आपण ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ आहोत !
‘मारिल रिपु जगति असा कवण जन्मला !’, ही आत्मशक्ती घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घालवायची होती आयुष्याच्या उत्तरार्धाची ५० वर्षे ! जन्म एकच, तरीही जन्मठेपा मात्र दोन ! नियतीचा खेळ किती क्रूर होता बघा. विजिगिषु मनोवृत्तीनेच सावरकर यांनी अंदमानात येतांना कुटुंबाचा निरोप घेतला होता, बायकोला सांगितले होते, ‘चिमण्या कावळे करतात, तसा संसार नाही आपला ! आपल्या संसाराची राखरांगोळी झाली म्हणून दु:ख करत बसू नकोस, संकटांसाठी सिद्ध हो. या त्यागातून राष्ट्र घडेल, लोक आपल्याला ओळखतील ते ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ म्हणून !’
१. जीवन-मृत्यूचा संघर्ष सावरकर स्वतःच्या कोठडीतून पहात !
अंदमान निकोबार हा भारताच्या पूर्व किनार्यावरचा ५७२ बेटांचा हा अतिशय मोलाचा द्वीपसमूह. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटीश अधिकारी अंदमानात आले आणि तिथे राहू लागले. ‘भारतातील क्रूर बंदीवानांसाठी अंदमान ही जागा अतिशय योग्य आहे’, असा विचार करून या बंदीवानांसाठी मोठे कारागृह बांधावे, या कल्पनेतून अंदमानच्या एका टेकडीवर ‘सेल्युलर जेल’ बांधले.
४ जुलै १९११ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर पोर्ट ब्लेअरला पोचले. सेल्युलर कारागृहाची ही दारे आता पुन्हा थेट ५० वर्षांनी उघडणार होती ! अंगाला २४ तास घाम फुटेल इतके दमट हवामान आणि त्यात आडदांड जनावरांना द्याव्यात, अशा क्रूर शिक्षा अन् त्या शिक्षांचा सामना करायला सज्ज असलेले सावरकर ! सामना चालू झाला ! शरीर आणि मन दोन्ही भानावर रहाणार नाहीत, इतके कठोर श्रम या ११ वर्षांत सावरकर यांच्या नशिबात होते. नारळाच्या सालांचा काथ्या कुटावा लागे, त्याच्यापासून दोर वळावे लागत, ते वळता वळता हाताच्या बोटांची त्वचा इतकी रुक्ष होई की, त्यातून रक्त वाहू लागे. साधारण बैलांना कोलूला किंवा घाण्याला जुंपले जाते, इथे मात्र हा दिग्विजय करून आलेला साहित्यशेखर कोलूला जुंपला जात होता एखाद्या जनावरासारखा ! दिवसभरात ३० पौंड, म्हणजे १३.६० किलो तेल काढणे बंधनकारक असे, अन्यथा पाठीवर वेताचे आणि चाबकाचे फटके बसत. असे फटके मारतांना पाठीवर कुठलेही वस्त्र नसे. निर्वस्त्र पाठीवर फटके पडले की, ती त्वचा पातळ होत असे आणि ८ ते १० फटक्यांच्या नंतर त्यातून घळाघळा रक्त वाही ! प्रतिदिन असे रक्ताने माखलेले बंदीवान जीवाच्या आकांताने ओरडत, किंकाळत आणि रात्रभर सेल्युलरचा परिसर आशा आर्त आवाजाने शहारून जात असे.
सावरकरांची कोठडीत नेमकी फाशीघरासमोर होती. प्रतिदिन ३ ते ४ जणांना मरतांना त्यांना पहावे लागत. अंदमानातील सगळेच बंदीवान देशभक्त होते, असे नाही. काही अट्टल चोर, महाभयंकर खुनी होते. त्यामुळे ते फासावर खुशीने जात नसत. त्यांना खेचूत आणावे लागे. मग ते ओरडत, रडत, जीवाची भीक मागत आणि हा सगळा जीवन-मृत्यूचा संघर्ष सावरकर आपल्या कोठडीतून पहात.
२. …आणि सावरकर प्रतिभादेवीची आराधना करू लागले !
दिवसाचे ८-८ घंटे कोलू फिरवूनही सावरकर केवळ ३ ते ४ लिटरच तेल गाळू शकत. काही अट्टल गुन्हेगार सवयीचे झाल्यामुळे ६ ते ७ लिटर तेल गाळत. अशा वेळी बारी सावरकरांकडे येऊन त्यांना खिजवायचा आणि म्हणायचा, ‘तो कैदी पहा, कितीतरी तेल गाळतो, तुम्हाला तेवढेही जमू नये ?’ सावरकर तडक उत्तर द्यायचे, ‘मी अर्ध्या घंट्यात कविता लिहून दाखवतो, त्या कैद्याला दिवसभरात ४ ओळी तरी लिहिता येतील का ?’ बारी चरफडायचा. तो म्हणायचा, ‘मार्सेहून निसटला असाल; पण इथे तसा प्रयत्नही करू नका. मी इथला भगवान आहे. इथली पानेही माझ्या अनुमतीने सळसळतात ! इथे ५० वर्षे काढायची आहेत, विसरू नका !’ सावरकर अभिमानाने सांगायचे, ‘५० वर्षे ! अरे ५० वर्षे तुझे सरकार या देशावर राज्य तरी चालवेल का ?’
