संगीत-मुमुक्षू, संशोधक, तत्त्वज्ञ आणि संगीतयोगी पंडित कुमार गंधर्व !

पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्या निमित्ताने…

‘यावर्षी पंडित कुमार गंधर्व (जन्म – ८.४.१९२४, मृत्यू – १२.१.१९९२) यांचे जन्मशताब्दी वर्ष त्यांचे गायनप्रेमी साजरे करत आहेत. ‘अध्यात्माच्या दृष्टीतून जीवनाकडे पहाणार्‍या अभ्यासकांसमोर पं. कुमारजींच्या (त्यांचे गायन आवडणारे त्यांना ‘कुमारजी’ संबोधतात.) जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे ठेवणे’, हे या लेखाचे मुख्य प्रयोजन आहे. पं. कुमारजींना फार मोठ्या पूर्वसुकृताने अगदी तरुणपणातच दैदीप्यमान यश प्राप्त झाले; मात्र गुरूंकडून संगीताचे शास्त्र समजल्यानंतर त्यांना स्वतःची मर्यादा लक्षात आली. त्यानंतर संगीतातील मुमुक्षत्वामुळे ते संगीताचे उपासक झाले आणि मग संशोधक, तत्त्वज्ञ अन् संगीतयोगी झाले. ‘पं. कुमारजींच्या निर्गुणी भजनांविषयी काही मांडणे’, हे या लेखाचे दुसरे प्रयोजन आहे. मला पं. कुमार गंधर्व यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

(या लेखात ते ते गीत ऐकण्यासाठी ‘लिंक’ / ‘क्यू.आर्. कोड’ दिले आहेत. त्या त्या सूत्राचे वाचन करतांना वाचक तेथेच ते गीत ऐकू शकतात.)

(पूर्वार्ध)

१. पंडित कुमार गंधर्व यांच्या गायनाची पार्श्वभूमी !

पंडित कुमार गंधर्व

१ अ. गायक घराण्यात जन्म होणे : पंडित कुमार गंधर्व यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ. बेळगावपासून २ कि.मी. अंतरावरील ‘सुळेभावी’ हे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे वडील जवळच्या लिंगायत मठात सेवा करायचे. त्यांच्या घरात त्यांचे वडील, आई, मोठे बंधू आणि त्यांचे मामा हे सर्व जण गाणारे होते.

१ आ. वयाच्या ६ व्या वर्षी अकस्मात् उत्तम प्रकारे गाऊ लागणे : पं. कुमारजींच्या जन्मापासूनच त्यांच्या कानावर गायन आणि तंबोरा यांचे सूर पडत होते. ते ५ – ६ वर्षांचे असतांना एकदा त्यांच्या मोठ्या भावाचे गायन संपल्यावर अकस्मात् ते २ तंबोर्‍यांच्या मध्ये जाऊन बसले आणि गाऊ लागले. तेव्हापासून ते गायला लागले. तोपर्यंत त्यांना कुणी जाणीवपूर्वक गायन शिकवले नव्हते किंवा कुणी गायला सांगितले नव्हते. अशी गाण्याची आतून उत्कट प्रेरणा होणे, हे विशेष आहे.

२. लिंगायत स्वामीजींनी ‘कुमार गंधर्व’, असे नामकरण करणे !

एकदा लहान वयातील कुमारजींचे गाणे त्यांच्या घराजवळच्या ‘गुरुकल्ल’ मठात झाले. कुमारजींचे गायन ऐकून मठातील स्वामीजी प्रभावित झाले आणि ते कुमारजींना म्हणाले, ‘तुम्ही कुमार गंधर्व आहात !’ तेव्हापासून त्यांचे नाव ‘कुमार गंधर्व’ झाले. यावरून ‘कुणा गंधर्वाने पृथ्वीवर येण्यासाठी गायक घराणे निवडले होते’, असे म्हणता येईल.

३. उत्तम गाण्यामुळे लहान वयातच मिळालेली प्रसिद्धी, यश आणि मान्यता !

