जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी प्रत्यक्ष लिहिलेली ‘तुकाराम गाथा’ गेल्या ५ पिढ्या अत्यंत भक्तीभावाने जतन करणारा शिरवळकर मठ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी स्वहस्ते जे अभंग लिहिले आणि जे इंद्रायणी नदीत बुडवल्यावर परत तरंगले ते अभंग (तुकाराम गाथा) गेल्या ५ पिढ्यांपासून पंढरपूर येथील शिरवळकर मठात अत्यंत भक्तीभावाने जतन केले जात आहेत. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने तेथील मठात ही गाथा सांभाळणारे ह.भ.प. ज्ञानेश्वर रावसाहेब शिरवळकर (वय ८२ वर्षे) यांच्याशी संवाद साधून ‘ही गाथा त्यांच्याकडे कशी आली ? आणि ही सेवा ते कशी करत आहेत ?’, या संदर्भातील माहिती घेतली.
संकलक : श्री. अजय केळकर, कोल्हापूर
१. ह.भ.प. गंगूकाका शिरवळकर यांचा पंढरपूरला येण्याचा प्रवास !
ह.भ.प. गंगूकाका शिरवळकर यांना लहानपणापासूनच परमार्थाचा छंद लागला होता. त्यांची प्रत्येक मासात ‘शिरवळ ते पंढरपूर’, अशी वारी असायची. ते पंढरपूर येथे गेल्यावर तेथे भजन ऐकायचे आणि दशमी, एकादशी, द्वादशी असे ३ दिवस राहून परत गावी जायचे. त्यांना ४ भाऊ होते. मोठे रावजीबुवा, वामनराव आणि शेवटचे ह.भ.प. गंगूकाका ! गंगूकाकांना समाजाला भक्तीमार्गाला लावून त्यांच्यात नामजपाची गोडी लावण्याचा ध्यास होता. याच समवेत ते कीर्तन करून लोकांना सतत ‘सत्मध्ये’ ठेवण्याचा प्रयत्न करत. एकदा ते भोर येथे कीर्तनासाठी गेले असता तेथील सचिव पंत त्यांना म्हणाले, ‘तू वयाच्या केवळ १४ व्या वर्षी कीर्तन केले. तू पुष्कळ हुशार आहेस.’ यांनतर त्यांनी ह.भ.प. गंगूकाका यांना काही तरी ‘बिदागी’ (रक्कम) देण्याचे ठरवले. हे जेव्हा ह.भ.प. गंगूकाका यांना कळाले, तेव्हा ते रात्रीतूनच गावी निघून गेले. तेथून पुन्हा ते पंढरपूरला गेले आणि पंढरपूरहून परत माहूरगडला गेले.
तिथे त्यांनी श्री दत्तगुरूंना प्रसन्न करून घेतले. श्री दत्तगुरु ह.भ.प. गंगूकाका यांना म्हणाले, ‘माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही.’ त्यामुळे ते परत पंढरपूर आणि नंतर ते शिंगणापूर येथे आले अन् श्री महादेवाला प्रसन्न करून घेतले. येथे महादेवानेही त्यांना सांगितले, ‘माझ्याकडे देण्यासारखे काही नाही, तुम्ही पंढरपूर येथे जावे आणि तेथे भक्तीमार्ग वाढवावा.’ यानुसार ह.भ.प. गंगूकाका पंढरपूर येथे आले आणि तेथे अनुष्ठानाला बसले.
२. ‘तुकाराम गाथा’ कुणाकडे द्यावी’, याच्या शोधार्थ कान्होबा पंढरपूर येथे येणे !
‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेल्यावर त्यांची गाथा कुणाला द्यावी ?’, असा प्रश्न त्यांचे बंधू कान्होबा यांना पडला. त्यांनी विचार केला, ‘पंढरपूर येथे जावे आणि तिथे ही गाथा श्री विठ्ठलाच्या चरणी ठेवावी.’ त्यानुसार ते पायी चालत पंढरपूर येथील मंदिरात आले. मंदिरात आल्यानंतर त्यांची भेट श्री. प्रल्हादभाऊ बडवे यांच्याशी झाली. श्री. प्रल्हादभाऊंचे वैशिष्ट्य, म्हणजे ते प्रत्यक्ष भगवंताशी बोलत. या वेळी श्री. कान्होबा प्रल्हादभाऊंना म्हणाले, ‘‘जो कुणी मला पांडुरंगाचे दर्शन घडवेल, त्याला ही ‘गाथा’ मी समर्पित करीन.’’ यानंतर प्रल्हादभाऊंनी कान्होबांना साक्षात् पांडुरंगाचे दर्शन घडवले आणि कान्होबांनी ती ‘गाथा’ प्रसाद म्हणून भाऊंना दिली. ती गाथा प्रल्हादभाऊंनी त्यांच्या तळघरात ठेवली. काळ असाच पुढे गेला आणि भाऊंचे नातू यांना दृष्टांत झाला, ‘पांडुरंगाच्या जवळ एक सात्त्विक भक्त बसलेले आहेत. त्यांना बोलवा आणि ही गाथा आहे ती त्यांना प्रसाद म्हणून द्या. या गाथेसमवेत त्यांना ५ फुटाणे आणि एक वीणा द्या.’
