आनंदी, प्रेमळ आणि प्रतिकूल शारीरिक स्थितीतही समष्टी सेवेची तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) !
आज १०.१.२०२४ या दिवशी कै. (श्रीमती) उषा मोहे यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
३०.१२.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) यांचे निधन झाले. १०.१.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, निधनापूर्वी त्यांच्यात जाणवलेले पालट आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.(भाग १)
१. श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. प्रेमभाव : ‘मी आणि श्रीमती उषा मोहेकाकू रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याची सेवा करत होतो. काकू घरून आश्रमात आल्यावर प्रथम धान्य निवडण्याची सेवा करणार्या साधकांना भेटायच्या. त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करायच्या. त्यांना एखादा साधक भेटला नाही, तर त्या न भेटलेल्या साधकाची अन्य साधकांकडे विचारपूस करायच्या. त्या घरून येतांना साधकांच्या आवडीचा खाऊ आणायच्या.
१ आ. स्वभावदोष-निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करणे : काकूंना काही स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले होते. तेव्हा त्या अन्य साधकांना स्वतःच्या चुका विचारून स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे काही दिवसांतच मला त्यांच्यात पालट जाणवले.
१ इ. काकूंशी बोलतांना आनंद जाणवणे : कधी कधी त्या माझ्या पाठीवरून हात फिरवून मला म्हणायच्या, ‘‘तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात ! तुमचे सगळे कुटुंब आश्रमात साधना करत आहे. तुमच्या दोन्ही सुना साधिका आहेत.’’ त्यांच्याशी बोलतांना मला आनंद वाटत असे.’
२. सौ. देवी प्रताप कापडिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७१ वर्षे), फोंडा, गोवा.
‘रामनाथी आश्रमात सेवा करत असतांना माझी मोहेकाकूंशी मैत्री झाली. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांचा त्रास न्यून होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करण्यास सांगतात. हे उपाय ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांनी करायचे असतात. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले उपाय ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांना करण्यास सांगण्याची सेवा माझ्याकडे आहे. या सेवेच्या वेळी मला काकूंना जवळून अनुभवता आले. या ५ वर्षांत मला काकूंची बरीच गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. ती पुढे दिली आहेत.
२ अ. आनंदी : मी सेवेसाठी ज्या ठिकाणी बसत होते, तेथून मोहेकाकू दिवसातून अनेक वेळा त्यांच्या सेवेच्या ठिकाणाहून खोलीत जात असत. त्या वेळी त्या सतत आनंदी असल्याचे मला जाणवायचे.
२ आ. निरागस : कधी कधी त्या माझ्या जवळ येऊन थांबायच्या आणि माझ्याशी बोलायच्या. मला त्यांच्या बोलण्यातून एखाद्या लहान मुलासारखी निरागसता जाणवायची.
२ इ. समष्टी सेवेची तळमळ आणि प्रेमभाव : काकू प्रतिदिन समष्टीसाठी ४ – ५ घंटे नामजप करायच्या. काही वेळा एखाद्या साधकाला बरे वाटत नसेल आणि त्याच्यासाठी जप करायचा असेल, तर काकू त्यासाठी कधीही सिद्ध असायच्या. अशा वेळी ‘मी दमले आहे’, असे त्या कधीही म्हणाल्या नाहीत. त्या वेळी त्यांचा साधकांप्रतीचा प्रेमभाव दिसून यायचा.
काकू ज्या दिवशी रुग्णालयात भरती झाल्या, त्या दिवशीही सकाळी त्यांनी समष्टीसाठी १ घंटा जप केला. त्यानंतर त्यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मला बरे वाटत नाही. मी रुग्णालयात जात आहे.’’
२ ई. इतरांचा विचार करणे : काकूंना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांनी मला लगेच भ्रमणभाष करून कळवले की, सध्या त्या समष्टीसाठीचा नामजप करण्याची सेवा करू शकणार नाहीत.
२ उ. प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर आणि आनंदी असणे : रुग्णालयात भरती केल्यावरही त्या भ्रमणभाषवर अगदी सहजतेने बोलत होत्या. तेव्हा काकू स्वतःच्या त्रासाकडेही स्थिरतेने बघत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘काकू, ‘मी रुग्णाईत आहे’, असे मला वाटतच नाही. मी एकदम बरी आहे.’’ नंतर त्या खळखळून हसल्या. एखादी व्यक्ती रुग्णालयात असतांना जशी घाबरलेली असते, तसे काकूंच्या विषयी काहीच जाणवत नव्हते. ‘सांगितलेला नामजप अधिकात अधिक कसा होईल ?’, याकडे त्यांचे लक्ष होते.
