प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास महाविद्यालय उत्तरदायी !
इयत्ता १० वी आणि १२ वी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक घोषित !
छत्रपती संभाजीनगर – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार घडून येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. असे प्रकार होत असल्यास ते मंडळास कळवावे. अन्यथा होणार्या कारवाईला महाविद्यालयच उत्तरदायी राहील, असा स्पष्ट आदेश पुणे येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्राद्वारे महाविद्यालयांना देण्यात आला आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते ११ मार्च, तर इयत्ता १० वीच्या परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. त्याचे वेळापत्रक मंडळाने घोषित केले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता १० वीचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. इयत्ता १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
‘शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून विज्ञानाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा यांमध्ये २० पैकी १८ किंवा २० पैकी २० गुण दिले जातात. अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नये; म्हणून केवळ दाखले गोळा करून ‘कॅटलॉग’ला विद्यार्थी संख्या दाखवली जाते. वर्षभर बनावट उपस्थिती लावली जाते. अशा तक्रारी आल्यास मंडळाच्या निदर्शनास आणून द्यावे, अन्यथा होणार्या कारवाईला कनिष्ठ महाविद्यालय उत्तरदायी राहील’, असे पुणे मंडळाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
भरारी पथकाची पडताळणी हवी !
बर्याच ठिकाणी बाह्य परीक्षक मर्जीतले असतात. गुणांच्या फुगवट्यामुळे खरेच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा होते कि नाही याची पडताळणी होणे आवश्यक आहे. भरारी पथकांची ही पडताळणी व्हावी. यामुळे खरे गुणवंत विद्यार्थी पुढे येतील. – प्रशांत साठे, अध्यक्ष, आर्.टी.ई. पालक संघ
विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून गुण देण्याचा प्रकार कोणतेही शिक्षक आणि महाविद्यालय करत नाही. असे आढळून आले, तर नियमानुसार मंडळाने कारवाई करावी.
संपादकीय भूमिका :शैक्षणिक क्षेत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार होणे, हे शिक्षण विभागाला लज्जास्पद ! |