गुरुदेवांवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाणार्या कतरास, झारखंड येथील सनातन संस्थेच्या ८३ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (वय ८१ वर्षे) !
११.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी कतरास (झारखंड) येथील सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका यांच्या आई पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (सनातनच्या ८३ व्या व्यष्टी संत, वय ८१ वर्षे) यांच्याशी संवाद साधला. या वेळी पू. प्रदीप खेमका, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या समष्टी संत) आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. या सुसंवादातून उलगडलेला पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
१. लहानपणापासूनच कर्मकांडाची साधना करणे आणि सनातन संस्थेद्वारा सांगितलेली साधना करतांना मुलाच्या सांगण्यामुळे ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव समवेत आहेत’, या भावाने कृती करणे
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : पू. आई, आपण या मायेतील जगात राहून एवढे चांगले साधनेचे प्रयत्न कसे केलेत ?
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका : मी लहानपणीही कर्मकांड करत होते, उदा. मी गीतावाचन करत होते आणि रामायणही वाचत होते. मी प्रतिदिन मंदिरात जात होते. मला ते फार आवडायचे. नामजप करता करता प.पू. गुरुदेवांवर माझी एवढी श्रद्धा बसली की, मी प्रदीपला (मुलाला) विचारले, ‘‘प्रदीप, मी आता (साधनेत) पुढे पुढे कशी जाऊ ? मला नक्की काय करायला पाहिजे ? तू मला सांग.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आई, तू प्रत्येक क्षणी प.पू. गुरुदेवांना तुझ्या समवेत ठेव.’’ नंतर माझे तेच झाले. ‘मी दात घासत असले, तरी ‘प.पू. गुरुदेव हे दातही आपणच मला दिले आहेत. आपल्या कृपेनेच मी या दातांची स्वच्छता करत आहे. आपल्या कृपेनेच मी हे कपडे परिधान करत आहे. आपल्या कृपेनेच मी स्नान करत आहे. आपल्या चरणांवर मी झोपत आहे. आपल्या कृपेनेच मी हे सर्व करत आहे’, असे वाटून ‘प.पू. गुरुदेवच माझ्या जीवनात सर्वकाही आहेत’, याची मला जाणीव झाली.
२. सनातनशी जोडले गेल्यानंतर गुरुदेवांनी आईला चिंतामुक्त करणे
पू. प्रदीप खेमका : मुलाची काळजी करणे, हा प्रत्येक आईचा स्वभाव असतो. तशी माझी आई आमची चिंता करायची. वर्ष २००० मध्ये आम्ही सर्वांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केली. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी आईची सगळी चिंताच मिटवून टाकली. मला असे वाटले, ‘प.पू. गुरुदेव म्हणत आहेत की, मी आहे ना काळजी करणारा ? तुम्ही कशाला चिंता करता ?’ ही गोष्ट तिच्या मनमंदिरात ठसली. ‘प.पू. गुरुदेव आहेत, तर तेच चिंता करतील. मी कशाला काळजी करू ? असे समर्पण झाले पाहिजे’, असा मनाचा भाव असला पाहिजे. आपण सत्संगात सांगतो, ‘ईश्वराच्या चरणी आपले सर्वस्व समर्पण करावे. तन-मन-धन-प्राणही अर्पण करावे.’ त्याचे प्रात्याक्षिक आमच्या कुटुंबात दिसून येते. त्यासाठी आम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. प.पू. गुरुदेवांनी आमची चिंता स्वतःकडे घेतली अाणि माझ्या आईला चिंतामुक्त केले.’
३. अहं अल्प असल्यामुळे पुत्राचे निधन झाल्यावरही मनाच्या विचलित स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सुनेला विचारून प्रयत्न करणे
पू. (श्रीमती) खेमका : अलीकडेच सुदीपचे (दुसर्या क्रमांकाचा मुलगा) निधन झाले. तेव्हा माझे मन पुष्कळ विचलित झाले होते. मी प.पू. गुरुदेवांनाच प्रार्थना करत होते, ‘आपणच माझे मन शांत करावे.’ रात्री झोपतांना ‘गुरुदेवजी, गुरुदेवजी, गुरुदेवजी, आपल्या चरणांपाशीच मी झोपत आहे’, असे म्हणतच मी झोपत होते.
