रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील महाप्रसादातील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !
एका प्रसंगामुळे अस्थिर झालेले मन महाप्रसाद ग्रहण करताच स्थिर होऊन मनात सकारात्मक विचार येणे आणि ‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात साक्षात् श्री अन्नपूर्णामातेचे अस्तित्व आहे’, याची जाणीव होणे
‘१७.९.२०२२ या दिवशी सायंकाळी घडलेल्या एका लहानशा प्रसंगामुळे माझे मन अस्थिर झाले. त्यामुळे मी संबंधित साधकाला योग्य प्रतिसाद न देता महाप्रसाद घेण्यासाठी भोजनकक्षात गेले.
त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी प्रार्थना किंवा वेगळे असे काहीही प्रयत्न केले नाहीत. मी महाप्रसाद ग्रहण करण्याआधी केवळ देवाला प्रार्थना केली; पण ‘काय प्रार्थना केली’, तेही मला आठवत नव्हते.
मी तीनच घास घेतल्यावर माझे मन लगेच स्थिर झाले. माझ्या मनात सकारात्मक विचार येऊ लागले. मी त्या साधकाला भ्रमणभाष करून त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात साक्षात् श्री अन्नपूर्णामातेचे अस्तित्व आहे’, असे या प्रसंगावरून मला अनुभवता आले.
मला अन्य वेळी याची जाणीव नसते; पण देवाने या प्रसंगाच्या माध्यमातून मला याची जाणीव करून दिली. त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |