श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि अस्वस्थ ‘सेक्युलर’ (निधर्मी) !
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अनेक देश या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणार आहेत. अनेक राष्ट्रप्रमुख या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. ही प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशातील अनेक मान्यवर आणि राजकीय पक्षांचे नेते यांना या समारंभाची निमंत्रणे देण्यात आली आहेत. अजूनही काही जणांना निमंत्रण देण्याचे काम चालू आहे. ज्या भारतीय विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत, ते संभ्रमात आहेत; कारण जर या समारंभात सामील झालो, तर त्यांच्या पारंपरिक मतपेढ्यांचे काय होईल, याचा त्यांना अंदाज येत नाही. या पारंपरिक मतपेढ्या म्हणजे अर्थातच मुसलमान आणि ख्रिस्ती समाज जो या पक्षांना एकगठ्ठा मते देत आलेला आहे. जर समारंभाला उपस्थित राहिलो, तर एकगठ्ठा मत देणारा मुसलमान समाज अप्रसन्न होतो अन् जर अनुपस्थित राहिलो, तर बहुसंख्य असलेला हिंदु मतदार अप्रसन्न होतो. याखेरीज यांचा मुसलमानधार्जिणेपणा स्पष्टपणे दिसून येतो. ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’, अशी ही यांची स्थिती झालेली आहे. यापैकी ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा’चे नेते सीताराम येच्युरी यांनी स्पष्टपणे ‘आपण या समारंभास जाणार नाही’, असे सांगितले आहे. निमंत्रण नसतांनाही ‘निमंत्रण आले, तरी तिथे जाणार नाही’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. इफ्तारच्या मेजवानीत गोल टोपी घालून सहभागी होणारे येच्युरी आणि शरद पवार यांच्यासारख्या राजकारण्यांना राममंदिरात येण्याची आवश्यकता वाटत नाही, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
१. साम्यवादी, समाजवादी आणि काँग्रेस यांच्याकडून कायमच हिंदुद्वेष !
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खर्गे आणि गांधी परिवार राममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाण्याविषयी काय पवित्रा घेतात, याविषयी उत्सुकता आहे; पण मंदिर उद्घाटन अन् श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी न होणारे हे सगळे हिंदु धर्म, हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती यांच्या विरोधी आहेत, हे निश्चित ! वर्ष २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येईपर्यंत किंवा त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचा वापर आपल्याला हिंदु समाजाच्या विरोधात करता येईल, असेच या लोकांना वाटत होते; पण काळाचा महिमा अगाध आहे. यांचा हा विरोध आजचा नाही. यासाठी जरा साम्यवादी, समाजवादी आणि काँग्रेस यांचा भूतकाळ बघितला पाहिजे. देश स्वतंत्र झाल्यानंतर गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. गांधींच्या लोकशाहीला काळिमा फासणार्या पक्षपाती निर्णयामुळे पंतप्रधानपदी जवाहरलाल नेहरू होते. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जाऊ नये; म्हणून नेहरू आणि त्यांच्या ‘होयबा’ म्हणणार्या नेत्यांनी आकाशपाताळ एक केले होते. तरीही राष्ट्रपती या नात्याने राजेंद्र प्रसाद तिथे गेले. केरळ येथील कन्याकुमारीस्थित स्वामी विवेकानंद शिळा स्मारकाच्या वेळीही हेच घडले. तेव्हाचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री हुमायूं कबीर यांनी शिळा स्मारकाच्या कामाला कधी पर्यावरणाचे, तर कधी अन्य कारण काढून विरोधच केला होता, याचीही आठवण झाल्याविना रहात नाही. अर्थात् शिळा स्मारकाला आपल्या संघटन कौशल्याने एकनाथ रानडेंनी सर्व पक्षांचा पाठिंबा मिळवला होता, हा भाग वेगळा.
२. राष्ट्राच्या उभारणीत राष्ट्रीय अस्मिता आणि मूल्यव्यवस्था यांची महत्त्वपूर्ण भूमिका !
