नवी मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी !
नवी मुंबई – आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक भगवान श्रीराम यांच्या आहाराविषयी विकृत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबई विश्व हिंदु परिषदेच्या वतीने सीबीडी पोलीस ठाण्यात बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांनी केली.
या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंब्रा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्रीरामांविषयी एकेरी उल्लेख करून प्रभूंचा आहार, वनवास यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. श्रीरामांनी वनवासाला निघतांना फळे, मध आणि कंदमुळे यांवर जीवननिर्वाह करेन, असा संकल्प केला होता. कुठलाही अभ्यास नसतांना आव्हाड जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी वेदांचाही अवमान केला आहे.
२२ जानेवारीला सर्व भारतियांचे आणि जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले असतांना या काळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशात जातीय दंगली घडवून आणण्याचा कट रचला असावा, अशी शंका येते. त्यामुळे आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहिता १५३ अ, २९५ अ यांनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा आणि त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.