भरकटलेली वृत्तपत्रकारिता !
नुकतेच एका वृत्तपत्रात एक व्यंगचित्र पहाण्यात आले. त्यात विवाहविधीतील एक दृश्य दाखवले होते. विवाह होमाच्या जवळ बसलेले गुरुजी वराला उद्देशून म्हणतात, ‘‘आता तुझ्या बायकोला तुझ्या ए.टी.एम्. कार्डचा पासवर्ड सांग.’’ गुरुजींच्या तोंडी असे वाक्य दाखवणे, म्हणजे हिंदु धर्मानुसार करण्यात येणार्या विवाह संस्कारांचा एकप्रकारे अवमान करणेच होय. विधींच्या वेळी मांगल्य, पावित्र्य टिकवून ठेवायचे असते. अशा प्रकारे टुकार विनोद करून त्यांनी विवाहाची खिल्लीच उडवली आहे. विवाह म्हणजे काय ? होमाचे महत्त्व काय ? वधू-वरांचे कर्तव्य कोणते ? यांविषयीची माहिती सांगायचे सोडून वृत्तपत्रे अशा स्वरूपाची व्यंगचित्रे रेखाटून समाजाचे प्रबोधन नव्हे, तर वैचारिक दिशाभूल करतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ अशामुळेच डळमळीत झालेला आहे. स्वतः दिशाहीन व्हायचे आणि समाजालाही दिशाहीन करून भरकटू द्यायचे. असे काम वृत्तपत्रांकडून केले जाते.
अशा वृत्तपत्रांना उदाहरणेही मिळतात ती हिंदु धर्मातीलच; कारण कोणताही हिंदु आपल्या धर्मातील व्यंगचित्रात्मक संकल्पांना विरोध करणार नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे हिंदु आणि हिंदु धर्म यांवर टीका किंवा हास्यविनोद करायला वृत्तपत्रांना या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळते. धर्माचा अवमान करणार्या अशा व्यंगचित्रांतून केवळ मनोरंजन करून न घेता हिंदूंनी त्याचा संघटितपणे निषेध करायला हवा. दुर्दैवाने तसे होत नसल्याने असे प्रकार होतच रहातात. ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये धर्मगुरूंच्या समक्ष केले जाणारे विवाह, मुसलमानांमध्ये निकाहमध्ये सहभागी असलेले मौलाना यांच्या तोंडी कधी अशी विनोदी किंवा आक्षेपार्ह विधाने कुणी केल्याचे कधी ऐकले आहे का ? नाही ना ! मग असे केवळ हिंदूंच्या संदर्भात घडणे हे हिंदूंसाठी खेदजनक आहे. याच प्रकारांमुळे भविष्यात ‘आता विवाहविधींची आवश्यकता उरली नाही’, अशा स्वरूपाचेही एखादे व्यंगचित्र प्रसिद्ध होऊ शकते, यात शंका नाही. समाजाची सद्यःस्थिती आणि आर्थिक बाजूलाही अधिक उत्तेजना देणारी विज्ञापने पहाता वैवाहिक नात्याचा पाया हा एकमेकांना समजून घेणे, आदर, प्रेम, त्याग यांवर अवलंबून आहे, हे समजून न घेता सर्व जीवनात ‘पैसा आणि पैसा’ हेच एकमेव झाले आहे. त्यामुळे पती-पत्नींच्या नात्यामधील ओलावा न टिकता ते व्यावहारिक स्तरावरचे होऊन जाते. पैसा शाश्वत नसल्याने त्याची चणचण भासली की, वैवाहिक नात्याचा डोलारा डळमळू लागतो. त्यामुळे पैसा हा सर्वस्व न मानता पती-पत्नीचे नाते यशस्वी होण्यासाठी दांपत्याने प्रयत्न करायला हवेत ! असे अपेक्षित असतांना त्यात अशा व्यंगचित्रांची भर पडून होणारी वैचारिक दिशाभूल रोखायला हवी !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.