अमरावती येथील सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा पाया असलेल्या नामजपातील अडथळे दूर करण्याविषयी सांगितलेली सूत्रे !
‘नामजप हा व्यष्टी आणि समष्टी साधनेचा पाया आहे. त्यासाठी साधकांनी नित्यनेमाने नामजप करणे आवश्यक आहे. नामजप करतांना येणार्या विविध अडथळ्यांवर मात करून नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘नामजप करतांना येणारे अडथळे आणि त्यावर मात करायचा कसा प्रयत्न करू शकतो ?’, ते येथे दिले आहे.
१. एका जागी बसून नामजप न केल्यामुळे साधकांवर त्याचा स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर परिणाम होणे
बर्याच साधकांकडून एका जागी बसून नामजप केला जात नाही किंवा त्यांना नामजप करतांना काही अडथळे येतात. त्यामुळे त्यांचा नामजप पूर्ण होत नाही किंवा नामजपात एकाग्रता साधली जात नाही. त्यामुळे प्रतिदिन किमान जेवढा वेळ नामजप करणे अपेक्षित आहे (सर्वसाधारण २ घंटे), तो पूर्ण होत नाही. त्यामुळे त्या साधकांना ‘दिवसभर उत्साह न वाटणे, वारंवार आवरण येणे, सेवा करावीशी न वाटणे, नकारात्मकता वाढणे’, असे स्थुलातील त्रास जाणवतात, तर सूक्ष्मातील परिणाम म्हणून ‘वाईट शक्तींचे प्राबल्य वाढून साधकांना होणारे शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास वाढतात अन् त्यांचे स्वभावदोष उफाळून येतात.’
२. नामजप करतांना येणारे अडथळे आणि त्यावरील उपाय
२ अ. साधकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नियमित नामजप करावा : बरेच साधक व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगतात, ‘‘आमचा चालता-फिरता नामजप होतो.’’ प्रत्यक्षात अशा रितीने नामजप केल्याने तो एकाग्रतेने होत नाही आणि अन्य विचार मनात आल्यावर नामजपाचा विसरही पडतो. घरी बसून नामजप केल्यावर त्याचा लाभ अधिक प्रमाणात होतो; म्हणून नामजप नियमित होण्यासाठी साधकांनी नामजप करायची वेळ ठरवून घ्यावी आणि ती वेळ सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वीची असावी; कारण घरातून बाहेर पडल्यावर नामजपाचे विस्मरण होते.
२ आ. ‘झोप येऊ नये’, यासाठी करायचे प्रयत्न ! : बसून नामजप करतांना बहुतेक वेळा झोप येते. नामजप करतांना ‘झोप येऊ नये’, यासाठी ‘अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, शरिरावरील त्रासदायक आवरण काढणे, मधेमधे प्रार्थना करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, क्षमायाचना करणे किंवा काही वेळ वहीत नामजप लिहिणे’, असे प्रयत्न करू शकतो. तरीही झोप येत असेल, तर चेहर्यावर पाण्याचा शिडकावा करावा किंवा उभे राहून किंवा चालत नामजप करू शकतो. झोप अनावर होत असेल, तर एका पायावर उभे राहूनही नामजप करू शकतो.
२ इ. नामजप करतांना येणार्या विचारांवर मात करण्यासाठीचे उपाय !
२ इ १. अनावश्यक किंवा निरर्थक विचार कागदावर लिहून तो कापूर घालून जाळणे : नामजप करतांना मनात अनेक विचार येत असतात. बहुतेक वेळा ते विचार अनावश्यक, नकारात्मक, भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांविषयीचे असतात. या विचारांच्या परिणामाने साधकांना ‘नामजप करावासा न वाटणे, डोके जड होणे किंवा कुठलातरी अवयव अकस्मात् दुखणे’, असे त्रास हाेतात. साधक अनावश्यक आणि नकारात्मक विचारांना बळी पडतात अन् त्यांच्याकडून नामजप करायचा रहातो. अशा विचारांवर मात करण्यासाठी एका कागदावर मनात येणारे नकारात्मक किंवा निरर्थक सर्व विचार लिहून तो कागद त्यात भीमसेनी कापूर टाकून अग्नीसमर्पण करावा. ही कृती किमान एक आठवडा केल्यास असे नकारात्मक विचार न्यून होतात.