या प्रसंगानंतर कुमारजींचे वडील त्यांना गायनासाठी ठिकठिकाणी घेऊन जाऊ लागले. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांचे गायनाचे जाहीर कार्यक्रम त्या वेळच्या भारतातील दिग्गजांसमोरही झाले होते. एका संगीत परिषदेत श्रोत्यांमध्ये स्व. कुंदनलाल सैगल, उस्ताद फैय्याज खां साहेब यांसारख्या दिग्गज व्यक्ती होत्या. कार्यक्रम संपताच उपस्थितांनी कुमारजींवर बक्षीसे, पैसे, वस्त्रे यांची  अक्षरशः वृष्टीच केली. यामुळे कुमारजींची प्रसिद्धी सर्वदूर झाली. (http://tinyurl.com/mr2ufffw)

४. सावंतवाडी नरेशांनी घेतलेली विलक्षण परीक्षा !

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

कुमारजींना तेव्हा केवळ कन्नड भाषा येत होती. सावंतवाडीच्या नरेशांना वाटत होते, ‘हा मुलगा कुणाचे काही आधी ऐकून, नंतर चांगले पाठांतर करून गात असेल.’ त्यांनी नुकतीच एक आठवड्यापूर्वी त्यांच्याकडे आलेली आणि अजून बाजारातही उपलब्ध न झालेली उस्ताद रहिमत खां साहेब यांची एक ध्वनीफित (रेकॉर्ड) कुमारजींना देऊन म्हणाले, ‘‘ही ऐका अन् गाऊन दाखवा !’’ ती ध्वनीफित लावण्यात आली आणि खां साहेबांनी आरंभीचा ‘आ’ म्हणताच खां साहेबांच्या समवेतच आणि अगदी त्यांच्यासारखे कुमारजींचे गायन चालू झाले !

५. गायकाने गायन चालू करतांच ‘तो काय गाणार ?’, हे समजण्याची आणि गायकांच्या गायकीची तंतोतंत ‘नक्कल’ करण्याची क्षमता !

कुमारजी स्वतःच्या गायनासंदर्भात ते स्वतःला ‘नकल्या’ म्हणत. याविषयी ते सांगतात, ‘गायकाने गायनाला आरंभ करताच ‘तो पुढे काय गाणार आहे’, हे लगेचच माझ्या लक्षात येत असे आणि मी तसे गात असे. एखाद्याने तीन-सव्वातीन मिनिटांचे गायन केले, तरी तेच गाणे त्याच गायकाच्या गायकीत मी ३० मिनिटे गाऊ शकतो.’ त्यांचे हे गायन इतके तंतोतंत असे की, ‘ते ऐकणार्‍या कुणालाही कुमारजी त्या गायकाच्या गायकीतील गायक आहेत’, असे वाटेल.

६. गायनाविषयी भारतभर प्रसिद्ध असतांना स्वतःच्या संगीतातील अपूर्णतेची तीव्र जाणीव होणे

वर्ष १९३५ मध्ये जवळपास एक तप कुमारजी प्रा. देवधर यांच्याकडे संगीत शिकण्यासाठी गेले. ते शिकत असतांनाच नवीन शिकणार्‍यांना शिकवतही असत. ते सांगतात, ‘मी भारतभर प्रसिद्ध होतो; परंतु तरीही मी असमाधानी होतो. एकदा मला आतून वाटले, ‘मला गायन येत नाही. सध्या चालले आहे, तसा नुसता सराव (रियाज) करून काय होणार ? अशा प्रकारचे गायन करून काय उपयोग ? मी जे गात आहे, ते संगीत नाही. संगीत पुष्कळ मोठे आहे. असे गात रहाण्यापेक्षा गायन बंद करावे.’ या विचारांनी मला रडू कोसळले; परंतु घरच्यांच्या म्हणण्यामुळे मी गायन चालू ठेवले. तेव्हा जणू या गंधर्वाला स्वतःच्या संगीतकलेतील अपूर्णतेची म्हणण्यापेक्षा संगीताच्या महानतेची आणि भव्यतेची जाणीव झाली. ‘साधनेत अशी जाणीव होणे’, ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे.

