‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ (‘पीसीओडी’ – मासिक पाळीशी संबंधित आजार) लक्षणे आणि जीवनशैलीत करावयाचे पालट !
सध्या ‘पीसीओडी’ ही बर्याच स्त्रियांमध्ये आढळून येणारी व्याधी आहे. ‘पीसीओडी’, म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर स्त्रियांच्या शरिरात जे अंडाशय असते, त्यामध्ये अनेक छोटी छोटी अपक्व किंवा काही प्रमाणात पक्व अशी अंडी मोठ्या प्रमाणात सिद्ध होतात. कालांतराने अंडाशयात पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे कोष सिद्ध होतात. अंडाशयाचा आकार वाढतो आणि परिणामी पुरुषांमधील संप्रेरक (अँड्रोजेन) स्त्रियांच्या शरिरात अधिक प्रमाणात वाढायला लागतात; म्हणून स्त्रियांच्या शरिरात केस गळणे, वजन वाढणे, मासिक पाळी अनियमित होणे, गर्भधारणा होण्यास अडचणी येणे, अशा समस्या निर्माण होतात. ‘पीसीओडी’ हा आजार चुकीच्या जीवनशैलीनेच निर्माण होणारा आहे आणि खाण्या-पिण्याच्या सुयोग्य सवयी अन् जीवनशैली यांमुळे हा आजार आटोक्यात आणता येऊ शकतो. ‘पीसीओडी’सारखा आजार दुर्लक्षित केल्यास भविष्यात मधुमेह, स्थूलता किंवा इतर संप्रेरकांचे असंतुलन होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात; म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी वेळेत सजग होणे आवश्यक आहे.
१. चुकीची जीवनशैली म्हणजे काय ?
आयुर्वेदानुसार विचार करायचा झाल्यास स्त्रियांमध्ये मासिक पाळी आणि रस धातू यांचे स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून आहे. आहारापासून सिद्ध होणारा पहिला धातू, म्हणजे रस धातू होय. रस धातू बिघडला, तर परिणामी मासिक पाळीच्या तक्रारीही चालू होतात. आधुनिक शास्त्रानुसार संप्रेरकांचे असंतुलन घडवण्यासाठी चुकीची जीवनशैलीच कारणीभूत असते. चुकीची जीवनशैली म्हणजे काय ? हे आपण उदाहरणांनुसार समजून घेऊया.
अ. व्यायामाकडे दुर्लक्ष : ‘पीसीओडी’सारखे आजार हे मुली वयात आल्यापासून ते पाळी जाईपर्यंत स्त्रियांमध्ये आढळून येतात. मुली साधारणतः ११-१२ व्या वर्षापासून वयात येतात. आताच्या मुलींची दिनचर्या बघितली, तर बहुतांश मुली व्यायाम आणि शारीरिक हालचाल यांकडे लक्ष देत नाहीत. ‘व्यायाम हा स्वतःच्या दिनचर्येतील भाग आहे’, हे त्यांच्या मनावर बिंबवलेलेच नसते. ‘वजन वाढलेले दिसले, तरच व्यायामाला प्रारंभ करायचा’, अशी चुकीची मानसिकता आपल्याकडे दिसून येते.
आ. रात्रीचे जागरण : पुढे पुढे वाढत जाणारा अभ्यास आणि त्यासाठी होणारी रात्रीची जागरणे हे रस धातू बिघडण्यासाठीचे मुख्य कारण आहे. बहुतांश विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना बर्याचदा मी असा सल्ला देते की, तुम्ही पहाटे कितीही लवकर उठा; पण रात्री मात्र वेळेत झोपा. रात्री जागरण करायला प्रारंभ केल्यावर मध्येच भूक लागते किंवा कॉफी प्यायली जाते अथवा चहा प्यायला जातो, अशा प्रकारे वेळी अवेळी खाल्ल्याने शरिरात पचन बिघडून परिणामी रस धातू बिघडणार, यात काही शंका नाही. हे झाले विद्यार्थीदशेत असणार्या मुलींसाठी; परंतु मोठ्या मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा रात्री जागरण करण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. भ्रमणभाषवर वेळ घालवणे, जागरण करणे आणि सकाळी उशिरा उठणे, हे स्वतःच्या शरिरातील संप्रेरकांचे असंतुलन घडवून आणते.
इ. बाहेरचे पदार्थ वरचेवर खाणे : पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरचे तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे पदार्थ खाण्याचे प्रमाण सध्या सर्वांमध्येच पुष्कळ वाढलेले आहे. वरच्या वर असे पदार्थ खाण्यात आल्यामुळे प्रथम पचनशक्ती न्यून होते आणि उत्तरोत्तर धातू नीट सिद्ध होत नाही. शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी रहात असल्यामुळे किंवा आवड म्हणून बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण सध्याच्या तरुणांमध्ये भरपूर आहे.
२. ‘पीसीओडी’ची लक्षणे कोणती ?
