श्रीरामाच्या अखंड अनुसंधानात राहून इतरांच्या मनावरही रामनामाचे महत्त्व पटवून देणार्या ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
‘७.७.२०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या हितचिंतक पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी या संतपदी विराजमान झाल्या. त्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. ईश्वरपूर, जिल्हा सांगली येथील ‘रेडिओ शुगर’ या ‘एफ्.एम्.’ वाहिनीने त्यांच्याशी वार्तालाप साधला. या वार्तालापामध्ये पू. आजींनी उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘संसारात राहून कर्तव्याचे पालन करतांना साधना करता येणे’, हे केवळ गुरुकृपेने शक्य झाल्याचे पू. मुंगळेआजींनी सांगणे
वर्ष १९७० मध्ये पू. आजींचा विवाह झाला. त्यांच्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे आध्यात्मिक वातावरण होते. ‘सध्या मुलगा, सून, कन्या, जावई आणि नातवंडे यांचा सांभाळ करतांना साधना अन् आध्यात्मिक प्रगती हे दुहेरी कर्तव्य केवळ श्री गुरूंच्या कृपेने पेलता आले’, असे त्या आवर्जून सांगतात.
२. ‘श्रीरामाची भक्तीभावाने सेवा करून सर्वांना ‘रामनाम’ हे जीवन आनंदी बनवण्याची गुरुकिल्ली असून ते अंगीकारणे सोपे आहे’, हे सांगणार्या पू. मुंगळेआजी !
पू. मुंगळेआजींचे काही नातेवाईक हे उच्च आध्यात्मिक पातळी असणारे होते. त्यांचा आध्यात्मिक वारसा चालवणार्या त्या तपस्वी आहेत. त्यांनी भक्तीभावाने श्रीरामाचा अखंड नामजप करत श्रीरामाची सेवा केली आहे. ‘रामनाम’ हे जीवन आनंदी बनवण्याची गुरुकिल्ली आहे. सर्वसामान्यांना सध्याच्या धकाधकीच्या जीवनातही ‘रामनाम’ अंगीकारणे सोपे आहे. पू. आजींनी तशी साधना करून ते सिद्ध केले आहे.
३. सर्व चिंता दूर सारून नामजपात गुंग व्हा ! – पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी !
पू. मुंगळेआजी यांनी ‘दिसेल ते कर्तव्य, घडेल ते कर्म आणि भोगीन ते प्रारब्ध’, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या वचनाचे सतत पालन केले आहे. ‘श्री गुरु आपली सतत काळजी घेतात. त्यामुळे ‘सर्व चिंता दूर सारून रामनामात गुंग होऊन जावे’, असा भावसंदेश पू. आजींनी स्वतःच्या जीवनपटातून दिला आहे.
४. स्वप्नामध्ये मिळालेल्या पत्रात नामजप लिहिलेला असणे आणि त्यानुसार नामजप करायला आरंभ करणे
वर्ष १९८७ मध्ये पू. आजींना स्वप्नात ‘एका पोस्टमनने पत्र आणून दिले. त्या पत्रामध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप लिहिलेला वाचून त्यांनी रामाचा नामजप करण्यास आरंभ केला. श्री गुरुकृपेने प्रारंभी वही आणि पेन घेऊन नामजप लिहिण्यास आरंभ केला. तेव्हा त्यांनी १ लक्षाहून अधिक नामजप लिहिला.
५. स्वप्नात एक संन्यासी येऊन त्यांनी ‘सिद्धावस्था प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद देण्यास आलो आहे’, असे पू. मुंगळेआजींना सांगणे
त्यानंतर त्यांना पुन्हा स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक संन्यासी आले आणि त्यांनी सांगितले, ‘मी तुला सिद्धावस्था प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद देण्यास आलो आहे.’ एकादशीला होणारी श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने ऐकून त्यांची नामजपाची गोडी आणखीनच वाढली. त्यामुळे त्यांचा नामजप गतीने होऊ लागला. त्यानंतर त्यांनी माळ घेऊन नामजप करण्यास चालू केले.
६. दासबोधाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ‘समीक्षक’ म्हणून ‘श्री समर्थ दासबोध अभ्यासमंडळा’त सेवा करण्याची संधी मिळणे
त्यानंतर पू. आजींनी श्री दासबोधाचा अभ्यास करून परीक्षा दिल्या. त्या प्रत्येक मासामध्ये दासबोधाचा एक पेपर लिहून पाठवत असत. ३ वर्षांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांना ‘समीक्षक’ म्हणून ‘श्री समर्थ दासबोध अभ्यासमंडळा’त सेवा करण्याची संधी मिळाली.
७. पू. आजींनी त्यांच्या संपर्कातील लोकांना नामजपाकडे वळवणे
हे सर्व करत असतांनाच त्यांनी शेजारी रहाणारे काही लोक आणि नातेवाईक यांनाही नामजप करण्यास सांगून मार्गदर्शन केले. त्यामुळे पू. आजींनी त्यांनाही रामनामाकडे वळवले.
८. समाजाला सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर केलेले साहाय्य !
अ. त्यांनी अनेकांना अल्पाहार अणि जेवणाचे डबे दिले.
आ. पू. आजींनी कोरोनाच्या काळात रुग्णांकडून नित्यनेमाने १०० वेळा हनुमान चालीसा पठण करून घेतली. त्यामुळे अनेक रुग्णांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य झाले.
९. ‘युवापिढीला नियमित स्तोत्रपठण आणि नामजप नित्यनेमाने करावे’, असा संदेश देणार्या पू. मुंगळेआजी !
वर्ष १९९४ – ९५ मध्ये पू. के.वि. बेलसरे यांनी पू. आजींना गोंदवले येथे अखंड नामजप होण्यासाठी आशीर्वाद दिला होता, तसेच त्यांना अनेक संतांचे मार्गदर्शन आणि सत्संग लाभला आहे. त्या त्यांच्या संपर्कात येणार्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार साधना करण्यास सांगतात. ‘दिवसभरात न्यूनतम १० मिनिटे किंवा शक्य झाल्यास त्याहून अधिक वेळ स्तोत्रपठण आणि नामजप नित्यनेमाने करावा’, हा संदेश त्यांनी सध्याच्या युवा पिढीला दिला आहे.
१०. वर्ष २००० मध्ये सांगली येथील एक आध्यात्मिक अधिकारी पू. बळवंत रामचंद्र गोखले यांनी ‘पू. आजी संत होणार’ असे भाकीत केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘स्वतःसाठी जगलास, तर मृत्यू पावलास आणि इतरांसाठी जगलास, तर खर्या अर्थाने जगलास’, असा संदेश दिला आहे. ‘आता उरलो केवळ उपकारासाठी’, त्याप्रमाणे ‘यापुढे मार्गक्रमण करून केवळ इतरांसाठी जगायचे आहे’, असे पू. आजींनी वार्तालापात सांगितले. ‘वयाच्या ७६ व्या वर्षीही पू. आजींचा उत्साह, मुखमंडलावरील प्रसन्नता, नम्रता आणि समाजाच्या मनावर नामजपाचे महत्त्व पटवून देण्याची तळमळ’, हे सर्व पुढील पिढीला स्फूर्ती देणारी आहे.’
– श्री. संजय मुंगळे (पू. आजींचे पुत्र), ईश्वरपूर, जिल्हा सांगली. (१३.११.२०२३)