नागपूर येथील साधिका सौ. रिभा मिश्रा यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्याने त्यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१. साधिकेची काहीही क्षमता नसतांना तिला साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा मिळणे आणि तिने गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर आढावा घेतांना आनंद मिळणे
१ अ. साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायला सांगितल्यावर मनात नकारात्मक विचार येणे आणि गुरुदेवांना आर्ततेने प्रार्थना केल्यावर आढावा चांगला होणे : ‘उत्तरदायी साधकांनी मला एका गटातील साधकांचा व्यष्टी साधनेचा (टीप) आढावा घेण्यास सांगितले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला तर प्रसंगानुरूप योग्य दृष्टीकोन देता येत नाही, तर मी साधकांना आढाव्यात दृष्टीकोन कशी देणार ?’ त्यानंतर मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, आपण साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी माझी निवड केली आहे, तर आपणच माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी.’ मी साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना आर्ततेने प्रार्थना करते, ‘गुरुदेव, आपणच माझ्या माध्यमातून साधकांना योग्य दृष्टीकोन द्यावेत.’ नंतर आढावा चांगला होतो आणि मला आनंद मिळतो.
(टीप : साधक करत असलेला नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न, कृतज्ञताभाव, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, या सूत्रांविषयी जाणून घेणे आणि साधकांना त्यासंदर्भात दिशा देणे)
१ आ. ‘सर्व साधकांनी सत्संगात उपस्थित रहायला हवे’, ही अपेक्षा न्यून होणे आणि ‘गुरुदेव साधिकेकडून ही सेवा करून घेत आहेत’, असे तिला जाणवणे : काही साधक आढाव्याच्या वेळी उपस्थित नसतात. पूर्वी मला याचा ताण येत असे. त्या वेळी ‘साधकांनी सत्संगात उपस्थित रहायला हवे’, अशी माझी अपेक्षा असे; परंतु आता मला प्रतिक्रिया आणि ताण येण्याचे प्रमाण अल्प आहे. खरेतर माझी काहीच क्षमता नसतांना गुरुदेवच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत. ते मला भरभरून आनंद देत आहेत. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
२. उत्तरदायी साधकाने सांगितल्यानुसार सेवेचे ध्येय ठरवणे आणि गुरुकृपेने ते पूर्णही होणे
गुरुपौर्णिमेच्या आधी मला उत्तरदायी साधकांनी ध्येय ठेवून सेवा करायला सांगितले होते. तेव्हा माझ्या मनात ‘मला प्रचारसेवा करण्यात अडचण आहे. धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ अर्पण देत नाहीत. त्यांना अधून मधून संपर्क करावा लागतो, तर मी घेतलेले ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही’, असे नकारात्मक विचार येत होते, तरीही ‘उत्तरदायी साधकाने सांगितले आहे; म्हणून काहीतरी ध्येय ठेवावे’, असे मला वाटले. त्यानुसार मी १५ धर्मप्रेमींना संपर्क करण्याचे ध्येय ठेवले. प्रत्यक्षात मी २३ धर्मप्रेमींना संपर्क करू शकले. मी संपर्काला जातांना देवाला प्रार्थना करत असे. गुरुकृपेने मला अर्पणही मिळाले ‘मी ठरवलेले ध्येय पूर्ण करू शकले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
३. शिबिरात विषय मांडण्याची सेवा मिळणे
३ अ. शिबिरात विषय मांडतांना पुष्कळ चुका होणे आणि उत्तरदायी साधकांना अडचण सांगणे : मला एका शिबिरात विषय मांडण्याची सेवा मिळाली. तेव्हा मला पुष्कळ ताण आला. मला भीती वाटत होती, ‘सत्संगात भारतभरातील सगळे साधक असतात. माझे काही चुकले, तर काय करायचे ?’ त्या वेळी उत्तरदायी साधक सांगत आहेत; म्हणून मी होकार दिला. पहिल्या दिवशी विषय मांडतांना माझ्याकडून पुष्कळ चुका होत होत्या. मी त्वरित उत्तरदायी साधकांना ही अडचण सांगितली.
३ आ. ‘गुरुदेव विषय मांडत आहेत’, असा भाव ठेवल्याने विषय मांडतांना एकही चूक न होणे आणि आनंद मिळणे : उत्तरदायी साधकांच्या मार्गदर्शनानंतर मी स्वयंसूचना सत्रे केली. मी प्रार्थना केली, ‘गुरुदेव, आपणच माझ्या माध्यमातून बोलावे. माझा आत्मविश्वास न्यून होऊन मला भीती वाटत आहे. प्रभु, आपणच सांभाळून घ्यावे.’ नंतर ‘गुरुदेव माझ्या माध्यमातून विषय मांडत आहेत’, असा भाव ठेवून बोलल्याने विषय मांडतांना माझ्याकडून एकही चूक झाली नाही. माझ्याकडून संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे सांगितला गेला आणि त्यातून मला आनंद मिळाला. त्याबद्दल मला गुरुचरणांप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली. आता ती सेवा माझ्याकडून आनंदाने होत आहे.’
– सौ. रिभा मिश्रा, नागपूर (७.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |