आजच्या मानवाचे ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव जीवनाचे उद्दिष्ट !
‘धर्मशास्त्रे, गीता हे सिद्धांत सांगतात, त्यामुळे दृढता होती. खंबीरपणा होता. मूल्ये होती. त्याकरता प्राणांचे बलीदान देण्याची जिद्द होती. आज शब्द फिरवण्यात संकोच वाटत नाही. तीच नीती झाली आहे. धनाकरता खून करण्यात शरम वाटत नाही. काव्य आणि साहित्य उच्छृंखल अन् उथळ झाले आहेत. इतिहास आता स्फूर्ती, प्रेरणा, चेतना द्यायला समर्थ नाही. तो केवळ एक संदर्भ उरला आहे. अमाप खप (विक्री) हेच श्रेष्ठतेचे अंतिम प्रमाण आहे. आजचा बाजार उपभोक्त्यांचा आहे. तेथेच गुणवत्ता आहे. आजचे धनाढ्य भ्रष्ट नेते आणि समाजही विकत घेऊ शकतात. परदेशाचा पैसा आमच्या राष्ट्राचा एक संपूर्ण प्रांत खरेदी करू शकतो.
मानवाला त्याचा इतिहास आणि संस्कृती यांपासून तोडून शुद्ध वर्तमान हातपाय बांधून उभे केले आहे. आज पिस्तुल दाखवून माणसाचा आत्मा आपल्याजवळ ठेवता येतो. आता मानव हत्येची वार्ता ही काही बातमी राहिली नाही. आजच्या ‘सॉफिस्टीकेटेड’ (अत्याधुनिक) अशा युगातील अत्याधुनिक मानव सकाळी हत्येची बातमी वृत्तपत्रात वाचतो आणि रात्री उशिरा दूरदर्शनवर एखादा मनोरंजनात्मक अश्लील कार्यक्रम पाहून निजतो. ‘श्वास घेतो आणि श्वास सोडतो’, तसा आजचा अत्याधुनिक मानव ताणामध्ये जगतो आणि त्या आजच्या मानवाचे ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव जीवनाचे उद्दिष्ट !’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२२)