२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव आणि दृढ श्रद्धा : त्यांच्या बोलण्यातून प्रत्येक वेळी त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रतीचा भाव दिसून यायचा. कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र भयाचे वातावरण होते. ‘पुढे काय आणि कसे होणार ?’, अशी काळजी सर्वांनाच वाटत होती. त्या वेळी कधी कधी काकू माझ्याशी बोलायच्या. तेव्हा मला त्यांच्या बोलण्यात प.पू. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा दिसून आली. त्या म्हणायच्या, ‘‘परम पूज्य सर्व चांगलेच करणार आहेत. त्या विषयी मला विश्वास आहे. मला कुठलीही काळजी वाटत नाही.’’
‘हे श्रीकृष्णा, ‘तू मला मोहेकाकूंसारखी आध्यात्मिक मैत्रीण दिलीस आणि त्यांचे आध्यात्मिक गुण मला शिकता आले’, त्याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
३. सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. प्रतिकूल परिस्थिती स्थिरतेने स्वीकारणे : ‘३०.१२.२०२३ या दिवशी मोहेकाकूंचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी रुग्णालयातून मला त्यांचा भ्रमणभाष आला होता. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘उद्या सकाळी माझी अँजिओप्लास्टी (टीप १) आहे. मला मोठ्या प्रमाणात मधुमेहाचा त्रास आहे. माझ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉक्स) निर्माण झाले आहेत; पण गुरुदेव काळजी घेतील. आता माझे वय झाले आहे. काहीही होऊ शकते.’’ तेव्हा ‘त्यांनी हे शस्त्रकर्म अगदी स्थिरतेने स्वीकारले आहे आणि त्यांच्या मनाची सिद्धता झाली आहे’, असे मला जाणवले.
टीप १ – अँजिओप्लास्टी : हृदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांतील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म
३ आ. जाणवलेले पालट
१. मागील २ – ३ आठवड्यांपासून काकू अधिक आनंदी दिसत होत्या.
२. त्यांच्या बोलण्यातून ‘त्या मायेपासून अलिप्त होत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या मुलांविषयी त्या अत्यंत स्थिर राहून सांगायच्या. त्यांना मुलांविषयी चिंता किंवा काळजी नसायची.
३. ‘त्यांनी घरातील परिस्थिती आनंदाने स्वीकारली आहे आणि स्वतःतील स्वभावदोषांवर मात करण्याचा प्रयत्न मनापासून केला आहे’, असे मला वाटले.
३ इ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. काकूंच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाकडे पाहून मला अत्यंत स्थिर वाटले.
२. तिथे त्यांचे अस्तित्व मुळीच नव्हते.
३. ‘त्या मृत्यूला अगदी सहजपणे सामोरे गेल्या. आपण जसे एका गावाहून दुसर्या गावाला जातो, तशा काकू इहलोकाचा प्रवास संपवून पुढच्या प्रवासाला सहजतेने गेल्या’, असे मला वाटले.
४. याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ।।
अर्थ : परमेश्वराची साधना आयुष्यभर केली, ती याचसाठी की, शेवटचा दिवस गोड व्हावा.
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार ‘काकूंनी आश्रमात राहून स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घेतले’, असे मला जाणवले.’
४. सौ. शालिनी सावंत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे), ढवळी, फोेंडा, गोवा.
४ अ. स्वतःला पालटण्याची तळमळ : ‘मागील काही वर्षांपासून माझ्याकडे मोहेकाकूंचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा होती. पूर्वी त्यांना ‘त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करणे, चुका स्वीकारणे’, हे कठीण जायचे. त्या त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंविषयी स्वतःहून मला सांगायच्या. ‘माझ्यातील काही स्वभावदोषांमुळे साधनेत येणार्या अडथळ्यांवर मी कशी मात करू ? त्यासाठी काय प्रयत्न करू ?’, असे त्या मला स्वतःहून विचारायच्या.
निधन होण्याच्या १५ – २० दिवस आधी त्या मला म्हणाल्या, ‘‘माझ्यातील स्वभावदोष कधी जाणार ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘काकू, तुम्हाला पूर्ण शरणागतीविना पर्याय नाही.’’ त्यानंतर त्यांनी तसे प्रयत्न करणे चालू केले. तेव्हा स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्याची त्यांची तळमळ वाढली होती. आढाव्यात सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येकामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप पहाण्याचा प्रयत्न करायच्या.’(क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३.१.२०२४)