सावरकर यांच्या कोठडीत उन्हाची तिरीप येत नसे, न वार्याची झुळूक. सगळ्याच नैसर्गिक हक्कांना इथे मज्जाव होता. या अंधारकोठडीत सावरकर यांच्या साहाय्याला धावली सगळ्या मानवनिर्मित भिंतींना भेदून आकाशात उड्डाण करणारी प्रतिभा ! या प्रतिभादेवीची आराधना सावरकर करू लागले. त्यांना काव्य स्फुरू लागले. महाकाव्य लिहिण्याचा संकल्प त्यांनी किती तरी आधीच केला होता. घायपात्याच्या काट्यांची लेखणी करून आणि कोठडीच्या भिंतींचा कागद करून अंदमानच्या अंधारात काव्य साकारू लागले !
३. सावरकर यांचे ‘ते’ शब्द खरे आणि चिरंजीव झाले !
अंदमानातील बहुतांश बंदीवान अशिक्षित आहेत, हे लक्षात आल्यावर सावरकरांनी त्यांना एकत्र करून त्यांचा शिकवणी वर्ग घ्यायला आरंभ केला. एक लहानसे ग्रंथालय चालू केले. राजबंद्यांच्या हक्कांसाठी ते लढले आणि मुख्य म्हणजे हिंदूंच्या होणारी बाटवाबाटवी सावरकर यांनी रोखली. इतके कष्ट उपसूनसुद्धा हा माणूस ना थकत होता, ना थांबत होता ! दुर्दैवाचे दशावतार किती दिशांनी यावेत याला काही मर्यादा असावी ना; पण सावरकर यांच्याविषयी नियतीसुद्धा अप्रसन्न होऊनच बसली होती. इकडे मात्र मुंबई विद्यापिठाने त्यांची कला शाखेची पदवीच काढून घेतली होती. कोठडीत असतांना सावरकरांना मातृस्थानी असलेल्या त्यांच्या वाहिनींच्या निधनाची वार्ता समजली. दु:खाचा डोंगर कोसळला. अंदमानच्याच कोठडीत त्यांना एक दिवस अचानक सामोर एक ओळखीची आकृती दिसली आणि ते क्षणभर थबकले. त्यांचे थोरले बंधू बाबाराव हेही याच कारागृहात होते. एकमेकांना पाहून दोघेही कळवळले. एकमेकांना म्हणाले, ‘तूही इथेच. अरे, मी समजत होतो, माझ्या माघारी तू देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढशील. आता आपल्या व्रताचं काय होईल रे ! मातृभू मुक्त कशी होईल रे !’
इथले कैदी सकाळी जंगलात भाजीपाला आणायला जात आणि येतांना पायाला जळवा चिटकवून येत. या जळवा त्यांचे रक्त पीत असत. अशा ५०-६० जळवा पायाला चिकटल्या की, जखमांमधून रक्त बाहेर येई. असे ओसंडणारे रक्त पाहून तरी किमान आजची कष्टाची कामे क्षम्य होतील. ‘रुग्णालयात एखादा दिवस काढू; पण हे जीवघेणे कष्ट नको’, अशी स्थिती इथल्या कैद्यांची झालेली असे. जंगलातून आणलेल्या भाज्या शिजवणारे कैदी गुप्तरोगी किंवा महारोगी असत. अशांचा घाम त्या भाजीत सांडत असे आणि अशी आमटी, भाजी येथील कैद्यांना, परिणामी त्यांच्यात रहाणार्या सावरकर यांनाही खावी लागे. भाजी धुतलेली, निवडलेली नसल्यामुळे कधी कधी त्यात सापाचे, पालीचे तुकडे निघत. सामान्य माणूस इतक्या घाणीत, किळसवाण्या वातावरणात कसा राहील ? एकतर तो वेडा होईल किंवा स्वतःचे जीवन संपवायला निघेल; पण सावरकर कुठल्या मातीचे बनले होते कुणास ठाऊक ? जिंकण्याची दावेदारी करत समोर साक्षात् मृत्यू उभा होता; पण विनायक मात्र त्या मृत्यूलाच आव्हान देत प्रश्न करत होता. पुन्हा पुन्हा म्हणत होता, ‘मारिल रीपु जगति असा कवण जन्मला !’ अंदमानात आत्मघात करायला निघालेल्या आपल्या सवंगड्यांना सावरकर सांगायचे, ‘अजिबात आत्महत्या करू नका. एक दिवस असा येईल की, तुमच्या त्यागाचे प्रतीक, शौर्याची कहाणी सांगत याच कारागृहाच्या बाहेर तुमचे पुतळे उभारले जातील आणि भारतातून लोक तुमच्या दर्शनासाठी आणि अभिवादनासाठी इथे येतील.’ सावरकर आणि क्रांतीकारक यांचे पुतळे आज सेल्युलर कारागृहाच्या समोर दिमाखात उभे आहेत. सावरकर यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले आहेत. चिरंजीव ठरले आहेत. नाही का !
– श्री. पार्थ बावस्कर, सावरकरप्रेमी आणि इतिहास अभ्यासक
(साभार : हिंदुस्थान पोस्ट, मराठी)