पू. (सौ.) सुनीता खेमका : आई मला भ्रमणभाष करून विचारायच्या, ‘‘सुनीता बघ ना, माझ्या जीवनातील सगळा रसच निघून गेला आहे. मी काय करू ?’’ तेव्हा मी म्हणत असे, ‘‘आई, तुमच्या समवेत प.पू. गुरुदेव आहेत ना !’’ त्यावर आई त्वरित ती गोष्ट ऐकायच्या. एके दिवशी त्यांनी मला म्हटले, ‘‘मला झोपच येत नाही, तर मी काय करू ?’’ मी आईंना सांगितले, ‘‘आई, तुम्ही असा विचार करा की, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तुमच्या उशाशी बसल्या आहेत. त्या तुमच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवत आहेत.’ असा विचार करत झोपा. तुम्हाला नक्की झोप येईल.’’ आईंनी प्रयत्न करून मला दुसर्या दिवशी सांगितले, ‘‘काल तू जसे मला सांगितले, तसेच मी केले. त्यानंतर मला खरोखरच झोप लागली.’’
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : फारच छान ! त्यांच्याकडून हा गुण शिकायला मिळतो. विचारण्याची वृत्ती असल्यामुळे त्या प्रसंगात न अडकता त्वरित प्रसंगातून बाहेर पडतात.
पू. (सौ.) सुनीता खेमका : जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते, त्या वेळी आपले मन कसे म्हणते, ‘भगवंताने माझे असे वाईट का केले ?’ मात्र आईंनी अशा परिस्थितीत मन स्थिर ठेवून नामजप हळूहळू एवढा वाढवत नेला की, आईंचा साधनाप्रवास (वेगाने) झाला.
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : आधीपासूनच त्यांचा साधनेचा पाया होता, आता जसे आईंनी सांगितले की, मंदिरात जाणे, गीतावाचन करणे. त्या साधनेमुळेच त्यांची त्या वेळीही एवढी आत्मशक्ती जागृत होती.
४. ‘गुरुदेवांचे दर्शण घेणे, हीच सर्वांत मोठी भेट आहे’, या भावात रहाणार्या पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका !
पू. (श्रीमती) खेमका : माझ्या विवाहाचा ५० वा वाढदिवस होता. तेव्हा अर्चनाने (धाकट्या सूनेने) मला विचारले, ‘‘आई, तुम्हाला काय भेटवस्तू पाहिजे ?’’ तेव्हा मी म्हटले, ‘‘माझी प.पू. गुरुदेवांचे दर्शन घडवून आण. मला यापेक्षा दुसरी कोणतीच भेट नको.’’ त्यानंतर ती मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प.पू. गुरुदेवांकडे घेऊन आली.
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : किती सुंदर ! त्यांच्या विवाहाचा वाढदिवसही येथेच आणि आपला वाढदिवसही येथेच साजरा झाला.
पू. (श्रीमती) खेमका : माझा वाढदिवस डिसेंबरमध्ये होता आणि त्यांचा (यजमानांचा) फेब्रुवारीमध्ये होता. तर प.पू. गुरुदेवांनी आम्हा दोघांनाही एकसारख्याच वस्तू (गुरुकृपायोगाचा लोगो) भेट दिल्या होत्या. नंतर प.पू. गुरुदेवांनी मला त्याच वेळी म्हटले होते, ‘‘तुमच्या घरात दोन गोष्टी आहेत. ‘लक्ष्मीही’ आहे आणि ‘साधनाही’ आहे.’’ नंतर ते म्हणाले, ‘‘तुम्ही आपल्या मुलांवर एवढे चांगले संस्कार कसे केलेत ?’’ त्यावर मी म्हटले, ‘‘प.पू. गुरुदेव, मी कोण आहे त्यांच्यावर संस्कार करणारी ? सगळे आपणच करत आहात. मला काहीच येत नाही. मी कोणतेच संस्कार केले नाहीत. आपणच मुलांना शिकवत आहात.’’
५. साधकांना संदेश – आपत्काळाचा सामना करण्यासाठी नामजप वाढवा आणि गुरुदेवांना शरण जा !
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : पू. आई, आता सर्व लोक साधना करत आहेत. आपत्काळही हळूहळू वाढत चालला आहे. आपण साधकांसाठी काय मार्गदर्शन करू इच्छिता ?
पू. (श्रीमती) खेमका : त्यांनी अधिकाधिक साधनेत रहायला पाहिजे. अधिकाधिक नामजप करायला पाहिजे. माझी धाकटी बहीण आहे ना, तिलाही मी चार वर्षांपासून सांगते की, तू अधिकाधिक प्रार्थना आणि नामजप कर. प.पू. गुरुदेवांना शरण जा.
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : आपण सर्व जण आज येथे आलात आणि आम्हाला शब्दांच्या पलीकडचे मार्गदर्शन लाभले. आपल्या चैतन्याचाही आम्हाला लाभ झाला. या सर्व गोष्टींसाठी मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. भगवान श्रीकृष्णानेही निर्विघ्नपणे आपला हा सुसंवाद करून घेतला. आपण त्याच्याही चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |