नम्रता आणि अल्प अहं हे गुण असणारे अन् वयाने लहान असूनही ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळवून संशोधनाची सेवा करणारे श्री. राज कर्वे (वय २६ वर्षे) !

‘श्री. राज कर्वे यांच्याशी माझा गेल्या २ वर्षांपासून जवळचा संबंध आहे. गेल्या वर्षभरापासून मी श्री. राज कर्वे यांच्या समवेत ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला लक्षात आलेली श्री. राज कर्वे यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

श्री. राज कर्वे

१. ज्योतिष विषयासंदर्भातील लिखाण आणि संकलन यांची सेवा परिपूर्ण करणे

श्री. राज कर्वे यांचे सेवेसंदर्भातील बिनचूक लिखाण आणि विषय मांडण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. ते ज्योतिष विषयासंदर्भातील लिखाणाचे स्वतःच संकलन करतात. त्यांनी प्राथमिक संकलन करून पाठवलेले लिखाण संकलन विभागाकडून कोणताही पालट न करता ‘आवडले’, अशा शेर्‍यासह तपासून परत येते. लिखाण करण्यापूर्वी ते स्वतः विषयाची अनुक्रमणिका सिद्ध करून ती जुन्या साधकांना दाखवून मगच लिखाण करतात. एवढ्या लहान वयात त्यांना आत्मसात झालेला हा गुण कौतुकास्पद आहे.

श्री. यशवंत कणगलेकर

२. नम्रता

श्री. राज कर्वे माझ्यापेक्षा ५० वर्षांनी लहान आहेत. (श्री. राज कर्वे यांचे वय २६ वर्षे आहे.) त्यांचे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान अगाध आहे. त्या मानाने माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास बालवाडीतला आहे. असे असूनही ते माझ्याशी अत्यंत नम्रतेने वागतात. मला न समजलेली सूत्रे मी त्यांना परत परत विचारतो, तरीही ते कधी कंटाळत नाहीत.

३. इतरांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे

मला सेवा देतांना ते म्हणतात, ‘काका, तुम्हाला जमेल तेवढे प्रकृती सांभाळून करा.’ माझ्या सेवेत येणार्‍या अडचणींवर ते त्वरित उपाययोजना काढतात. ते मला ज्योतिष सेवेत सहभागी करून घेऊन प्रोत्साहन देतात. ते एकदा  मला म्हणाले, ‘माझ्या कुंडलीत सप्तम स्थानात असलेल्या शनि ग्रहामुळे माझी गती मंद आहे; मात्र तुमच्या कुंडलीत प्रथम स्थानात मेष रास असल्याने तुमची गतीमान प्रकृती आहे. दोघांच्या प्रकृती भिन्न असूनही तुमच्यामुळे आपला उपक्रम लवकर सिद्ध होतो.’

४. वयाने लहान असूनही ते गुणांनी परिपक्व आहेत.

५. त्यांना सांगितलेले कोणतेही सूत्र ते विसरत नाहीत. त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे.

६. अल्प कालावधीत ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळवणे

त्यांनी फारच अल्प कालावधीत ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळवले आहे. प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांना संदर्भासाठी कोणताही ग्रंथ पहाण्याची आवश्यकता लागत नाही. ‘त्यांना आतून उत्तरे मिळतात. यावरून ते जन्मजात ज्योतिषी आहेत’, असे मला वाटते.

७. सोप्या भाषेत ज्योतिषशास्त्र शिकवणे

मी त्यांना प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर मला समजेल, अशा सोप्या रितीने सांगतात, उदा. ‘वक्री आणि अस्तंगत ग्रह म्हणजे काय ?’, हे मला पुस्तक वाचून समजले नव्हते. त्यांनी एका क्षणात एक आकृती काढून विषय सोपा करून सांगितला. ‘राक्षसगणी, मनुष्यगणी आणि देवगणी नक्षत्रे कशी लक्षात ठेवायची ?’, हेही त्यांनी मला आकृती काढून सांगितले.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

गुरुदेवांना परिपूर्ण सेवा आवडते. त्यामुळे ‘परिपूर्ण सेवा करूनच आपण गुरुकृपा प्राप्त करू शकतो’, अशी श्री. राज यांची श्रद्धा आहे.

९. श्री. राज यांच्या जन्मकुंडलीतील काही योग

वरील सूत्रे सिद्ध करण्यासाठी मी श्री. राज यांच्या जन्मकुंडलीतील काही योग पाहिले. ते पुढीलप्रमाणे आहेत.

९ अ. विशिष्ट योगामुळे येणारी आध्यात्मिक स्तरावरील बुद्धीमत्ता ग्रंथ निर्मितीस पूरक असणे : श्री. राज यांच्या कुंडलीत प्रथम आणि दशम स्थानाचा स्वामी ‘बुध’ आणि नवम स्थानाचा स्वामी ‘शुक्र’ हे ग्रह बाराव्या स्थानात आहेत. हा योग जीव उच्च लोकातून आलेला असल्याचे दर्शवतो. या ग्रहांसह असलेला ‘राहू’ ग्रह हा ‘बुध’ आणि ‘शुक्र’ यांची शक्ती वाढवतो. या योगामुळे आध्यात्मिक स्तरावरील बुद्धीमत्ता ग्रंथ निर्मितीस पूरक आहे.

९ आ. त्यांच्या कुंडलीतील सप्तमातील शनि शांत स्वभाव आणि मंद गती दर्शवतो.

९ इ. त्यांच्या कुंडलीतील पंचम स्थानातील गुरु, नेपच्यून आणि हर्षल या ग्रहांच्या युतीमुळे वाचासिद्धी, कल्पनाशक्ती, स्फूर्ती, अंतर्ज्ञान, बौद्धिक धडाडी आणि गूढ विद्यांच्या अभ्यासाची आवड, हे सर्व ज्योतिषशास्त्राला पूरक आहे.

‘श्री. राज यांची जलद आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी श्रीगुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. यशवंत कणगलेकर, रामनाथी, गोवा.