प्रश्नपत्रिकेतील गोंधळ !
राज्य शासनाच्या ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून पी.एच्.डी.धारक विद्यार्थ्यांची घेतली जाणारी शिष्यवृत्ती (फेलोशिप) परीक्षा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर ती परीक्षा रहित करण्यात आली. ही चूक अनावधानाने घडली असल्याचे सांगून विद्यापिठाकडून त्यावर पडदा टाकण्यात आला. विद्यापिठाची ही भूमिका अत्यंत दायित्वशून्यतेची आणि मंडळाविषयी शंका निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रामध्ये ‘एम्.पी.एस्.सी.’ असो कि अजूनही कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा इतरही परीक्षा असतो, त्यांमध्ये काही वेळा प्रश्न चुकीचा विचारला जाणे, दुबार प्रश्न असणे, प्रश्नपत्रिकांची छपाई अस्पष्ट असणे, प्रश्नपत्रिका आधीच फुटणे आदी प्रकार सर्रास घडतांना दिसून येतात. खरे तर प्रश्नपत्रिका सिद्ध करणारी त्या-त्या विषयातील तज्ञ मंडळी असतात. अशा स्थितीत या विद्यार्थ्यांच्या हाती दिलेल्या प्रश्नपत्रिकेतच चुका असाव्यात, हे गंभीर आहे. याला जे जे कारणीभूत असतील, त्यांना योग्य ती शिक्षा देणे आवश्यकच आहे.
ज्या अध्यापकांनी प्रश्नपत्रिका सिद्ध केली, ज्या परीक्षकांनी ती पडताळली, त्यानंतरही मुख्य पर्यवेक्षकांनी तिला मान्यता दिली, ते सारे अनेक वर्षे प्रश्नपत्रिका सिद्ध करत आलेले असतांनाही अशा चुका होत असतील, तर याचा अर्थ ते काम मुळातच त्यांच्या आवडीचे नसावे. त्यातून पाट्याटाकूपणा, निष्काळजीपणा दिसून येतो. आयुष्यात काहीच जमत नसेल, तर शिक्षक होणे सोपे, अशी समाजाची धारणा झाली आहे. कर्तव्यदक्षता, दायित्व सांभाळणे किंवा प्रामाणिकपणे काम करणे, हे इथे झालेले दिसत नाही. प्रश्नपत्रिकेत राहून गेलेल्या चुका हे प्रकरण गंभीर आहे, याची जाणीव संबंधितांना नसल्याने त्याविषयी त्यांना खेदही वाटत नाही. अध्यापन हे अतिशय महत्त्वाचे काम असते आणि त्याचा समाजाच्या जडणघडणीशी थेट संबंध असतो. त्यामुळे परीक्षेच्या कामांचे गांभीर्य समजून घेणे, हे प्रत्येकच अध्यापकाचे कर्तव्य असायला हवे. तसे ते होत नाही; म्हणूनच प्रश्नपत्रिकेत चुका होतात आणि त्याचा मनस्ताप परीक्षा देणार्या लाखो विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. अशा भोंगळ कारभारामुळे एकूणच शिक्षणव्यवस्थेचा जो फार्स झाला आहे, त्यात भर पडते !
– श्री. अमोल चोथे, सांगली