राममंदिराला भाजप आणि शिवसेना सोडली, तर इतर सर्वच पक्षांनी विरोध केलेला आहे. कारसेवकांवर गोळीबार करणारे समाजवादी पक्षाचे (दिवंगत) मुलायमसिंग यादव हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ‘भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेसाठी आम्ही अयोध्येत गोळीबार केला’, असे त्या गोळीबाराचे निर्लज्ज समर्थनही संसदेत केले होते. श्रीराममंदिराचा जेव्हा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला, तेव्हाही ‘संवैधानिक पदावर विराजमान असलेल्या राज्यघटनेने निधर्मी राज्याच्या प्रमुखाने अशा समारंभात उपस्थित राहू नये. त्यांच्या हस्ते शिलान्यास करणे, म्हणजे राज्यघटनेचे उल्लंघन होय’, असा बेंबीच्या देठापासून टाहो फोडणारे हेच लोक आहेत. ‘श्रीराम मंदिर’ हा मुद्दा जसा राजकीय आहे, तसाच तो सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक आहे. भोळसट किंबहुना अतीउदार आणि धर्मांतर्गत स्वातंत्र्यामुळे आपल्या मूळ अस्मितांनाच नाकारण्याचे या देशात लोकशाहीच्या नावाखाली या राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहेत; मात्र संघ परिवारातील विविध संस्थांनी प्रयत्नपूर्वक हे घडू दिले नाही. संघाची हिंदुत्ववादी विचारधारा खांद्यावर घेणार्या भाजपने श्रीराममंदिराचा लढा राजकीय आघाडीवर पुढे रेटला. त्याचा या पक्षाला लाभ मिळाला, हे खरे आहे. तो लाभ मिळायला हवा; कारण ‘हिंदूंच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक परंपरा आणि अस्मिता यांची पाठराखण करणे, म्हणजे जणू फार मोठा गुन्हा करणे आहे’, असे वातावरण अन् प्रतिपादन हे लोक करत असत. आमची मंदिरे ही मूल्यव्यवस्था आणि अस्मिता यांची जोपासना करणारी आहेत; म्हणून ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी नियोजनपूर्वक मंदिरांना अपकीर्त अन् विरोध करत असतात. राष्ट्राच्या अस्मिता आणि मूल्यव्यवस्था त्या राष्ट्राची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, याकडे निदान या देशाविषयी तरी या तथाकथित विचारवंतांना दुर्लक्ष करायचे असते, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भारतभर हिंदु मंदिरांनी समाजसेवेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या व्यवस्थेकडे यांचे लक्षच जात नाही.
३. मंदिरांकडूनच सर्वाधिक समाजोपयोगी उपक्रम चालवले जाणे
मां वैष्णोदेवी संस्थान, शेगावचे गजानन महाराज संस्थान, शिर्डीचे साईबाबा संस्थान, तिरुपति बालाजी मंदिर संस्थान अशी किती तरी उदाहरणे आज देशापुढे आहेत. ही सर्व संस्थाने अत्याधुनिक रुग्णालये, विद्यापिठे, शाळा, वसतीगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अन्नछत्र असे किती तरी समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवतांना दिसत आहेत. या सर्व सुविधा ही संस्थाने हिंदु भक्तांच्या देणग्यांमधूनच राबवत आहेत आणि तेही सरकारने त्यांच्या उत्पन्नावर त्यांचा कर लावल्यानंतर ! या संस्थानांच्या व्यवस्थापन मंडळावर सरकारी प्रतिनिधीची नेमणूक करून त्यांच्या हिंदूहितकारी कार्यावर मर्यादा आणल्यानंतर. (इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, ‘अशा प्रकारे सरकारी प्रतिनिधीची नेमणूक चर्च किंवा मदरसे अथवा मशीद यांवर कायद्याने करण्यात येत नाही’, असा कायदा आज भारतात अस्तित्वात नाही.) अशी प्रजाहिताची कामे भारतात मंदिरे पूर्वापार करत होती, हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना याविषयी काही संशय असेल, त्यांनी ‘बर्टन स्टेन’ याचा ‘दि इकॉनॉमिक फंक्शन्स ऑफ अ मेडिएवल साऊथ इंडियन टेंपल’ या शीर्षकाचा शोधनिबंध जरूर वाचावा.
४. सगळा विरोध केवळ हिंदु धर्म, संस्कृती आणि त्यानुसार चालणारा हिंदु समाज यांनाच !
विचारधारांच्या या संघर्षात साम्यवादी विचार आता या देशांत औषधालाही शेष रहाणार नाही, याची डाव्या (साम्यवादी) विचारवंतांना आता खात्री पटली आहे. हिंदु विचारांचा सर्वंकष विजय निश्चित आहे. ‘हिंदु संस्कृती आणि धर्म यांविषयी अनास्था निर्माण करणे’, हाच यांचा एकमेव मुद्दा आहे. ‘हिंदूंविषयी अनास्था याचा अर्थ इतर समाज, धर्म, संस्कृती यांच्याविषयी या निधर्मी लोकांना अनास्था आहे’, असा नाही. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मावर कोणतीही टिपणी करण्याची या भेकड लोकांचे धाडस अन् सिद्धताही नाही. मुळात सगळा विरोध केवळ हिंदु धर्म, संस्कृती आणि त्यानुसार चालणार्या हिंदु समाज यांना आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
– डॉ. विवेक राजे
(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’, ४.१.२०२३)
संपादकीय भूमिकानिधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत ! |