लोकोपकार म्हणून कारभार करणार्या रुक्मिणी डावरे !
१. पानिपतच्या लढाईत केशवराव डावरे यांना वीरगती मिळणे
केशवराव डावरे आपल्या सैन्यासह पानिपतावर सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास गेले होते. १४ जानेवारी १७६१ च्या दुपारी अहमदशहा अब्दालीच्या वजीर शहा वलीखानच्या गुलाम फौजांचे आक्रमण केशवरावांच्या सैन्याने थोपवून धरले. ३ घंट्यांच्या घनघोर लढाईत केशवराव आणि त्यांच्या सैन्याला रणांगणावर वीरगती मिळाली. केशवरावांच्या वाचलेल्या अंगरक्षकांनी रात्रीच केशवरावांचे पार्थिव मिळवले आणि लगेच उत्तरक्रिया करून त्यांना हुतात्म्याचा मान दिला. कुरुक्षेत्रावर पानिपतपासून १२ किलोमीटरवर असलेल्या छज्जपूर गावाजवळ एक टेकडी आहे, तिचे नाव ‘केशव नाईक का किला’ असे आहे. पानिपतच्या तिसर्या लढाईमध्ये मराठी सैन्याचा झालेला दारुण पराभव आणि केशवराव अन् त्यांच्या सैन्याचा नि:पात या दुःखद बातम्या हा हा म्हणता घरी पोचल्या. पेशव्यांच्या संपूर्ण साम्राज्यावर आणि डावरे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले.
२. केशवरावांची पत्नी रुक्मिणी यांनी सती न जाता लोकोपकाराचे कार्य करणे
त्या काळात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा समाजामध्ये होती. केशवरावांची विधवा पत्नी रुक्मिणीने मात्र सती जाण्यास नकार दिला. दुःखाने पोळलेल्या रुक्मिणीने निर्भयपणे आणि न डगमगता स्वतःचे दुःख बाजूला सारून त्यांच्या अखत्यारीतील वतनाच्या गावांमध्ये त्या गेल्या अन् पानिपतावर वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या दुःखी कुटुंबांना भेटून त्यांना धीर दिला. त्यांच्या विधवांना सती जाण्यापासून परावर्त केले आणि त्या कुटुंबांना सर्व प्रकारचे साहाय्य करून त्यांचे लौकिक अन् भावनिक पुनर्वसन केले. स्वतःची रयत आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे उत्तरदायित्व पाळण्याच्या अढळ निष्ठेचे ते ज्वलंत उदाहरण होते. रुक्मिणीच्या त्या कार्याकरता पेशवे थोरले माधवरावांसह सर्वांनी तिला नावाजले. रुक्मिणी सती न गेल्याविषयी पुण्यातील कर्मठ ब्राह्मणही म्हणाले, ‘‘असे लोकोपकाराचे कार्य करणार्या स्त्रीने सती जाण्याची आवश्यकता नाही, असे धर्मग्रंथ सांगतात.’’
वतनाच्या गावांमध्ये जाऊन पानिपतावर वीरमरण आलेल्या सैनिकांच्या दुःखी कुटुंबाची काळजी घेतल्याविषयी ‘केशवराव-रुक्मिणी’ या जोडीला आणि डावरे कुटुंबाला अहिल्यानगर अन् पुणे जिल्ह्यातील त्यांच्या वतनाच्या गावांचे गावकरी पुढे अनेक पिढ्यांपर्यंत नावाजत होते. अशा विरांगनेला मनापासून नमन !
जे लोक ‘भारतात आणि महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा प्रारंभ वर्ष १८४८ मध्ये झाला’, असे म्हणतात, ते ‘रुक्मिणी डावरे यांनी केलेला राज्यकारभार कोणत्या शिक्षणाच्या आधारे केला ?’, याविषयी सांगू शकतील का ?