७. स्व. माई मालपेकरांकडे झालेला स्वरसाक्षात्कार !

नंतर कुमारजी स्व. अंजनीबाई (माई) मालपेकर यांच्याकडे संगीत शिकायला जाऊ लागले. त्यांच्याकडे जे शिकायला मिळाले, त्याविषयी कुमारजी सांगतात, ‘स्वर लागणे वेगळे आणि त्याचा साक्षात्कार होणे वेगळे ! सुरेल स्वर, म्हणजे पूर्णता ! ‘ती पूर्णता म्हणजे काय ?’, ते ठाऊक व्हायला हवे. ती पूर्णता ठाऊक नसेल, तर जन्मभर स्वरांच्या घेर्‍यात राहिलो, तरी स्वरांचा साक्षात्कार होणार नाही. ‘ईश्वराचे दर्शन होणे, म्हणजे काय ?’, ते भक्तालाच ठाऊक असते आणि ते झाल्यावर ‘भक्ताचे काय होते ?’, ते केवळ त्यालाच कळते. माई सांगत असत, ‘स्वर ऐकणार्‍याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तर ‘स्वर लागला’, असे समजायचे.’ माईंकडे मला ‘सा’चा साक्षात्कार झाल्यानंतर माझे काम झाले.’ पं. कुमारजींनी अन्य अनेक संगीत गुरूंकडूनही संगीताचे ज्ञान मिळवले होते.

८. गायन बंद करायला लावणारा नियतीचा आघात !

यथावकाश पं. कुमारजींचा विवाह भानुमती कंस यांच्याशी झाला. त्यानंतर वर्ष १९४७ मध्ये पं. कुमारजींना फुप्फुसाच्या क्षयरोगाची बाधा झाली. तेव्हा क्षयरोगावर अजून औषध निघाले नव्हते. ‘चांगल्या हवेच्या ठिकाणी जाऊन रहाणे’, हाच त्यावर एकमेव उपाय होता. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या गायनावरही पूर्ण बंदी घातली. त्यांनी आता ‘सा’ही उच्चारायचा नव्हता. पं. कुमारजींनी हे सर्व स्वीकारले आणि गाणे बंद करून ते मध्यप्रदेशमधील देवास येथे जाऊन राहिले.

९. नियतीने घेतलेल्या परीक्षेत श्रवणसाधना करून लोकगीतांचा अभ्यास करणारे पं. कुमार गंधर्व !

देवास येथील वास्तव्याच्या काळात क्षयरोगामुळे केवळ पलंगावर पडून ‘वारे, पक्षी आणि मार्गावरून जाणार्‍या भिकार्‍यांचे गाणे ऐकणे’, एवढेच कुमारजींच्या हातात होते. देवासला ‘शीलनाथ महाराज’ या नाथ संप्रदायातील सिद्धपुरुषाची धुनी आहे. तेथे ‘कानफाटे’ नाथपंथी गट येत असत आणि ते गात असत. पं. कुमारजी सांगतात, ‘हे नाथपंथीय एकांतप्रेमी आणि ‘रातजागी’ (रात्री जागणारे) !’ त्यांची गाणी लोकगीतांप्रमाणे होती. येथूनच पं. कुमारजींचा लोकसंगीताचा सखोल अभ्यास चालू झाला. दारात आलेल्या भिकार्‍याचे गाणेही पं. कुमारजी तन्मयतेने ऐकत. ऐकण्याचे महत्त्व सांगतांना ते म्हणतात, ‘शिकायचे असेल, तर पुष्कळ ऐकायला हवे. सर्वांचे, अगदी वेड्याचेही ऐकायला हवे.’ (२१.१२.२०२३)

(क्रमश:)

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

उत्तरार्ध : https://sanatanprabhat.org/marathi/754183.html