शिवमोग्गा (कर्नाटक) येथील कु. मोनिका आर्. (वय १८ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे
‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला रामनाथी, गोवा येथे येण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ‘मी गुरुदेव असलेल्या ठिकाणी जात आहे. गुरुदेवांशी बोलणार आहे’, असे मला वाटत होते. आश्रमात संतांना पहाण्याचे भाग्य मला लाभले.
१. रात्री झोप न लागल्यामुळे गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) पूर्वी कधीही न केलेली प्रार्थना करणे
‘मी रामनाथी आश्रमात गेल्यावर रात्री झोपले असतांना मला अचानक जाग आली. तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते. त्या वेळी मी गुरुचरणी प्रार्थना केली. ‘कसेही करून मला झोप लागू दे’, अशी प्रार्थना मी करत होते, तरीही मला झोप लागत नव्हती. तेव्हा ‘गुरुदेव, मी तुमच्या चरणी झोपत आहे. मला झोपवा’, अशी मी प्रार्थना केली. त्याच वेळी सूक्ष्मातून गुरुदेव आले आणि त्यांनी मला त्यांच्या चरणांशी घेतले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला झोपवले. सकाळी उठल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मी काल रात्री जसे बोलावले, तसे मी माझ्या गुरुदेवांना कधीच बोलावले नव्हते.
२. संतांना आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पाहून आनंद होणे
आश्रमात गेल्यावर संतांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आम्हाला प्रयोग करून दाखवला. त्यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
३. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ च्या वेळी सेवेच्या निमित्ताने अनेक सद्गुरु, संत आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाल्याने भावजागृती होऊन आनंद होणे
मी रामनाथी आश्रमात आल्यावर मला गुरुकृपेने ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३’ च्या वेळी अतिथी सेवा मिळाली. त्या ८ दिवसांत (१६ ते २२.६.२०२३) मला अनेक सद्गुरु, संत, तसेच पू. रमानंद गौडा आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन होत होते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला आनंद होत होता.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कु. मोनिका यांच्याकडे पाहून हसत हात हलवल्यावर तिची भावजागृती होणे
मी अतिथी सेवा करून आसंदीवर बसले होते. तेव्हा साक्षात् लक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला पाहून हसत हात हलवला. तेव्हा भावजागृती होऊन मला पुष्कळ आनंद झाला. मला त्यांना पाहून ‘त्यांच्याशी बोलावे’, असे वाटत होते.
५. पू. रमानंद गौडा यांच्याशी बोलल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.
६. रामनाथी आश्रमात आल्यानंतर नामजप पुष्कळ चांगला होऊन ‘स्वतःचे प्रारब्ध नष्ट होत आहे’, असे वाटणे
रामनाथी आश्रमात आल्यानंतर माझा नामजप पुष्कळ चांगला आणि एकाग्रतेने होत होता. ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण आणि माझे प्रारब्ध नष्ट होत आहे’, असा विचार माझ्या मनात येत होता.
७. आश्रमात येण्यापूर्वी थोडेसे चालले, तरी दुखणारे पाय आश्रमात आल्यानंतर न दुखणे
आश्रमात येण्यापूर्वी थोडेसे चालले, तरी माझे पाय पुष्कळ दुखायचे. गुरुदेवांच्या आश्रमात आल्यानंतर माझे पाय दुखणे थांबले आणि मला कोणतीही अडचण आली नाही.
८. आश्रमात आल्यावर ‘माझ्यावर गुरुदेवांची कृपा आहे’, असे मला वाटले.
‘गुरुदेव, मी यापुढे माझ्यात असलेला आळस आणि सर्व स्वभावदोष सोडून व्यष्टी साधनेकडे लक्ष देईन. गुरुदेव, मला रामनाथी आश्रमात येण्याची संधी दिल्याविषयी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. मोनिका आर्., शिवमोग्गा, कर्नाटक. (२५.५.२०२३)
|