पाकमधील महिला ब्रिटिश राजदूताने दिली पाकव्याप्त काश्मीरला भेट !
भारताकडून निषेध !
नवी देहली – पाकमधील ब्रिटनच्या राजदूत जेन मॅरियट यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केल्याने भारताने त्याला विरोध केला आहे. तसेच भारताने देशातील ब्रिटीश उच्चायुक्तांकडेही याविषयी निषेध नोंदवला आहे. राजदूत जेन यांनी १० जानेवारी या दिवशी पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूर या शहराला भेट दिली होती. एकीकडे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ब्रिटनच्या दौर्यावर पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत असतांना दुसरीकडे राजदूत जेन पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करत होत्या. यातून ब्रिटन भारताशी दुटप्पीपणाने वागत असल्याचे चित्र दिसून आले.
१. भारताने ब्रिटनचा विरोध दर्शवतांना म्हटले की, भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे अशा प्रकारे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.
२. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जेन या पहिल्या महिला ब्रिटीश राजदूत आहेत ज्यांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली. या भेटीचे छायाचित्र सामाजिक माध्यमांत पोस्ट करतांना जेन यांनी ‘मीरपूरकडून शुभेच्छा. ब्रिटन आणि पाकिस्तान यांच्या लोकांमधील परस्पर संबंधांचे हे केंद्र आहे. ७० टक्के ब्रिटीश पाकिस्तान्यांची मुळे मीरपूरमध्ये आहेत, ज्यामुळे प्रवासी हितसंबंधांसाठी आम्ही एकत्र काम करणे आवश्यक आहे’, असे लिहिले होते.
अमेरिकेच्या राजदूतांनीही दिली होती पाकव्याप्त काश्मीरला भेट !
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत डोनाल ब्लॉम यांनीही पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी हा भाग पाकिस्तानचा असल्याचे वर्णन केले होते. भारताने या भेटीला विरोध केला होता. भारताने म्हटले होते की, आम्हाला आशा आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करील. या संपूर्ण प्रदेशाला आम्ही भारताचा अविभाज्य भाग मानतो.
एप्रिल २०२३ मध्ये अमेरिकेच्या मुसलमान खासदार इल्हान उमर यांनीही पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली होती. त्याचाही भारताने निषेध केला होता. नंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांचे समुपदेशक डेरेक चोलेट यांनी याविषयी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. ही अनौपचारिक आणि वैयक्तिक भेट असून याचा अमेरिकेशी किंवा तिच्या धोरणांशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले होते.
संपादकीय भूमिका
|