‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
रत्नागिरी – शेतकर्यांच्या साहाय्यासाठी कोकण कृषी विद्यपीठ आणि कृषी विभागाने केरळच्या धर्तीवर ‘फूड सिक्युरिटी आर्मी’
( ‘फूड सिक्युरिटी आर्मी’ म्हणजे अन्न सुरक्षेसाठी लढणारे सैनिक) तयार करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यास चालू करावे, अशी सूचना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी महिला आणि आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,
१. शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे. ५०- ५० ची तुकडी करून कृषी महाविद्यालय ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी हे प्रशिक्षण ‘मिशन मोड’मध्ये चालू करावेत.
२. प्रशिक्षणानंतर त्यांना अवजारांची बँक देणार आहोत. त्यासाठी प्रशिक्षित युवकांना शेतकर्यांशी समन्वय करून द्यावा. ७५ टक्के ‘सबसिडी’ उर्वरित २५ टक्के बँकेचे कर्ज त्यांनी भरले पाहिजे. याचे प्रमुख कुलगुरु असतील आणि आपण सर्वजण मिळून सहकार्य करूया.
३. एस्.आर्.आय. पद्धतीने भात लागवड, दुहेरी पीक पद्धती, आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून हळद घेऊ शकतो का ? याविषयी कृषीविभागाने आणि विद्यापिठाने शेतकर्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करावे. ‘ॲग्रो टुरिझम’ (कृषी पर्यटन) चालू करण्याविषयीही पुढाकार घ्यावा.
४. नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक हेल्थ स्पा, गोव्याच्या धर्तीवर ‘स्पाईस व्हिलेज’ सिंधुदुर्ग जिल्ह्याने चालू करावेत. पर्यटन विभागाने १५ दिवसांत कृषी पर्यटन चालू करावे. मत्स्यव्यवसाय विभागाने शीतपेटीसह ‘ई’ स्कुटर योजना यशस्वी करावी.