देवद, पनवेल येथील श्रीमती शशिकला भगत यांना ‘सर्व काही ईश्वरच करतो’, याची आलेली प्रचीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘श्रीमती शशिकला भगत यांच्या या अनुभूतीतून साधकांना खूप काही शिकण्यासारखे आहे. ‘आपण केवळ माध्यम असतो. सर्व काही ईश्वरच करतो’, हे वाक्य आपण अनेकदा वाचलेले किंवा ऐकलेले असते; परंतु श्रीमती शशिकला भगत यांनी याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याला तळमळीने प्रार्थना केल्यावर देव कसे साहाय्य करतो, याची प्रचीती त्यांना आली. देवावर सारे काही सोपवून आपण निष्ठेने गुरुसेवा केल्यास देव येणार्‍या अडचणी दूर करून आनंदाची अनुभूती देतो, हे त्यांनी अनुभवले. श्रीमती शशिकला भगत यांची देवावरील श्रद्धा, भाव आणि गुरुसेवेची तळमळ साधकांसाठी मार्गदर्शक आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! ’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले.

श्रीमती शशिकला भगत

१. पहाटे ४.३० वाजता अल्पाहाराची सेवा करायला उठल्यावर अंगात ताप असल्याचे लक्षात येणे आणि ‘आता सेवा कशी करू ?’ असा विचार मनात येऊनही ऐन वेळी कुणी साधक उपलब्ध  न झाल्याने सेवेसाठी जाणे

‘माझ्याकडे आठवड्यातून एकदा पथ्याचा अल्पाहार बनवण्याची सेवा असते. त्यासाठी मला पहाटे ४.३० ला उठावे लागते आणि वैयक्तिक आवरून ५.३० वाजता सेवा चालू करावी लागते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे पहाटे ४.३० वाजता पथ्याच्या अल्पाहाराची सेवा करायला उठले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला ताप आला असून माझे पूर्ण अंग दुखत आहे आणि मला उभे रहाण्याचेही त्राण नाही.’ तेव्हा माझ्या मनात ‘आता मी सेवा कशी करू ?’ असा विचार आला; पण ऐन वेळी सेवेसाठी कुणी उपलब्ध न झाल्याने मी ती सेवा करायला गेले.

२. प्रार्थना करून सेवेला आरंभ करणे आणि सेवा पूर्ण झाल्यावर अंगातील ताप पूर्णपणे उतरला असल्याचे लक्षात येणे, तेव्हा पुष्कळ उत्साही वाटून शरिरातून आनंददायी संवेदना येत असल्याचे जाणवणे

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले आणि श्री अन्नपूर्णादेवी यांना प्रार्थना केली, ‘हे ईश्वरा, माझी स्थिती आपण जाणता. आता ‘मी ही सेवा कशी करू ?’ हे तुम्हीच पहा.’ त्यानंतर नेहमीप्रमाणे ५.३० वाजता मी पथ्याच्या अल्पाहाराची सेवा चालू केली. सेवा करतांना मला कसलेच भान राहिले नव्हते. भगवंतानेच माझ्याकडून सेवा करून घेतली. सकाळी ९ वाजता माझी सेवा संपली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘माझ्या अंगातील ताप पूर्णपणे उतरला असून माझे अंग दुखायचे थांबले आहे आणि माझी मरगळ पूर्णतः जाऊन मला पुष्कळ उत्साही वाटत आहे.’ त्या वेळी ‘माझ्या शरिरातून आनंददायी संवेदना येत आहेत’, असे मला जाणवले. त्या संवेदना मी शब्दांत मांडू शकत नाही.

ही सेवा माझ्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वरानेच केली आणि मला आनंदही दिला. आपण सर्व साधक नेहमीच म्हणत असतो, ‘मी केवळ माध्यम आहे. सर्व काही ईश्वरच करतो.’ हे सत्य मला ईश्वराच्या कृपेने या प्रसंगात अनुभवायला मिळाले. यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती शशिकला भगत (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक