समाजाची निष्क्रीयता !
बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात ११ डिसेंबरला माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेला मारहाण करत तिची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या वेळी रस्त्यावर अनेक जण मूकपणे हे सर्व पहात होते. या हृदयद्रावक घटनेकडे मूकपणे पहाणार्या बघ्यांविषयी बेंगळुरू न्यायालयाने तीव्र खेद व्यक्त करतांना ‘ही घटना मूकपणे बघणार्या प्रेक्षकांकडून दंड वसूल करून तो पीडितेला हानीभरपाई म्हणून द्यावा’, अशी टिपणी केली आहे. याविषयी संदर्भ देतांना ‘ब्रिटीश सरकार त्यांच्या काळात अशा बघ्यांकडून ‘पुंडकंदाय’ कर वसूल करत असे’, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ‘अन्याय करणे जसा गुन्हा आहे तसा ‘अन्याय सहन करणे आणि अन्याय होतांना तो मूकपणे पहात रहाणे, हा सुद्धा गुन्हा आहे’, याची शिकवण आपल्याला रामायण, महाभारत यांसारख्या धर्मग्रंथांतून मिळते. कुणी विरोध करत नसल्यानेही गुन्हेगारी अधिक प्रबळ होत चालली आहे. मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड, ऑक्टोबर २०२३ मध्ये बीडमधील वाळुंज गावात भूमीच्या वादातून एका महिलेची, जानेवारी २०१९ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाळपई गावात एका प्रेमप्रकरणातील मुलाच्या आईची, तर ऑगस्ट २०२१ मध्ये झारखंडमध्ये दुमका जिल्ह्यातील राणेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या आरोप करत एका महिलेची चपलांचा हार घालून विवस्त्र धिंड काढण्यात आली.
विरोध केल्यास ‘आपल्याला, कुटुंबियांना त्रास होईल, याच्या भीतीमुळे’, ‘उगाच वैर कशाला ? या विचाराने’ किंवा ‘मला त्याचे काय ?’ या विचाराने समोर अन्याय होत असल्याचे पाहूनही लोक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. असे केले, तर जेव्हा आपण प्रतिकूल परिस्थितीत असू, तेव्हा आपल्या साहाय्याला कोण धावून येणार ? ‘मी एकटा काय करणार ?’, यामुळे आपण पुढे येत नसू, तर ‘मी एकटा काय काय करू शकतो ?’, याचा विचार आपण केव्हा करणार ? एकट्याला काही करणे शक्य नसेल, तर मी इतरांचे प्रबोधन करून त्यांना समवेत घेऊन अन्याय थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो का ? तेही शक्य नसेल, तर तत्परतेने पोलीस ठाण्यात संपर्क करून पोलिसांना नक्कीच बोलावू शकतो का ?, हे पहायला हवे. ‘मी एकटा काय करणार ?’ या विचाराने छत्रपती शिवराय किंवा क्रांतीकारक हातावर हात धरून गप्प राहिले असते, तर आज आपण कोणत्या स्थितीत असतो ? याची कल्पनाच न केलेली बरी ! न्यायालयाने टिपणी करून त्याकडे लक्ष वेधले आहे; मात्र आपल्यात सुधारणा होत नसेल, तर इंग्रज शासनाप्रमाणे आताही ‘पुंडकंडाया’ कर आपल्यावर लावणे इष्ट ठरेल !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई