पीएच्.डी. शिष्यवृत्तीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन नाही !
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’चे स्पष्टीकरण !
पुणे – सारथी, बार्टी आणि महाज्योती यांच्या वतीने दिल्या जाणार्या पीएच्.डी. शिष्यवृत्तीसाठी झालेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सेट विभागाने घोषित केला आहे; परंतु संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पडली असून प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप निराधार असल्याचेही विद्यापिठाने स्पष्ट केले. चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापिठाच्या सेट विभागाचे समन्वयक प्रा. बी.बी. कापडणीस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.प्रा. बी.बी. कापडणीस म्हणाले की, परीक्षेसाठी ए, बी, सी आणि डी अशा ४ प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. गोपनीय पद्धतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करून छपाई केलेले संच परीक्षा केंद्रांवर लाखबंद स्वरूपात पोचवण्यात आले होते. लाखबंद नसलेली किंवा सील (लाखबंद) उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नयेत, अशाही सूचना करण्यात आल्या होत्या.