श्रीराममंदिर आणि शंकराचार्य !
‘शंकराचार्यांनी घातला प्रतिष्ठापना कार्यक्रमावर बहिष्कार !’, अशी बातमी प्रसारमाध्यमे सध्या दाखवत आहेत. या बातम्या पाहून सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) काही जण उतावीळपणे आणि शाब्दिक पथ्य न पाळता प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे पाहून काही सूत्रे समोर ठेवू इच्छितो. शक्य झाल्यास ही सूत्रे शांत डोक्याने वाचा आणि समजून घ्या.
१. ‘आम्ही जाऊ शकत नाही’, म्हणजे बहिष्कार होत नाही !
श्री रामललाच्या प्रतिष्ठापनेवर कुणीही बहिष्कार घातलेला नाही. ४ पैकी ३ पीठांच्या शंकराचार्यांनी ‘२२ जानेवारी या दिवशी होणार्या सोहळ्यात आपल्याला उपस्थित रहाता येणार नाही’, असे सांगितले आहे. यांतील ज्योतीर्पीठ, बद्रीनाथचे जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांना निमंत्रणच मिळाले नसल्याचे सांगितले आहे. ‘शृंगेरी आचार्यांनी जाणार अथवा नाही’, याविषयी स्पष्ट भूमिका मांडल्याचे माझ्या वाचनात नाही. ‘आम्ही जाऊ शकत नाही’, म्हणजे बहिष्कार होत नाही. सर्वच आचार्यांनी स्वतःचे शुभाशीर्वाद असल्याचे आणि कोणतीही अप्रसन्नता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२. माध्यमांकडून कपोलकल्पित कथा
धार्मिक विषयांमध्ये ही पीठे सर्वोच्च असल्याने त्यांचे काही ठराविक ‘प्रोटोकॉल’ (नियम) आहेत. ज्याची पूर्तता शक्य नसल्याने ते या कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. कोणताही विवाद स्वतःहून उपस्थित न करता कार्यक्रमापासून दूर रहाण्याचा त्यांचा निर्णय खरे तर स्वागतार्ह आहे; पण यात माध्यमांनी मसाला न शोधला तरच नवल ! म्हणून मग बहिष्कार कथा चालू झाल्या, जो की, घातलेलाच नाही !
३. शंकराचार्यांचे श्रीराममंदिराविषयीचे योगदान
‘या शंकराचार्यांचे श्रीराममंदिराविषयी योगदानच काय ?’, हा प्रश्न काही अतीउत्साही लोक विचारत आहेत. त्यांनी स्वतःच याविषयी आधी अभ्यास केला असता, तर प्रश्नच पडला नसता. पुरी पीठाधीशांनी याविषयी योगदान दिलेले आहे. द्वारका आणि बद्रीनाथ असे संयुक्त जगद्गुरुपद भूषवलेले ब्रह्मीभूत स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे पदयात्रा ते कारावास आणि संत एकत्रीकरण ते न्यायालयीन लढाई असे प्रदीर्घ योगदान श्रीरामजन्मभूमीविषयी आहे. राजकीय मतभेद असल्याने ते विश्व हिंदु परिषदेच्या सहभागाच्या बाजूने नव्हते; मात्र याने त्यांचे योगदान न्यून होत नाही.
४. शंकराचार्य यांचे हिंदुत्वाच्या योगदानाविषयी विचारणे कितपत योग्य ?
‘या शंकराचार्यांचे हिंदुत्वाविषयी योगदानच काय ?’, हा प्रश्न विचारणार्या किती महानुभावांनी आधी स्वतः याविषयी माहिती घेतली? चारही पीठांचे शंकराचार्य ‘गोरक्षण ते अखंड भ्रमण करून जनसंपर्क’ असे धर्माचे कार्य करत असतात. आपल्याला त्यांच्या संकेस्थळावरही याची माहिती मिळेल. दुसरे, म्हणजे ‘हा प्रश्न उपस्थित करतांना आपण स्वतः असे नेमके काय कार्य करत आहात, ज्याच्या बळावर आपण त्यांना हा प्रश्न विचाराल ?’, याचे आपण प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करूया.
५. विसंवाद मिटवणे महत्त्वाचे
घरातील २ ज्येष्ठ मंडळींमध्ये काही विसंवाद झाले की, आपण ते मिटवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते शक्य नसल्यास मौन बाळगतो कि चौकात जाऊन त्याविषयी दवंडी पिटतो आणि त्यांना अद्वातद्वा बोलतो ? याचे उत्तर प्रत्येकाने आपापले शोधायचे आहे. एकीकडे कुणी एक आमदार रामायणातील संदर्भांचे विकृतीकरण करतांना ‘दुर्लक्ष करूया’, अशी भूमिका घेणारे आपण आपल्याच धर्मातील सर्वोच्च पदांविषयी मात्र टीका करत इतकी अमर्याद भाषा वापरावी ? मला तरी याचा मेळ लागत नाही.
६. बेलगाम भाषेत लिखाण करण्यापेक्षा रामनाम घेणे आवश्यक !
मुळात आपण प्रत्येक गोष्टीवर व्यक्त झालेच पाहिजे का ? ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भव्य मंदिर उभे रहात आहे. आपण हा निर्भेळ आनंद साजरा करूया ! सर्वोच्च धार्मिक पदांवरील व्यक्ती काय सांगतात, त्यावर टीका टिपणी करण्यापेक्षा तोच वेळ वैयक्तिक उपासनेत घालवूया ! इथे अनर्गल (बेलगाम) भाषेत काही लिखाण खरडण्यापेक्षा तोच वेळ रामाचे नाव घेण्यात व्यतित करूया. ‘प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक एखादे वातावरण बनवतात, तेव्हा त्याला आपण भुललेच पाहिजे’, असा काही नियम नाही ना ? मा. पंतप्रधान यम, नियम यांचे पालन करत पुढील ९ दिवस अनुष्ठानात व्यतित करणार आहेत. त्यांचे समर्थक, पाठीराखे, हिंदुत्वनिष्ठ म्हणून तरी त्यांचा आदर्श समोर ठेवूया. पटले तर आज, आता, तात्काळ या विषयावर व्यक्त होणे थांबवूया. अगदीच अनिवार इच्छा झाली, तर त्या वेळी रामनामाची एक माळ जपूया ! अत्यावश्यक असल्याने मी या विषयावर व्यक्त झालो. तरीही हे लिखाण लिहिल्याचे प्रायश्चित्त म्हणून एक माळ अधिकची जपणार आहे. तुम्हालाही पटते का बघा !
समस्तामधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ॥
जिवा संशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥
– समर्थ रामदासस्वामी यांचे मनाचे श्लोक, श्लोक ७४
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१३.१.२०२४)