Ram Temple Inauguration: श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जगातील १६० देशांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन !
नवी देहली – अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जगातील १६० देशांमध्ये विविध कार्यक्रम आयाजित करण्यात आले आहेत. या संदर्भात विश्व हिंदु परिषद प्रयत्न करत आहे. ५० देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. अमेरिकेत ३०० ठिकाणी, कॅनडामध्ये ३०, ब्रिटनमध्ये २५, मॉरिशसमध्ये १००, तर ऑस्ट्रेलियात ३० ठिकाणी श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आर्यलँड, फिजी आणि जर्मनी येथेही थेट प्रक्षेपण होणार आहे. ५० देशांच्या प्रतिनिधींना अयोध्येत उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. इंडोनेशिया आणि सौदी अरेबिया यांसारख्या इस्लामी देशांमध्येही थेट प्रक्षेपणाचा प्रयत्न केला जात आहे.
उत्तर अमेरिका आणि कॅनडा येथे ‘द मांडू मंदिर एम्पॉवरमेंट काऊन्सिल’ या संघटनेने अनेक मंदिरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत, तसेच अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि शिकागो या शहरांसह कॅलिफोर्नियामध्येही वाहनफेरी काढण्यात येणार आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे, तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी मोठ्या पडद्यांवर श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पॅरिसमध्ये २१ जानेवारी या दिवशी रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी युरोपमधील हिंदू येणार आहेत.