श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती !
२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत (उत्तरप्रदेश) श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्ताने…
सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगले दिवस येत आहेत. अर्थव्यवस्थेची वाटचाल जागतिक भक्कम अर्थव्यवस्थेकडे चालू आहे. भारताने काही दिवसांपूर्वी इंग्लंडला मागे टाकत अमेरिकेच्या डॉलर चलनाच्या विनिमय दरानुसार ५ व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे झेप घेतली आहे. ‘भारताचा विकासाचा दर चांगला राहिल्यास वर्ष २०३० पर्यंत भारत तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल’, असा विश्वास ‘एस् अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ आस्थापनाने व्यक्त केला आहे.
१. काळ्या पैशाने व्यापलेली अर्थव्यवस्था !
भारतात एक काळ असा होता की, भारतियांचा पुष्कळ पैसा आणि त्यातही काळा पैसा स्वीस बँकेत ठेवल्याच्या बातम्या असायच्या. स्वीस बँकही ‘तिच्याकडे भारतियांचा पुष्कळ पैसा आहे’, याला दुजोरा द्यायची. भारत आणि स्वीस बँक यांच्यामध्ये वर्ष २०१६ मध्ये एक करार झाला, त्यानुसार स्वीस बँक तिच्याकडील भारतियांच्या आर्थिक खात्यांची माहिती भारत शासनाला नियमित उपलब्ध करून देत राहील. वर्ष २०१८ पासून स्वीस बँक तिच्याकडील भारतियांच्या पैशांची माहिती भारत शासनाला प्रतिवर्षी उपलब्ध करून देत आहे. भारताकडे दिलेल्या माहितीनुसार वर्ष २००६ पर्यंत आणि त्यापुढील २ वर्षे भारतियांकडून स्वीस बँकेत पैसे गुंतवण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. यामध्ये भारतीय उद्योगपती, व्यावसायिक, आस्थापने आणि धनाढ्य भारतीय यांच्याकडून विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेले पैसे, अन्य पैसे यांचा समावेश आहे. वर्ष २००६ ते वर्ष २०१९ पर्यंत हे प्रमाण न्यून होते. स्वीस बँकेत विशिष्ट मुदतीमध्ये (‘फिक्स डिपॉझिट’मध्ये) पैसे ठेवणार्यांचे प्रमाण ११ टक्क्यांनी न्यून झाले. वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ मध्ये हे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. ‘काळ्या पैशांच्या व्यतिरिक्त पैसा केवळ देशाबाहेर म्हणजे गुंतवणुकीसाठी जात आहे’, असे म्हणता येऊ शकते.
भारतात भ्रष्टाचार करणार्यांची काही न्यूनता नाही. यामध्ये मुख्यत्वे राजकारणी, काही लोकप्रतिनिधी, मोठे व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांचा समावेश आहे. वैध आणि अवैध मार्गाने जमा झालेला पैसा सुरक्षित रहाण्यासाठी तो देशाबाहेर पाठवण्याची शक्कल प्रत्येक भ्रष्टाचारी करतोच. त्यासाठी त्याला स्वीस बँक आणि अन्य विदेशी बँका हक्काचे ठिकाण वाटायचे. हवालाच्या माध्यमातून बरेच भ्रष्टाचारी हा पैसा देशाबाहेर पाठवायचे. त्यामुळे या पैशांची कुणकुण भारतीय अन्वेषण यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांना लागायची नाही किंवा काही लागूनही दुर्लक्ष करायच्या. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात हे प्रमाण पुष्कळ होते.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी, म्हणजेच सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचार्यांवर अधूनमधून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले जात आहेत. अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, आयकर विभाग यांच्या धाडीच्या माध्यमातून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिकरित्या सांगितले होते, ‘‘मी या यंत्रणांमध्ये अधिक माणसांची भरती करीन. अनेक उपाययोजना करीन; मात्र भ्रष्टाचार्यांवर कारवाई होणारच आहे.’’ परिणामी ‘देशातील काळा पैसा मोठ्या प्रमाणात उघड होतो. हा पैसा देशातच उघड झाल्यामुळे तो देशाबाहेर जाणे काही वर्षे थांबले आहे’, असे स्वीस बँकेच्या आकडेवारीतून लक्षात येते.
