27th National Youth Festival : घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाची हानी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
|
नाशिक – देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे दायित्व तरुणांचे आहे. राजकीय माध्यमातूनही देशाची सेवा करता येईल. लोकशाहीत तरुणांचा सहभाग जितका अधिक असेल, तितके राष्ट्राचे भविष्य चांगले असेल. तरुण राजकारणात आले, तर घराणेशाहीचे राजकारण अल्प होत जाईल. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाची मोठी हानी झाली आहे, तरुणांनी राजकारणात येऊन देशाच्या विकासाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
In Nashik, the 27th 'National Youth Festival' was inaugurated by Prime Minister Narendra Modi
"Loss to the Nation Due to Dynastic Politics!" – PM
"An appeal to the youth to enter politics and take up the responsibility for the nation's development in their hands."
स्वामी… pic.twitter.com/0x42eCl8Dd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2024
केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागाच्या वतीने येथे १२ जानेवारी या दिवशी आयोजित २७ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवा’चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मोदी यांनी नाशिकच्या दौर्यात श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर जमलेल्या युवा समुदायाला त्यांनी संबोधित केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की,
१. मी जेव्हा जागतिक नेत्यांना भेटतो, तेव्हा मला त्यांच्यात अद्भुत आशा दिसते. आशा आणि आकांक्षा यांचे एक कारण आहे लोकशाही. भारत लोकशाहीची जननी आहे. भारताला नव्या उंचीवर नेण्याचे महत्त्वाचे काम तरुणांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या ताकदीमुळेच आज भारतीय अर्थव्यवस्था जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थांत समाविष्ट झाली आहे. आजच्या तरुण पिढीवर माझा पुष्कळ विश्वास आहे.
२. भारताची युवा पिढी आयुर्वेदाची ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ आहे. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारा, ते सांगतील, त्यांच्या काळात जेवणात बाजरीची भाकरी, कुटकी, नाचणी, ज्वारी असायची; पण गुलामीच्या मानसिकतेत या अन्नाला गरिबीसह जोडले गेले. या अन्नाला स्वयंपाकघरातून बाहेर काढले गेले. हेच अन्न आता ‘मिलेट्स आणि सुपर फूड’च्या रूपात पुन्हा स्वयंपाकघरात पोचत आहे. सरकारने या मिलेट्सना ‘श्री अन्न’च्या रूपाने नवी ओळख दिली आहे. तुम्हाला ‘श्री अन्न’चा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ व्हायचे आहे. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि देशातील शेतकर्यांचेही भले होईल.
३. लोकशाहीमध्ये सहयोगाचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. तुम्ही तुमचे मत मतदानाच्या रूपाने द्यायचे आहे. मतदान करणारे मतदार आपल्या लोकशाहीत नवी ऊर्जा आणू शकतील. आजचा काळ हा भारताच्या युवा शक्तीचा आहे.
४. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी नाशिक येथे आहे, हे माझे भाग्य आहे. तरुणाईच्या खांद्यावर भारताला नव्या उंचीवर नेण्याचे दायित्व आहे. सरकारने मागील १० वर्षांत तरुणांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या. त्या जोरावर तरुणांनी देशाला पुढे घेऊन जावे. ते हे पूर्ण ताकदीने करतील, असा मला ठाम विश्वास आहे.
देशभरातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी जनतेला सांगितले, ‘‘२२ जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे स्वच्छता मोहीम राबवावी. तेथे श्रमदान करावे. आज मलाही श्री काळाराम मंदिराला भेट देण्याची आणि येथे श्रमदान करण्याची संधी मिळाली आहे.’’