विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे ‘प्रस्तावित मार्गदर्शक कार्यपद्धती’ स्थगित करण्याचा विद्यापिठाचा निर्णय !
पुणे – विद्यापिठांमध्ये घडणार्या अनुचित घटनांना आळा बसावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती प्रस्तावित केली होती; मात्र विद्यार्थी संघटनांनी या कार्यपद्धतीला विरोध दर्शवल्याने ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्यासाठी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन केले होते. कुलगुरूंनी कार्यपद्धती सिद्ध करण्यामागील भूमिका मांडल्यावर ही कार्यपद्धती करण्याची आवश्यकता विद्यापिठाला निर्माण का झाली ? असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला.
कार्यपद्धतीमधील प्रस्तावित सूत्रे
१. विद्यार्थ्यांनी आंदोलने, उपक्रम घेणे यांसाठी ५ दिवस आधी विद्यापीठ तसेच पोलीस प्रशासन यांची अनुमती घ्यावी.
२. आंदोलनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संघटनांचे दायित्व असेल. आंदोलनामुळे विद्यापिठाच्या मालमत्तेची हानी होणार नाही, याची लेखी हमी देणे आदी सूत्रे कार्यपद्धतीमध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी कार्यपद्धतीला विरोध दर्शवला. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, तसेच आंदोलन करण्याच्या हक्कावर गदा येत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे अटी असलेली कार्यपद्धती रहित करावी लागली. या संदर्भातील मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे, तसेच युवक काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी मांडले.