लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी सल्लागार मंडळाची स्थापना !

लोणार सरोवर

मुंबई – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वैज्ञानिक सल्लागार मंडळाची स्थापना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये लोणार सरोवरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याविषयी वर्ष २००९ मध्ये रिट याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने सरकारला या सरोवराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आदेश दिला होता. त्यानुसार शासनाकडून ही समिती स्थापन करण्यात आली आहे. अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापिठाचे कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये भूगर्भशास्त्र, वनस्पती, जीवतंत्रज्ञानशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, पुरातत्वशास्त्र, राज्य जैव विविधता मंडळ, प्राणीशास्त्र आदी विविध विभागांतील तज्ञांचा समावेश आहे.