पुरुष आणि स्त्री यांच्याविषयीचे मनुसूत्र

‘मनूचा पुरुषावरील आक्षेप आणि त्याची स्त्रीविषयक पूज्य बुद्धी अशा दोन उपमुद्यांत हा भाग मांडला जातो. मनुस्मृतीतील लोकांचा उल्लेख करून मनु म्हणतात, ‘कुटुंबात कामांची तशी अधिकारांची विभागणी स्त्री-पुरुषांमध्ये होते. कुटुंबात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे खजिना आणि जमाखर्च. तो स्त्रीच्या कह्यात द्यावा आणि खर्चाचा अधिकारही तिच्याकडे असावा’, असे स्पष्ट म्हटले आहे.

‘अर्थस्य सङ्ग्रहे चैनां व्यये चैव नियोजयेत् ।’ (मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ११) म्हणजे ‘(पतीने आपल्या पत्नीला) धनाचा संचय, तसेच व्यय (खर्च) या कार्यांमध्ये सहभागी करून घ्यावे.’

मनूने स्त्रीविषयी काढलेल्या उद्गारांविषयी अप्रबुद्ध म्हणतात की, संततीच्या हिताकरताच कठोरपणाने स्त्री स्वभावातील सत्य त्याने दाखवले आहे. हे विवादात्मक विधान आहे, असे वाटते. याच विभागणीत पुरुष ‘स्त्रीचा रक्षक’ आणि स्त्री ‘संस्कृतीची रक्षक’, असा एक उपमुद्दा या प्रकरणात येतो. स्त्रीचे रक्षण हे पुरुषाचे महत्त्वाचे कर्तव्य ! ‘अगदी अशा वेळेला ब्राह्मणानेही हाती शस्त्र घेऊन लढले, तरी चालेल; पण स्त्रीचे रक्षण कुठल्याही परिस्थितीत करावे’, असे मनूने म्हटले आहे; पण मनु ‘अस्वतन्त्राः स्त्रियः कार्याः ।’ (मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक २) म्हणजे ‘स्त्रियांना स्वतंत्र ठेवू नये/स्त्रियांना कोणत्या तरी नियंत्रणाखाली ठेवावे, स्वतःच्या तंत्राने वागू देऊ नये’, असे म्हणतो. तेव्हा मात्र मनूचे म्हणणे कळू लागते आणि मनूचे म्हणणे योग्य कसे आहे, हे प्रबुद्ध दाखवून देतात. ‘ज्याच्या रक्षणाचा सर्वस्वी भार आपण घेतो. त्याला आपल्या तंत्राने वागावयास लावणे भागच पडते. त्याने हवे तसे वागावे आणि आपण मात्र त्याचे रक्षण करावे, हे संभवत नाही. त्या व्यक्तीचे रक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीला काही बंधने घालून देणे, हेही आवश्यक ठरते आणि हेच मनूने सांगितले’, असे अप्रबुद्ध म्हणतात. एकंदरीत स्त्री-पुरुषांचे परस्पर प्रेम, त्यांच्या स्वभावातील भेद आणि त्या सगळ्याचा संस्कृती अन् धर्मशास्त्र यांनी केलेला विचार अशा कक्षा अप्रबुद्ध रुंदावत नेतात. ‘विवाहशास्त्र’ यात या सार्‍या उपविषयांचा अंतर्भाव करून स्त्री-पुरुष, समाज आणि संस्कृती यांचे एक समग्र चित्र आपल्याला दिसेल, याची व्यवस्था करतात.’

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२)