राजमाता जिजाऊ !
आज ‘राजमाता जिजाऊ यांची जयंती (दिनांकानुसार)’ त्या निमित्ताने…
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या, गनिमी कावा आणि पराक्रम अशा राजस, तसेच धर्माचरण, ज्ञान, चारित्र्य अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती ! त्यानिमित्त त्यांच्या उत्तंग कर्तृत्वास शतश: वंदन ! जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे लखुजी जाधव आणि म्हाळसाराणी यांच्या पोटी वर्ष १५५८ मध्ये झाला.
१. सामाजिक परिस्थितीची उत्तम जाण
महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात त्या काळी मोगल अन् विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. शत्रूचे सरदार आया-बायांची अब्रू वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत असे. समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकर्यांचीही वाईट अवस्था होती. ‘पिकवावे आपण आणि धान्य द्यावे बादशाहला. घाम गाळावा; पण पोट भरू नये’, अशी समाजाची स्थिती होती. ती परिस्थिती पाहून लहानग्या जिजाऊचे मन विषण्ण होत असे. समाजाची ही दयनीय स्थिती पालटण्यासाठी तिचे मन बंड करून उठत असे. जीव तळमळत असे.
२. लढाऊ वृत्ती
खेळण्याच्या-बागडण्याच्या वयात लष्करी प्रशिक्षणासाठी जिजाऊ लखुजींकडे हट्ट करत असत. म्हाळसाईंनी सांगितलेल्या शूरवीरांच्या कथा ऐकून जिजाऊंना स्फुरण चढे. त्यामुळेच त्यांच्यातील शौर्य आणि निर्भयता या गुणांना प्रोत्साहन मिळाले. पिता आणि वडील बंधूंच्या छत्रछायेखाली माहेरी असतांना त्यांनी राजनीती, तसेच युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. पुढे छत्रपती शिवरायांना शिक्षण देतांना त्यांना याचा उपयोग झाला.
३. कर्तव्यनिष्ठा
शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यावर काही कारणास्तव भोसले आणि जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतीनिष्ठेला महत्त्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजूला ठेवून कर्तव्याला महत्त्व देत खंबीरपणे अन् धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगीही आला होता.
४. ध्येयपूर्तीसाठी सदैव कार्यरत
पराक्रमी शहाजीराजांची होत असलेली ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही इत्यादी शाह्यांमध्ये पराक्रम गाजवूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ‘सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही’, या विचाराने जिजाऊ सतत अस्वस्थ होत. त्यांना या अन्याय-अत्याचार यांविरुद्ध लढणारा वीर पहायचा होता. ‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सुपुत्र दे. कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल, असा पुत्र जन्माला येऊ दे’, अशी प्रार्थना जिजाऊंनी श्री भवानीदेवीला केली. पुत्र शिवरायाच्या समयी गरोदर असतांना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणार्या माता जिजाऊंनी जणू स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली !
५. छत्रपती शिवरायांवर केले राष्ट्ररक्षण आणि धर्मपालन यांचे संस्कार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने जिजाऊ त्यांना प्रभु श्रीराम, मारुति, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत. याच माध्यमातून त्यांनी शिवरायांना राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडू पाजले. ‘स्वराज्य’ या संकल्पनेचे बीज या थोर मातेनेच शिवरायांच्या मनात रुजवले. ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्हाला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आहे’, असा प्रचंड आत्मविश्वास आणि उच्च ध्येय त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केले. इतिहासातील शौर्याच्या आणि न्यायाच्या कथा त्या शिवबांना प्रतिदिन सांगत, तर दुसरीकडे राजकारणाचे धडे, जहागिरीची व्यवस्था आणि शालेय शिक्षण यांची माहितीही स्वतः माता जिजाऊच राजांना देत असत. न्यायनिवाडा करण्याचे प्रशिक्षण राजांना मिळाले, तेही राजमाता जिजाबाईंकडूनच. शिवाजीराजांना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी अत्यंत खंबीरपणे मार्गदर्शन केले. या समाजात मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणार्या माता आढळणे दुर्मिळ; पण एका मातेने ती किमया करून दाखवली आणि शतकानुशतके रयतेवर अन्याय करणार्या दैत्यांचा नि:पात झाला. राजमाता जिजाऊंनी केलेल्या संस्कारांच्या बळावरच छत्रपती शिवरायांनी सहस्रो वर्षांची गुलामगिरी मोडून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली !
६. प्रचंड संयम
शहाजीराजांची कैद आणि सुटका, अफझलखानाची स्वारी, शिवरायांची आग्र्याची कैद आणि सुटका, मोगलांकडून होणारी आक्रमणे अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी छत्रपती शिवरायांना दिली. मुले आईकडून सदाचार आणि प्रेम यांचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात; पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका अत्यंत समर्थपणे पार पाडल्या. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ एकप्रकारे स्वराज्यासाठीच लढत राहिल्या !