२ इ २. नामजप करतांना जवळ वही-पेन ठेवून सेवा किंवा घरकाम यांचे विचार आल्यावर ते एका कागदावर लिहून नामजप पूर्ण झाल्यावर ती सेवा करावी : काही वेळा नामजप करतांना साधकांच्या मनात सेवा किंवा घरकाम यांचे विचार येतात, उदा. कुणालातरी भ्रमणभाष करायची आठवण होते किंवा घरातील किंवा बाहेरील काही कामे करायची असतात. ‘ती सेवा किंवा काम विसरू नये’; म्हणून साधक लगेच त्या विचारांना प्राधान्य देत नामजप अर्धवट सोडून त्या सेवा करण्यासाठी उठतात. यावर उपाय म्हणून साधकांनी नामजपाला बसतांना वही आणि पेन किंवा पेन्सिल घेऊन बसावे. कुठल्याही सेवा किंवा काम यांचा विचार मनात आल्यावर लगेच ती सेवा किंवा काम कागदावर लिहावे आणि नामजप पूर्ण झाल्यावर प्राधान्य ठरवून त्या सेवांचे नियोजन करावे.
२ ई. नामजप करतांना भ्रमणभाष पहाणे टाळावे : आजकाल भ्रमणभाष हे अत्यावश्यक सामाजिक माध्यम झाले आहे. त्यामुळे साधक तो २४ घंटे समवेत ठेवण्याचा अट्टाहास करतात; पण नामजप करतांना भ्रमणभाष समवेत न ठेवल्याने नामजपातील मुख्य अडथळा दूर होतो. भ्रमणभाष जवळ ठेवल्यामुळे नामजपाच्या कालावधीत भ्रमणभाषवर कुणाचा संदेश आल्यावर तो संदेश महत्त्वाचा नसला, तरी साधक नामजप थांबवून तो पहातात आणि त्याला उत्तर देण्यात वेळ घालवतात किंवा नामजप करतांना भ्रमणभाष आला आणि तो महत्त्वाचा नसला, तरी साधक तो घेतात. त्यामुळे नामजपातील एकाग्रता टिकून रहात नाही. साधक नामजप पूर्ण झाल्यावर भ्रमणभाषवरील संदेश पाहू शकतात किंवा नामजप करतांना आलेल्या भ्रमणभाषवर संपर्क करू शकतात.
३. नामजप करतांना बहुतेक वेळा वाईट शक्तींनी अडथळे आणणे
‘नामजप करणे’, हा केवळ व्यष्टी साधनेचा नाही, तर समष्टी साधनेचाही पाया आहे’, हे वाईट शक्ती जाणतात. त्यामुळे नामजप करतांना येणारे अडथळे हे बहुतेक वेळा वाईट शक्तींनी आणलेले असतात; म्हणून साधकांनी नामजपादी उपाय गांभीर्याने केले पाहिजेत.
४. ‘प्रतिदिन नामजप करणे’, हे साधनेसाठी बलवर्धक असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला नामजप करणे, म्हणजे त्यांचे आज्ञापालन असणे
‘नामजप करणे’ हे साधनेसाठी जणू प्रतिदिन घ्यायचे बलवर्धक (टॉनिक) आहे आणि आपल्याला आपले गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नामजप करायला सांगत आहेत. थोडक्यात ‘नामजप करणे’, म्हणजे श्री गुरूंचे आज्ञापालन करणे आहे आणि आज्ञापालनाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण सर्व साधक जाणतोच !
नामजप करतांना या व्यतिरिक्त अन्य काही अडथळे येत असतील, तर साधक उत्तरदायी साधक, प्रसारसेवक किंवा संत यांना वेळोवेळी विचारू शकतात. साधकांनी नामजपात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने होईल.’
– (पू.) अशोक पात्रीकर, अमरावती. (९.१२.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |