तासगाव नगर परिषदेकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही शनैश्वर मंदिराशेजारील स्वच्छतागृह हटवण्यास प्रशासन उदासीन !
तासगाव (जिल्हा सांगली) – तासगाव येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि भाविक श्री. श्रीपाद रामचंद्र गोगटे (वय ७९ वर्षे) यांचे सिद्धेश्वर मंदिराशेजारी स्वमालकीचे शनैश्वर मंदिर आहे. या मंदिराशेजारीच नगर परिषदेचे सार्वजनिक स्वच्छतागृह (मुतारी) आहे. या परिसरात आणखी ४ स्वच्छतागृहे असल्याने मंदिराशेजारील स्वच्छतागृह काढून टाकावे, यासाठी श्री. गोगटे हे नगर परिषदेकडे गेली २ वर्षे पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदनही देऊन झाले; मात्र ते हटवण्यास प्रशासन उदासीन आहे.
या संदर्भात श्री. गोगटे म्हणाले, ‘‘हे शनैश्वर मंदिर १०० वर्षे जुने असून तासगाव शहरातील जवळपास सर्व भाविक येथे येतात. शहरातील एकमेव असलेल्या या मंदिराशेजारीच स्वच्छतागृह असल्याने येथे त्याचा खराब वास येतो, तसेच शेजारी कचराकोंडाळेही आहे. त्याचाही त्रास सहन करावा लागतो. परिसरात आणखी ४ स्वच्छतागृहे असल्याने मंदिराशेजारील स्वच्छतागृहाची आवश्यकता नाही. तरी प्रशासनाने हे स्वच्छतागृह तात्काळ हटवून भाविकांची कुचंबणा टाळावी.’’