७. व्यापक ध्येयासाठी सर्वस्वाचा त्याग
राजमाता जिजाबाईंचे ५ पुत्र मृत्यूमुखी पडले होते. एकटे छत्रपती शिवाजी महाराज जगले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्यावरही अनेक संकटे ओढवत होती; पण त्याही स्थितीत कठोर मनाने त्या शिवरायांना ध्येयपूर्तीसाठी यशस्वी होण्याचे आशीर्वाद आणि प्रेरणा देत होत्या ! विविध मोहिमांवर जातांना त्यांनी शिवरायांना कधीही मागे रोखले नाही.
८. धर्मपालन अन् धर्माचरण करणारी आदर्श माऊली !
राजमाता जिजाबाई स्वत: धर्माचरण आणि धर्मपालन करत असत. तेच संस्कार त्यांनी शिवरायांवर केले. त्यांच्या विचारप्रक्रियेला धर्मप्रवण बनवले. हिंदु धर्माची शिकवण शिवबाला दिली. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि अद्वितीयत्व त्यांनी शिवबांना कृतीतून समजावले, त्यामुळेच स्वतःच्या धर्माप्रती, धर्मातील परंपरांविषयी छत्रपती शिवाजी महराजांच्या मनात प्रचंड निष्ठा, आदर होता. तरीही त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार केला नाही. केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या शत्रूरूपी संकटावर मात कशी करावी ? स्त्रीदाक्षिण्य हे जिजाबाईंनी शिवबांना शिकवले. माता केवळ मायाळू नसून ‘शक्तीरूपा’ असू शकते, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ती मुलांना योग्य वळण लावून घडवू शकते, याचे सर्वाेत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई !
९. सद्यःस्थितीतही युवतींनी आदर्श घ्यावा अशी माता !
आजही समाजाला राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष मातांची आवश्यकता आहे. सांप्रतकाळी विखरलेली कुटुंबव्यवस्था, स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ, ढासळलेली नैतिक मूल्ये, अनैतिकता, धर्मांधांची आक्रमणे, आतंकवाद, अशा अनेक समस्यांनी भारतमाता त्रस्त आहे. असे असतांना देशसेवेसाठी सुपुत्र घडवण्याचे महत्कार्य केवळ कर्तव्यदक्ष, राष्ट्र आणि धर्म प्रेमी माताच तडीस नेऊ शकतात ! यासाठी युवतींनी त्यांची अयोग्य विचारप्रक्रिया अन् वर्तन पालटणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम प्रत्येक युवतीने आणि महिलेने धर्माचरण केले पाहिजे. हिंदु धर्मशास्त्रातील प्रत्येक धार्मिक कृतीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊन आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, तरच मुले धर्माचरण करतील. सद्यःस्थितीत आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्त्यांचे जे अंधानुकरण चालू आहे, ते थांबायला हवे. ते सर्वस्वी मातांच्या हातात आहे. ‘सामाजिक परिस्थिती पालटण्यासाठी पुनश्च छत्रपती शिवरायांनी पृथ्वीतलावर यावे; पण तो ‘शिवाजी इतरत्र जन्माला यावा’, अशी काही मातांची चुकीची विचारसरणी आहे.
‘अनेक माताभगिनींना समाजाची, राष्ट्राची सद्यःस्थिती पालटावी’, अशी अपेक्षा असते. जादूची कांडी फिरेल आणि सर्व व्यवस्थित होईल, असे निश्चितच नाही. त्यासाठी क्रांतीच्या पथावर मार्गक्रमण करावे लागेल. राजमाता जिजाऊ यांच्याप्रमाणे आदर्श वर्तन ठेवत मातांना त्यांच्या मुलांना योग्य दिशादर्शन करून घडवावे लागेल. क्रांती करायची, तर स्वसुखाला तिलांजली देऊन, स्वतःविषयीच्या विचारांचा त्याग करून प्रसंगी मनावर दगड ठेवून आपल्याला ‘शिवाजी’ घडवायला हवेत. सांप्रतकाळी या भारतभूमीला एक नव्हे, तर अनेक शिवाजींची आवश्यकता आहे. अनेक मातांना ‘कथा-कादंबर्यांसारखे, चित्रपटातील अभिनेत्रींसारखे त्यांचे आयुष्य असावे’, असे प्रकर्षाने वाटते. त्यामुळे त्यांचे रहाणे, वागणे अभिनेत्रींसारखेच असते. आपला आदर्शच जर अयोग्य असेल, तर आपले आचरणही योग्य होणे शक्य नाही. यासाठी माता-भगिनींनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घ्यावा. सर्व गुणांचा समुच्चय असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची वेळ आता आली आहे. त्यांच्यातील गुण अंगीकारून राष्ट्र आणि धर्म यांसाठी मातांनी एक नव्हे, अनेक छत्रपती शिवाजी महाराज सिद्ध करावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! (६.१.२०२४)
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.