दुसरीकडे ह.भ.प. गंगूकाका शिरवळकर यांनाही दृष्टांत झाला, ‘तुमच्याकडे देवळातील बडवे येतील आणि तुम्हाला इच्छाभोजन देतील, प्रसाद देतील तुम्ही तो घ्या.’ यानुसार प्रल्हादभाऊंचे नातू यांनी ह.भ.प. गंगूकाका यांना इच्छाभोजन दिले, तसेच ‘गाथा’ आणि वीणा दिली. या गोष्टीला जवळपास २०० वर्षे झाली. यानंतर ह.भ.प. गंगूकाका शिरवळकर प्रतिदिन भजन करत आणि नित्य नामजप करत.
ह.भ.प. गंगूकाका यांनी काही कालावधीनंतर सध्याचा मठ माणकेश्वर राजांकडून विकत घेतला. प्रारंभी इथे अनिष्ट शक्तींचा त्रास होता. ही गाथा मठात आणल्यावर तो दूर झाला.
३. प्रत्येक अभंग जिभेला विस्तवाचा चटका देऊन पडताळून घेणे !
‘सालू-मालू नावाच्या दोन विद्वानांनी या गाथेत काही अभंग घातले होते. त्यातील जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे नेमके अभंग कोणते ?’, असा प्रश्न ह.भ.प. गंगूकाका शिरवळकर यांना पडला. ‘दिव्य तेजाने’ हे अभंग निवडून काढायचे’, असे त्यांनी ठरवले. त्यांनी विस्तवाची शेगडी जवळ घेतली. एकेक अभंग वाचायचा आणि शेगडीमधील विस्तव जिभेला लावायचा, विस्तव जर जिभेला भाजला, तर तो अभंग संत तुकाराम महाराज यांचा नाही अन् जर भाजले नाही, तर तो अभंग संत तुकाराम महाराजांचा. असे ४ सहस्र ९२ अभंग त्यांनी निवडून काढले. पुढे काही दिवसांनी त्यांच्या शिष्याचे शिष्य जन्मांध असलेले ह.भ.प. बाबुराव हरि देवडेकर यांनी सरळ आणि उलट्या क्रमाने ती गाथा पाठ करून प्रसिद्ध केली.
४. शिरवळकर मठात असलेले अन्य काही दुर्मिळ ग्रंथ !
‘तुकाराम गाथे’खेरीज या मठात १५० ते २०० वर्षे इतके जुने असलेले अनेक दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ आहेत. यात प्रामुख्याने भागवत, रामायण, संत नामदेव महाराजांच्या गाथा, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या गाथा, नाथ महाराजांच्या गाथा यांचा समावेश आहे. शिरवळकर मठात पूर्वी हस्तलिखिताची पाने खराब होऊ नयेत, यासाठी नागाने टाकलेली कात वापरण्यात येत असे. सध्या या सर्व हस्तलिखितांना ‘लॅमिनेट’ करून ते जतन करण्यात आले आहेत. हे ‘लॅमिनेशन’ करण्यासाठी त्यांनी ५० सहस्रांहून अधिक रुपये व्यय केले आहेत.
५. २ सहस्र अभंग पाठ केल्यावरच विवाह करण्याची शिरवळकर घराण्याची अद्वितीय परंपरा !
ह.भ.प. ज्ञानेश्वर रावसाहेब शिरवळकर यांच्या घराण्यात एक अद्वितीय अशी परंपरा आहे. यानुसार संत तुकाराम महाराज यांचे २ सहस्र अभंग पाठ केल्याखेरीज त्यांच्या घराण्यात विवाहच करत नसे. आजही ही प्रथा ५ व्या पिढ्यापर्यंत चालू आहे.
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर.