Dress Code Temples Karnataka:कर्नाटकातील ५०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !
‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या प्रयत्नांना यश !
बेंगळुरू (कर्नाटक) – मंदिरांचे पावित्र्य, संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघाच्या बैठकीत भारतीय संस्कृतीला अनुसरून वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कर्नाटकात ५०० मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू होणार आहे. यात बेंगळुरूमधील ५० मंदिरांचा समावेश आहे. कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघाचे समन्वयक मोहन गौडा यांनी ही माहिती दिली. बेंगळुरू येथील वसंतनगर येथील श्री लक्ष्मी व्यंकटरमण स्वामी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत भाविकांना मंदिरांचे पावित्र्य जपण्याचे, भारतीय संस्कृती अन् वस्त्रसंहिता यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाचा फलकही या मंदिराच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. या परिषदेला वासवी मंदिरांचे सचिव श्री. नागेश बाबू, श्री. प्रदीप कुमार, विश्वस्त, श्री. अंजनेय मंदिर, शिवाजीनगर; श्री. व्यंकटचलैया, प्रदेशाध्यक्ष अर्चकार संघ; डॉ. बी.एन् महेश कुमार, सचिव, अखिल भारत संघटिहा पुरोहित कर्मिका परिषद आणि हिंदु जनजागृती समितीचे बेंगळुरूचे समन्वयक श्री. शरथ उपस्थित होते. यापूर्वी, १६ आणि १७ डिसेंबर २०२३ या दिवशी बेंगळुरू येथे झालेल्या ‘कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या राज्यस्तरीय बैठकीत मंदिरे आणि धार्मिक परंपरा यांच्या रक्षणासाठी वस्त्रसंहितेविषयीचा ठराव संमत करण्यात आला होता. राज्यातील मंदिरांमध्ये त्याची कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे.
श्री मोहन गौडा म्हणाले की, बेंगळुरूसमवेतच कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी भक्तांमध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक मोहीम राबवली जाईल. पाश्चात्त्य कपड्यांशी तुलना केल्यास भारतीय कपडे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शुद्ध आणि सभ्य आहेत. तसेच भारतीय कपडे परिधान केल्याने आपली संस्कृती वाढेल आणि तरुण पिढीमध्ये स्वाभिमान जागृत होईल. याव्यतिरिक्त, पाश्चिमात्य देशांशी तुलना केल्यास, पारंपरिक वस्त्र उत्पादन उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम होईल. जर आपल्याला मंदिरात आध्यात्मिक शुद्धता अधिक प्रमाणात आत्मसात करायची असेल, तर आपले वागणे आणि पोशाख आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असणे आवश्यक आहे.