नुकतेच काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांची घरे आणि आस्थापने येथे आयकर विभागाच्या पडलेल्या धाडीत त्यांच्याकडे ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम रोख स्वरूपात सापडली. कपाटे भरून नोटांची बंडले पाहून देशवासियांना ३०० कोटी रुपये म्हणजे किती असतात ? याची थोडीफार कल्पना आली. वर्ष २०२२ मध्ये बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने घातलेल्या धाडीत ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम कह्यात घेण्यात आली होती. महाराष्ट्र आणि देशभरातील काही आस्थापनांवर घातलेल्या धाडीत कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले होते. वर्ष २०१४ ते २०२२ या कालावधीत अंमलबजावणी संचालनालयाने घातलेल्या धाडीत १ लाख कोटी रुपयांची अवैध रक्कम जप्त करण्यात आली आहे. यावरून अवैध रकमेची व्याप्ती किती असेल ? याची कल्पना येते, म्हणजेच कारवाई न झालेली रक्कम अवाढव्यच असणार !
२. भारतातील गुंतवणुकीमध्ये वाढ !
पूर्वी भारताबाहेर पैसा जायचा, आता भारतात विविध राज्यांमध्ये पायाभूत सुविधांसाठी गुंतवणुकीची आवश्यकता असल्याने आता विदेशांतून भारतात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. त्या निमित्ताने भारतीय अर्थव्यवस्थेत पैसा येत आहे. अनेक प्रसिद्ध बहुराष्ट्रीय आस्थापने ज्यांची भारतात आस्थापनेच नाहीत, त्या आता त्यांची कार्यालये देशात उघडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे तेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. विविध आस्थापने उभी राहून त्यातून रोजगारनिर्मिती होत आहे.
‘मेक इन इंडिया’च्या (भारतात उत्पादन करणे) माध्यमातून थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होऊन ती ८ वर्षांत ८३ बिलियन डॉलर (६ लाख ८९ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) एवढी अवाढव्य झाली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेमुळे भारतात केवळ वस्तूंचेच नाही, तर भारत पूर्वी आयात करत असलेली शस्त्रे आणि अन्य संरक्षण सामुग्री यांचेही उत्पादन करत आहे. भारताची वाटचाल शस्त्रास्त्रे आयात करणार्या देशाकडून शस्त्रास्त्रे निर्यात करणार्या देशाकडे झाली आहे. जगात युक्रेन आणि रशिया, हमास अन् इस्रायल असे युद्ध चालू असून, अनेक देशांची अर्थव्यवस्था धक्के खात असूनही भारतीय ‘शेअर मार्केट’ (समभाग बाजार) मात्र वधारत आहे. आस्थापनांचे शेअर खरेदी करणार्यांना चांगला परतावा मिळत आहे.
‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (‘सी.ई.बी.आर्.’ने) तिच्या ताज्या अहवालात सांगितले आहे की, भारत चालू शतकाच्या अखेरीस ‘सर्वांत मोठी आर्थिक महासत्ता’ म्हणून उदयास येईल. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) चीनच्या तुलनेत ९० टक्के आणि अमेरिकेपेक्षा ३० टक्के अधिक असेल, असे सांगितले आहे.
३. श्रीरामामुळे अर्थव्यवस्थेला गती….!
श्रीराममंदिरामुळे अयोध्येत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, चांगले रस्ते, चांगली उपाहारगृहे, हॉटेल्स, अनेक पायाभूत सुविधा यांची निर्मिती झाली आहे. अन्य अनेक पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ‘श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशीच ५० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकेल’, असे व्यापार्यांच्या संघटनेने सांगितले आहे. एका दिवसात ५० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे किती मोठी आहे ? हे भारतातील काही राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या आकड्यांवरून लक्षात येईल. हिमाचल प्रदेश ५३ सहस्र ४१३ कोटी, नवी देहली ७८ सहस्र ८०० कोटी, जम्मू आणि काश्मीर १ लाख १८ सहस्र ५०० कोटी, पंजाब १ लाख ९६ सहस्र ४६२ कोटी, राजस्थान २ लाख ९७ सहस्र ९१ कोटी अशी वर्षभरासाठी या राज्यांमध्ये पैशांचे प्रावधान (तरतूद) आहे.
