Maldives Tourism Condemns Comments: मालदीवच्या पर्यटन विभागाकडूनही त्यांच्या मंत्र्यांच्या विधानांचा निषेध !

भारताने आतापर्यंत मालदीवला केलेल्या साहाय्यासाठी आभारही व्यक्त केले !

‘मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री’कडून मंत्र्यांच्या विधानांचा निषेध

माले (मालदीव) – ‘मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री’ने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या अवमानाच्या प्रकरणावर निवेदन प्रसिद्ध करत या मंत्र्यांच्या विधानांचा निषेध केला आहे. तसेच भारताने आतापर्यंत मालदीवला केलेल्या साहाय्यासाठी आभारही मानले आहेत.

भारताशी असलेल्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होण्यापासून स्वतःला दूर ठेवू !

या संघटनेने म्हटले की, भारत हा आमचा शेजारी आणि मित्र देश आहे. आमच्या संपूर्ण इतिहासात अनेक संकटकाळात भारताने सर्वांत आधी प्रतिसाद दिला आहे. भारत सरकारने आणि भारतीय नागरिकांनी आमच्याशी जपलेल्या घनिष्ठ संबंधांसाठी आम्ही भारताचे नेहमीच आभारी आहोत. मालदीवच्या पर्यटन उद्योगात भारताचे मोठे आणि सातत्यपूर्ण योगदान आहे. कोरोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आम्ही पर्यटकांसाठी आमच्या देशाचे दरवाजे उघडले. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनात भारताने मोठे योगदान दिले आहे. भारत मालदीवसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून कायम आहे. उभय राष्ट्रांमधील घनिष्ठ मैत्रीचे संबंध यापुढेही कामय रहावेत, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळेच आपल्या संबंधांवर कुठलाही नकारात्मक परिणाम होईल, अशा कृती आणि वक्तव्ये यांपासून आम्ही यापुढे दूर राहू.

भारतियांच्या दबावाचा परिणाम !


पंतप्रधान मोदी यांच्यावरील अपमानास्पद टीकेनंतर भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचे, तसेच पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे सहस्रो नागरिकांनी मालदीवला जाणे रहित केले आहे. परिणामी मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळेच मालदीवच्या पर्यटन विभागाने शरणागती पत्करल्याचेच दिसत आहे.