Papua Police On Strike : पापुआ न्यू गिनीमध्ये पोलीस संपावर गेल्याने झालेल्या हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू
पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी) – येथील पोलिसांनी १० जानेवारीपासून संप पुकारला आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. अशा स्थितीत पोलिसांच्या वेतनात वाढ होण्याऐवजी ५० टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेले पोलीस संपावर गेले असून या निर्णयाच्या निषेधार्थ ते संसदेबाहेर बसले आहेत.
Papua New Guinea 🇵🇬 Police go on strike, 15 dead in resultant violence.#InternationalNews pic.twitter.com/vbWZ0WPac8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2024
पोलीस संपावर गेल्यामुळे शहरात हिंसाचार वाढला. लोकांनी येथील लुटमार चालू केली. लोकांनी व्यापारी संकुल आणि दुकाने यांमध्ये घुसून तोडफोड केली आणि वस्तू पळवून नेल्या. काही लोकांनी रस्त्यावर उभी असलेली वाहने आणि छोटी दुकाने पेटवून दिली. लोकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लावली. पोर्ट मोरेस्बी आणि लाए या शहरांतील हिंसाचारात एकूण १५ जणांचा मृत्यू झाला.
सौजन्य एबीसी न्यूज
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी देशवासियांची मागितली क्षमा !
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी देशाला संबोधित करतांना सांगितले की, अशा प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही. पोलीस नसल्याचा लाभ लोकांनी घेतला. कायदा मोडणे चुकीचे आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. या घटनेमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. या संपूर्ण घटनेवरून मी क्षमा मागतो. संगणकातील तांत्रिक बिघाडामुळे पोलिसांचे वेतन अल्प झाले आहे. तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त केला जाईल. पुढील महिन्यातील सर्वांचे वेतन मागील थकबाकीसह मिळणार आहे. सामाजिक माध्यमांवर चुकीची माहिती पसरली आणि लोकांनी ती खरी म्हणून स्वीकारली. हेच हिंसाचाराचे कारण बनले.