हे वार्षिक आकडे पाहिल्यावर श्रीराममंदिरामुळे एका दिवसात होणारी उलाढाल किती मोठी आहे ? हे लक्षात येईल. ही केवळ पहिल्या दिवशी होऊ शकणारी गुंतवणूक आहे. राममंदिराची कीर्ती आता वाढत जाणार असल्याने प्रतिदिनच मोठ्या उलाढालींची शक्यता आहे. सध्या प्रतिदिन ८० सहस्र भाविक अयोध्येला भेट देत आहेत. २२ जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर ही संख्या काही लाखांमध्ये जाणार आहे. उत्तरप्रदेशच्या सरकारच्या अधिकार्याच्या अंदाजानुसार प्रत्येक वर्षी किमान १० कोटी लोक, म्हणजेच प्रत्येक दिवशी ३ ते ४ लाख भाविक अयोध्येला भेट देऊ शकतात. या भाविकांमुळे अयोध्येत निवास, भोजन, फिरणे या दृष्टीने कितीतरी मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. सहस्रोंना रोजगार आणि काम मिळणार आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी केवळ भारतातील लोकांनीच ३ सहस्र कोटी रुपयांची देणगी दिली. विदेशातून देणगी अगदी काही दिवसांपासून स्वीकारण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. काही लोकांनी तर एकहाती ३०० कोटी, २०० कोटी एवढ्या मोठ्या रकमेची देणगी देण्याची सिद्धता दर्शवली होती; मात्र न्यासाकडून ती थांबवण्यात आली.
४. राममंदिराकडून रामराज्याच्या सर्वंकष विकासाचा मार्ग !
सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी श्रीरामाची मूर्ती एका छोट्या तंबूत आणि अत्यंत विर्दीण जागेत होती. त्याच अयोध्याधीश श्रीरामाला आता भव्यदिव्य आणि अद्वितीय मंदिरात स्थान मिळणार आहे. मंदिर सर्वचदृष्ट्या अद्भुत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रीराम जसजसे त्याच्या मूळ स्थानी, म्हणजे मंदिरात स्थानापन्न होण्याकडे निघाले आहेत, तसे देशवासियांमध्ये रामभक्तीची लहर उसळत आहे. श्रीरामामुळे अयोध्येचा कायापालट झाला आहे.
देशभरात श्रीराममंदिरासाठी घंटा, वस्त्रे, भांडी, विधीसाठी साहित्य निर्मिती होत असल्यामुळे सहस्रोंचे योगदान लाभत आहे. श्रीरामासाठी प्रत्येक रामभक्त हिंदू स्वत:च्या क्षमतेनुसार योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही कोटीच हिंदू प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी आहेत. यापुढे हिंदूंचा सहभाग वाढत जाणार आहे. या सर्वांचा परिणाम केवळ अयोध्या असलेल्या उत्तरप्रदेशातच नाही, तर अनेक राज्यांमध्ये दिसू लागेल. आता येत असलेली समृद्धी ही श्रीरामामुळे आहे. ही दृश्यमान समृद्धी मंदिर उभारणीच्या काळात दिसू लागली असून अदृश्य लाभ किती कल्पनातीत असतील, याचीही कल्पना करता येणार नाही. हे केवळ राममंदिर आहे, रामाची भक्ती जेव्हा प्रत्येक हिंदू करू लागेल, धर्माचरण करू लागेल, तेव्हा रामराज्याकडे भारताची वाटचाल चालू होईल. श्रीराम केवळ स्थुलातूनच नव्हे, तर सर्वचदृष्ट्या हिंदूंचे कल्याण करतील. रामराज्यात धर्माधिष्ठित व्यवस्था असल्यामुळे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचाच कायापालट होईल, हे निश्चित ! एक मंदिर बांधल्यामुळे काय होते ? असे विचारणार्या महाभागांना ती एक चपराक असेल !
श्री गुरुचरणार्पणमस्तु।
श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१.२०२४)
संपादकीय भूमिकाप्रत्येक हिंदु जेव्हा रामाची भक्ती आणि धर्माचरण करू लागेल, तेव्हा भारताची खर्या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल चालू होईल ! |