Inauguration Atal Setu: पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन !
देशातील सर्वांत मोठा सागरी पूल !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. १२ जानेवारीपासून हा अटल सेतू नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधानांनी दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून प्रवास केला.
‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ची वैशिष्ट्ये !
देशातील हा सर्वांत मोठा सागरी पूल ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एम्.एम्.आर्.डी.ए.) उभारला आहे. या पुलाची एकूण लांबी २२ किलोमीटर आहे. त्यांपैकी १६.५ किलोमीटरचा भाग समुद्रात आणि अनुमाने ५.५ किलामीटरचा भाग भूमीवर आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. १ सहस्र खांबांवर हा पूल उभारण्यात आला आहे.
प्रतीघंटा ७० सहस्र वाहने प्रवास करू शकतील, इतकी या पुलाची क्षमता आहे. २१ सहस्र कोटी रुपयांचा हा प्रकल्प समुद्र, भूमी आणि दलदल अशा ३ भागांमध्ये उभारण्यात आला आहे. १० देशांतील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हा पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक अभियंते, १६ सहस्र ५०० हून कुशल कामगार यांनी ३ पाळ्यांमध्ये अहोरात्र काम करून या पुलाचे बांधकाम केले. या पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ३ मार्गिका आहेत.
अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर याच पुलावरून प्रवास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी उरण (जिल्हा रायगड) येथे सभास्थळी पोचले. या वेळी विविध समाजपयोगी प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
बांधकामात वापरलेल्या स्टीलचे वैशिष्ट्य !
या प्रकल्पामध्ये एकूण १ लाख २ सहस्र टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्या स्टीलमध्ये बंगालमधील ४ हावडा ब्रीजची निर्मिती होऊ शकते, इतकी या पुलाची व्याप्ती आहे. या प्रकल्पासाठी ८ लाख ८० सहस्र क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रिटपेक्षा या पुलाला ६ पट अधिक काँक्रीट लागले आहे. या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील हे आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या १७ पट अधिक आहे.
अटल सेतू संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अटल सेतूमुळे २ घंट्यांचे अंतर २० मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे इंधन आणि वेळ वाचणार आहे. भविष्यात हा सेतू संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देईल. या सेतूमुळे मुंबईशी पुणे, वसई, विरार आणि गोवा जोडले जाणार आहे.
उपनगरांतून मुंबईला १ घंट्यात पोचण्याचे स्वप्न ३-४ वर्षांत पूर्ण करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अटल सेतूला ‘कोस्टल रोड’ जोडण्यात येणार आहे. या सेतूला वांद्रे येथे जाणारा मार्गही जोडण्यात आला आहे. या सेतूला जोडणार्या विविध मार्गांमुळे वर्सोवा ते विरार मार्ग आणि विरार ते रामनाथ (अलिबाग) हा नवीन मार्ग होणार आहे. यामुळे उपनगरांतून मुंबईत १ घंट्यात पोचण्याची पंतप्रधान मोदी यांनी वर्ष २०१९ मध्ये मांडलेली संकल्पना आम्ही ३-४ वर्षांत पूर्ण करू.
‘जय श्रीराम’ जयघोषात पंतप्रधानांना अभिवादन !
अयोध्यामध्ये श्रीराममंदिर झाले पाहिजे, हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही स्वप्नपूर्ती झाल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना ‘जय श्रीराम’चा जयघोष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थितांना उभे राहून ‘जय श्रीराम’चा जयघोष केला.