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्री. विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे. (१०.१.२०२४)
कुटुंबातील हौतात्म्याची परंपरा पाळणारे गोविंदराव नारायणराव डावरे !
१. हुतात्मा गोविंदराव नारायणराव डावरे यांची पार्श्वभूमी
हुतात्मा गोविंदराव नारायणराव डावरे यांचा जन्म १७ डिसेंबर १८३६ मध्ये झाला. गोविंदराव पूना कॉलेजच्या आद्यविद्यार्थ्यांपैकी एक ! ते गणित विषय घेऊन मुंबई विद्यापिठाची पदवी ‘डिस्टिंक्शन’सह (७५ टक्क्यांहून अधिक गुण) उत्तीर्ण झालेले होते. मुंबई, कोलकाता आणि मद्रास येथील इंग्रजी तज्ञांकडून ‘बँकिंग’ (अधिकोष) विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. ‘पूना बँक’ स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते संस्थापक संचालकांपैकी एक होते. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते आणि ते अनेक भाषांमध्ये लिहीत असत. त्यांना दोन बंधू होते माधवराव आणि बळवंतराव ! या दोन्ही बंधूंना वर्ष १८७३ मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा सुनावल्याने अंदमानमध्ये पाठवले होते.
२. गोविंदराव डावरे यांनी केलेले क्रांतीकार्य आणि ब्रिटिशांचा कपटीपणा !
गोविंदराव डावरे यांच्या बँकेवर इंग्रज सरकारने अभियोग चालवला; पण त्यातून ते निर्दोष सुटले. त्यांची मिरवणूक निघाली आणि पुण्यात पेढे वाटले. त्या दिवशी ‘पुण्यातील पेढे संपले’, अशी नोंद आहे. हुतात्मा गोविंदराव डावरे यांनी क्रांतीकारकांना साहाय्य केले. बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड यांना ब्रिटीश सरकारने दोषी ठरवले. त्यांना साहाय्य करण्यासाठी गोविंदरावांनी आपल्या पेढीद्वारे १ लाख रुपये ७ दिवसांत मल्हाररावांकडे पोचवले. त्यामुळे त्यांना फार मोठे साहाय्य झाले. गोविंदराव डावरे यांचे तैलचित्र बडोद्याच्या महाराजांच्या ‘मकरपुरा’ राजवाड्यात लावलेले आहे. गोविंदरावांनी महर्षि अण्णासाहेब पटवर्धन आणि आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना सहकार्य केले. इंग्रज सरकारने गोविंदरावांना अडकवण्यासाठी ४ वेळा प्रयत्न करूनही ते त्यांना अडकवू शकले नाहीत. तेव्हा वासुदेव बळवंत फडके यांना साहाय्य केले; म्हणून १५ नोव्हेंबर १८७९ मध्ये गोविंदरावांना अटक केली आणि पुण्यातील शुक्रवार पेठेतील फडगेट जवळील हवेली तालुक्याच्या मामलेदार कचेरीमधील उपकारागृहात कस्टडीमध्ये ठेवले. इंग्रजांनी धाडसी योजना आखून ती इमारत १३ डिसेंबर १८७९ जाळली आणि त्यात गोविंदराव डावरे यांना जाळून मारण्यात आले. दोन्ही भाऊ अंदमानात होते. त्यामुळे गोविंदरावांचा भाऊ माधवराव यांच्या ५ वर्षांच्या मुलाने त्यांच्यावर अग्नीसंस्कार केले. त्या वेळी परंपरा मोडून गीताबाई डावरे अंत्यविधीसाठी स्मशानात उपस्थित होत्या.
गोविंदरावांचे पूर्वज केशवराव डावरे यांची वर्ष १७६१ मधील पानिपतावरील हौतात्म्याची परंपरा पाळून त्यांनी देशाकरता स्वतःचे सर्व जीवन अर्पण करून वर्ष १८७९ मध्ये हौतात्म्य प्राप्त केले.
– श्री. विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे.