर तुमचे राष्ट्रही बसले पाहिजे. ते आज का बसत नाही ? तुमच्यापाशी काय उणे आहे ? लोकसंख्या ? नाही. ती भरपूर आहे. क्षेत्रफळ पुष्कळ आहे. तत्त्वज्ञान विपुल आहे; पण काय नाही ? तर सैनिकी सामर्थ्य ! मोठ्या ३ राष्ट्रांपाशी अणूध्वम (ॲटम बाँब) आहे, तो तुमच्यापाशी नाही. त्यासाठी तुम्ही परिश्रम करा. रशिया, अमेरिका जर एकमेकांची अणूगुपिते चोरत आहेत, तर ज्या तुमच्या पूर्वज क्रांतीकारकांनी हातबाँब चोरून सिद्ध केले, त्या त्यांच्या पुत्र वा पौत्रांच्या पिढीने अणूध्वमचे सिद्धांत का मिळवू नयेत ? तिकडे जरा तुम्ही लक्ष द्या. त्यासाठी सैनिक व्हा. त्यातच ही कविता शिकल्याचे सार्थक !’
– डॉ. (सौ.) शुभा साठे, नागपूर
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)