Urdu Houses Maharashtra : महाराष्ट्रातील आणखी ११ शहरांमध्ये उर्दू घरांची निर्मिती होण्याची शक्यता !
मातृभाषा मराठीचे भाषाभवन आणि विद्यापीठ रखडले; मात्र ४ उर्दू घरांची निर्मिती, तर पाचव्या घरासाठी निधी संमत !
मुंबई, १३ जानेवारी (वार्ता.) : महाराष्ट्र सरकारने नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे उर्दू घर उभारण्यासाठी निधी संमत केला. या पाठोपाठ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, परभणी, अमरावती, अकोला, जळगाव, बुलढाणा, धुळे, पुणे आणि बीड या शहरांमध्येही येत्या काही काळात उर्दू घरांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. एकीकडे मातृभाषा मराठी भाषेच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून ‘मराठी भाषाभवन’ आणि ‘मराठी भाषा विद्यापीठ’ यांची कामे रखडली असतांना राज्यातील ४ शहरांमध्ये उर्दू घरांची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात उर्दू घरांची निर्मिती करण्याविषयी राज्य सरकारने ६ मे २०२२ या दिवशी शासन आदेश काढून धोरण निश्चित केले. या धोरणाप्रमाणे वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार किमान १ लाख २५ सहस्र लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये उर्दू घरे बांधता येतील, असे नमूद करण्यात आले. यामध्ये वरील शहरांसह ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये उर्दू घर बांधता येईल’, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. यांतील छत्रपती संभाजीनगर येथे उर्दू घराच्या निर्मितीला सरकारने मान्यता दिली असून निधीही दिला आहे. त्यामुळे भविष्यात उर्वरित अन्य शहरांमध्येही उर्दू घरांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यासह पुन्हा जनगणना झाल्यास वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार उर्दू घरे बांधण्याच्या शहरांच्या संख्येत वाढही होऊ शकते. नांदेड, मालेगाव, नागपूर आणि सोलापूर या शहरांमध्ये याआधीच उर्दू घरांची निर्मिती करण्यात आली आहे.
उर्दू घराचे स्वरूप !नाटक सादर करता येऊ शकेल, असा रंगमंच, दोन सभागृहे, साहित्याच्या साठवणुकीसाठी २ खोल्या, २ शिकवणीवर्ग, महिलांसाठी विश्रामगृह, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, अल्पोपहाराची सुविधा, वृक्ष लागवडीची व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आदी किमान सुविधा उर्दू घरामध्ये असाव्यात, असा सरकारचा आदेश आहे. |
संपादकीय भूमिकामहाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे कि उर्दू ? याविषयी विचार करायला लावणारे धोरण ! |