अ. पाळी अनियमित होणे.
आ. पाळीच्या वेळी अंगावरून अल्प अथवा अधिक प्रमाणात जाणे.
इ. वजन वाढणे.
ई. केस गळणे.
उ. चेहरा, पाठ, छाती आणि पोट यांवर लव वाढणे.
ऊ. चेहर्यावर पिटिका (पिंपल्स) येणे.
३. जीवनशैलीत कोणते पालट करायला हवेत ?
आपल्याला ‘पीसीओडी’ आहे, हे बर्याचदा मुलींच्या लक्षात येत नाही. पाळीच्या तक्रारी चालू झाल्यास वेळेत वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या जीवनशैलीत कोणत्या चुका होत आहेत, हे ओळखून त्यामध्ये तत्परतेने पालट केला पाहिजे.
अ. आहारावर नियंत्रण : वजन वाढत असेल, तर स्वतःच्या आहारावर नियंत्रण आणले पाहिजे. कडकडीत भूक लागते, त्या २ वेळा निवडून त्या वेळी घरचे जेवण जेवावे. मधल्या वेळांमध्ये अतिरिक्त खाणे टाळावे. मधल्या वेळांमध्ये अगदीच भूक लागत असल्यास साळीच्या लाह्या, मखाणे, एखादे फळ असे खावे. बाहेरील पदार्थ, ‘पॅकबंद’ पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
आ. पिष्टमय पदार्थांचे प्रमाण न्यून करणे : आहारातील पिष्टमय पदार्थांचे प्रमाण न्यून करावे. पोळी, भात, बेकरीचे पदार्थ, बटाटा अल्प प्रमाणात खावे, तसेच गोड पदार्थही अल्प खावेत. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि कोशिंबीर यांचा समावेश अवश्य करावा.
इ. नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे ! : ‘व्यायामासाठी वेळ मिळत नाही’, ही तक्रारच मुळात चुकीची आहे. आपल्याला भूक लागली, तर आपण हातातील सर्व कामे बाजूला ठेवून जेवणासाठी नक्की वेळ काढतो. व्यायाम सुद्धा शरिराची तितकीच महत्त्वाची आवश्यकता आहे, हे आपण लक्षात घेतल्यास त्यासाठी आवर्जून वेळ काढला जाईल. दिवसभरात एका जागी अधिक वेळ बसून न रहाता शरिराची जेवढी हालचाल होईल, जेवढे चालणे होईल तेवढे उत्तम ! व्यायामाचा प्रारंभ करतांना कमी वेळेपासून करू शकतो आणि हळूहळू व्यायामाची वेळ वाढवत नेऊ शकतो. पुष्कळ व्यायाम करण्यापेक्षा किमान ३० मिनिटे; पण नियमित व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे.
ई. अनावश्यक जागरण टाळून वेळेत झोप घेणे : रात्री वेळेतच झोपावे. अनावश्यक जागरण स्वतःचे वजन वाढण्यासाठी परिणामी संप्रेरकांचे असंतुलन घडण्यास कारणीभूत आहे, तसेच नंतर होणार्या आजारांचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच सजग होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रात्री वेळेत झोपण्याचा प्रयत्न करावा. किमान ६ ते ७ घंटे सलग झोप होईल, हे पहावे.
उ. जीवनशैलीत सुधारणा आणि योग्य औषधोपचार यांनी हा आजार आटोक्यात आणता येऊ शकतो, हा आत्मविश्वास बाळगावा. नियमित आरोग्य पडताळणी करायला हवी.
ऊ. मानसिक ताण न घेण्यासाठी उपाययोजना : अनावश्यक मानसिक ताण न घेता आपण काय उपाययोजना करू शकतो ? याकडे लक्ष दिले पाहिजे. शाळेचा अभ्यास अथवा ‘करिअर’चा ताण, लग्नानंतर येणारा मानसिक ताण किंवा अन्य कौटुंबिक ताण यांवर योग्य तो सल्ला घेऊन प्राणायाम, ध्यान किंवा साधना यांद्वारे तो ताण घालवण्यासाठी प्रयत्न करावा.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (८.१.२०२४)
पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पी.सी.ओ.एस्. – मासिक पाळीशी संबंधित आजार)‘पी.सी.ओ.एस्.’ ही ‘पीसीओडी’पेक्षा गंभीर समस्या आहे. यामध्ये संप्रेरकांचे असंतुलन मोठ्या प्रमाणात असते, तसेच शरिरामध्ये पुरुष संप्रेरकाचे प्रमाण अधिक असते. यामध्ये बर्याचदा पाळी लांबणे, अंडाशयातील बीज कधी परिपक्व होते, तर कधी होत नाही. त्यामुळे गर्भधारणेस अडथळे येतात. ही लक्षणे बर्यापैकी ‘पीसीओडी’सारखीच असतात. यामध्ये मात्र वैद्यांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार करणे आणि नियमित पडताळणी करणे आवश्यक आहे. – वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (८.१.२०२४) |