आंबेगाव बुद्रुक (पुणे) येथील १० बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा नोंद !
विनाअनुमती बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेची कारवाई !
पुणे – आंबेगाव बुद्रुक येथे महापालिकेची कोणतीही अनुमती न घेता ११ इमारती बांधल्या होत्या. या इमारतींवर अतिक्रमण विभागाने कारवाई करत त्या पाडून टाकल्या. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधून सदनिकाधारकांची फसवणूक केली, अशा १० बांधकाम व्यावसायिकांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. (महापालिका प्रशासनाने केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्या बांधकाम व्यावसायिकांना त्वरित शिक्षा कशी होईल, याचाही प्रयत्न केला पाहिजे !– संपादक) कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. या इमारतींचे बांधकाम चालू असतांना वर्ष २०२१ मध्ये बांधकाम विभागाने केवळ नोटीस देण्याची कारवाई केली होती. (ज्या वेळी नोटीस बजावली, त्याच वेळी झालेले बांधकाम पाडून टाकले असते, तर सदनिकाधारकांची फसवणूक झाली नसती ! – संपादक) त्यानंतरही पुन्हा या ठिकाणी प्रत्येकी ६ मजली इमारती बांधण्यात आल्या. विनाअनुमती बांधलेल्या ११ इमारतींतील ४५ सहस्र ५० चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले आहे.