२०३ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी परळी वैद्यनाथ कारखाना विक्रीस !
युनियन बँक ऑफ इंडियाने चालू केली प्रक्रिया; २५ जानेवारीला ई-लिलाव !
बीड – २०३ कोटी रुपयांच्या थकित कर्जाच्या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाने या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ई-लिलावाची प्रक्रिया २५ जानेवारी या दिवशी ठेवली आहे. या संदर्भात या कारखान्याच्या अध्यक्षा आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव सौ. पंकजा मुंडे पालवे यांनी मौन बाळगले आहे. काही मासांपूर्वी १९ कोटी रुपयांच्या थकित करापोटी जी.एस्.टी. विभागानेही या कारखान्यावर केली होती.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी काही साखर कारखान्यांना अर्थसाहाय्य केले होते; मात्र त्यात प्रस्ताव देऊनही वैद्यनाथ साखर कारखान्याला नाकारले होते. या कारखान्याच्या कौठाळी आणि पांगरी येथील ६७ हेक्टर शेतभूमीसह याच २ गावांतील २४ हेक्टर बिगरशेती भूमीचाही लिलाव होणार आहे. यासह ‘शुगर प्लँट’ची कारखाना इमारत, जुना डिस्टिलरी प्रकल्प, नवा डिस्टिलरी प्रकल्प, प्रकल्प, निवासी खोल्या, ‘जनरेशन प्लँट’ आणि ‘प्लँट मशिनरी’ यांचा लिलाव होणार आहे. यंत्रसामुग्री आणि प्रकल्प यांची राखीव किंमत ६२ कोटी २५ लाख रुपये आहे, तर भूमी आणि इमारती यांची राखीव किंमत ४५ कोटी ८६ लाख रुपये आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.